येमेनमधील हौथी बंडखोरांविरोधात लढणार्‍या येमेनमध्ये सौदी व युएई समर्थकांमध्ये संघर्ष

येमेनमधील हौथी बंडखोरांविरोधात लढणार्‍या येमेनमध्ये सौदी व युएई समर्थकांमध्ये संघर्ष

सना – येमेनमध्ये सर्वाधिक महत्त्व असलेल्या ‘एडन’ शहरावर वर्चस्व मिळविण्यासाठी अरब मित्रदेशांच्या समर्थक गटांमध्येच संघर्ष पेटला आहे. सौदी अरेबियाचा पाठिंबा असलेल्या येमेनमधील हादी सरकारवर ‘संयुक्त अरब अमिराती’च्या (युएई) समर्थकांनी हल्ले चढवून ‘एडन’चा ताबा घेतला. ही कारवाई म्हणजे बंड असल्याचा ठपका ठेवून सौदी समर्थक गटाने ‘युएई’ समर्थकांवर प्रतिहल्ले चढविले. तसेच येत्या काळात लष्करी कारवाई केली जाईल, असेही सौदी समर्थकांनी धमकावले.

चार वर्षांपूर्वी येमेनमधील हौथी बंडखोरांनी हादी सरकारविरोधात संघर्ष पुकारला होता. हादी सरकारच्या बचावासाठी सौदी अरेबिया आणि ‘युएई’ने अरब मित्रदेशांच्या ‘सदर्न ट्रांझिश्‍नल कौंसिल’ (एसटीसी) या समर्थकांचा सशस्त्र गट तयार केला होता.

सौदी व अरब मित्रदेशांकडून हौथी बंडखोरांवर चढविल्या जाणार्‍या हवाई हल्ल्यांना सहाय्य म्हणून ‘एसटीसी’कडून लष्करी कारवाई केली जात होती. पण गेल्या काही महिन्यांपासून या ‘एसटीसी’ गटामध्ये फूट पडली असून ‘युएई’ समर्थक ‘सिक्युरिटी बेल्ट’ या गटाने हादी सरकारविरोधातच बंड पुकारले आहे.

शनिवारी ‘सिक्युरिटी बेल्ट’ या गटाने एडन शहरावर हल्ला चढवून हादी सरकारच्या नियंत्रणातील राष्ट्राध्यक्ष निवास, लष्करी तळ व इतर ठिकाणांचा ताबा घेतला. ‘युएई’ समर्थकांच्या या हल्ल्यात मोठी जीवितहानी झाल्याचा दावा केला जातो. पण यासंबंधीचे तपशील उघड झालेले नाही.

‘सिक्युरिटी बेल्ट’ने एडन शहरावर पूर्ण ताबा मिळविला असून सौदी व अरब मित्रदेशांच्या गटाने यावर संताप व्यक्त केला आहे. शनिवारी रात्रीच ‘एसटीसी’ने ‘सिक्युरिटी बेल्ट’च्या ठिकाणांवर हल्ले चढविले. ‘सिक्युरिटी बेल्ट’चे बंडखोर येमेनमधील हादी सरकारच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असल्याचा आरोप ‘एसटीसी’ने केला आहे.

गेल्या चार वर्षांपासून येमेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षात पहिल्यांदाच सौदी व युएई समर्थक गटांमध्ये संघर्ष भडकला आहे. काही दिवसांपूर्वी ‘सिक्युरिटी बेल्ट’च्या बंडखोरांनी येमेनमधील हादी सरकारसाठी संघर्ष करणार नसल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे येमेनमधील इराणसमर्थक हौथी बंडखोरांविरोधी सुरू असलेल्या लष्करी मोहिमेला हादरा बसेल, असे बोलले जाते.

दरम्यान, सौदी समर्थक गटाने हौथी बंडखोरांच्या ताब्यातील ‘हजाह’ प्रांतातही हवाई कारवाई केली. या कारवाईत आठ जणांचा बळी तर ११ जण जखमी झाले आहेत. सौदीच्या या कारवाईवर आंतरराष्ट्रीय स्तरातून टीका होत आहे.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info