नवी दिल्ली – ‘अण्वस्त्रांचा प्रथम वापर नाही, असे भारताचे आजवरचे आण्विक धोरण राहिलेले आहे. पण यापुढे भारत परिस्थिती पाहून याबाबतचा निर्णय घेईल’, असा सज्जड इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिला. कलम ३७० रद्द केल्यानंतर भारताला पाकिस्तान अणुयुद्धाच्या धमक्या देत आहे. त्यावर भारताची ही प्रतिक्रिया असून पाकिस्तानच्या आण्विक धमक्यांचा भारतावर परिणाम होणार नाही, असा खरमरीत इशारा संरक्षणमंत्र्यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानानंतर पाकिस्तानात खळबळ माजली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान भारताला गंभीर परिणामांच्या धमक्या देत आहे. तसेच काश्मीरवरून भारत-पाकिस्तान युद्ध पेट घेईल आणि त्यातून अणुयुद्धाचा भडका उडू शकतो, अशी बेजबाबदार विधाने करून पाकिस्तानचे पंतप्रधान आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याचवेळी त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य तसेच कट्टरपंथीय विश्लेषक देखील पाकिस्तान भारताबरोबरील युद्धात अण्वस्त्रांचा वापर करू शकतो, असे धमकावत आहे. भारताचे लष्करी सामर्थ्य पाकिस्तानपेक्षा खूपच अधिक आहे. त्यामुळे युद्धात पिछेहाट झाल्यानंतर पाकिस्तानला अण्वस्त्रांचा वापर करण्यावाचून गत्यंतर नाही, असा या मंडळींचा दावा आहे.
काही भारतद्वेष्टे पाकिस्तानी विश्लेषक तर भारतीय वृत्तवाहिन्यांशी बोलताना नवी दिल्ली व मुंबईवर अणुबॉम्ब टाकण्याचे इशारे देत आहेत. मात्र भारतीय विश्लेषकांनी याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. आजवर आण्विक ब्लॅकमेलिंग करून पाकिस्तानने भारताची लष्करी कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. पण यापुढे भारत पाकिस्तानचे हे ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही, असे या भारतीय विश्लेषकांनी बजावले होते. मात्र अधिकृत पातळीवर पाकिस्तानचे राजकीय नेतृत्त्वच आण्विक युद्धाच्या धमक्या सातत्याने देऊ लागल्यानंतर भारताने या देशाला परिस्थितीची जाणीव करून दिल्याचे दिसत आहे.
१९९८ साली भारताने राजस्थानच्या पोखरण येथे अणुचाचण्या करून आपली आण्विक क्षमता सिद्ध केली होती. यानंतर भारताने अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याचे (नो फर्स्ट यूज) धोरण स्वीकारले होते. मात्र भारतानंतर अणुचाचण्या करणार्या पाकिस्तानने स्वतःवर असे बंधन लादलेले नाही. याचा फायदा घेऊन पाकिस्तान भारतावर अणुहल्ला चढवू शकतो, असा पाकिस्तानी सामरिक विश्लेषकांचा तर्क आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही त्याला दुजोरा देणारी विधाने केल्यानंतर या धमक्यांची गंभीर दखल घेणे भारताला भाग पडले.
Pokhran is the area which witnessed Atal Ji’s firm resolve to make India a nuclear power and yet remain firmly committed to the doctrine of ‘No First Use’. India has strictly adhered to this doctrine. What happens in future depends on the circumstances.
— Rajnath Singh (@rajnathsingh) August 16, 2019
संरक्षणमंत्र्यांनी देशाच्या पारंपरिक आण्विक धोरणात परिस्थितीनुसार बदल केले जाऊ शकतात, असे सांगून पाकिस्तानचा थरकाप उडविला आहे. पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली असून भारत पाकिस्तानला अणुहल्ल्याच्या धमक्या देत आहे का? असा प्रश्न पाकिस्तानी पत्रकार विचारू लागले आहेत. मात्र ही पाकिस्तानच्या बेजबाबदार धमक्यांवर आलेली प्रतिक्रिया असल्याची बाब या देशाची माध्यमे सोयीस्कररित्या दुर्लक्षित करीत आहेत.
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी आपल्याच देशाच्या सरकारला अण्वस्त्रांबाबत बेजबाबदार विधाने करू नका, असे खडसावले होते. पाकिस्तानने भारतावर एक अणुबॉम्ब टाकला, तर भारत २० अणुबॉम्ब टाकून पाकिस्तान बेचिराख करील. हे टाळायचे असेल तर पाकिस्तानला भारतावर एकाच वेळी ५० अणुबॉम्बचा हल्ला करावा लागेल. पाकिस्तान यासाठी तयार आहे का? असा प्रश्न मुशर्रफ यांनी विचारला होता. अणुयुद्धात पहिल्यांदा हल्ला चढविणार्या देश आपल्या शत्रूवर कुरघोडी करू शकतो, हे जरी खरे असले तरी भारताने सेकंड स्ट्राइक अर्थात अणुहल्ला झाल्यानंतर त्याला अणुहल्ल्याने प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य प्राप्त केले आहे. भारत जमीन, हवाई आणि सागरी मार्गाने अणुहल्ले चढवू शकणारा देश बनला असून यामुळे भारताला आता कुणीही आण्विक ब्लॅकमेल करू शकत नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी काही काळापूर्वी बजावले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |