चीन म्हणजे जागतिक ‘अपप्रचाराची महासत्ता’ – ब्रिटीश अभ्यासगटाचा दावा

चीन म्हणजे जागतिक ‘अपप्रचाराची महासत्ता’ – ब्रिटीश अभ्यासगटाचा दावा

लंडन/बीजिंग – आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘सोशल मीडिया’ व प्रसारमाध्यमांचा वापर करून चीन ‘जागतिक अपप्रचाराची महासत्ता’ बनला आहे, असा दावा ब्रिटीश अभ्यासगटाने केला आहे. काही दिवसांपूर्वीच हाँगकाँगमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाबाबत चुकीची माहिती पसरविली जात असल्याचे सांगून ‘ट्विटर’ व ‘फेसबुक’ या आघाडीच्या सोशल मीडिया ‘नेटवर्क्स’नी चीनमधील हजारो अकाऊंट्स बंद केले होते. या पार्श्‍वभूमीवर, प्रसिद्ध झालेला नवा अहवाल चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून कारस्थानांसाठी करण्यात येणार्‍या मीडियाच्या वापराला दुजोरा देणारा ठरला आहे.

‘द ग्लोबल डिसइन्फोर्मेशन ऑर्डर’ नावाने प्रसिद्ध झालेल्या अहवालात हा दावा करण्यात आला असून त्यात जगातील जवळपास ७० देशांचा वेध घेण्यात आला आहे. ‘चीनच्या सत्ताधारी राजवटीने सुरुवातीला देशातील जनतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक सोशल मीडिया नेटवर्क्सचा वापर केला होता. मात्र हाँगकाँगमधील आंदोलनादरम्यान चीनच्या राजवटीने परदेशी सोशल मीडिया नेटवर्क्सचा वापर करूनही अपप्रचाराची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली’, अशी माहिती ब्रिटनच्या ‘ऑक्सफर्ड इंटरनेट इन्स्टिट्यूट’ने तयार केलेल्या अहवालात देण्यात आली आहे.

‘चीन आता अपप्रचारातील जागतिक महासत्ता बनला आहे. सोशल मीडिया नेटवर्क्सचा आपण प्रभावीरित्या गैरवापर करू शकतो, हे या देशाने दाखवून दिले. चीन एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करीत आहे. पाश्‍चात्य देशांमधील मतदारांना प्रभावित करण्यासाठीही चीनचे आक्रमक प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी रशियाकडे अशा प्रकारची क्षमता असल्याचे मानले जात होते. मात्र चीनची राजवट आता रशियन सरकारप्रमाणेच अत्यंत प्रभावीरित्या अपप्रचार करण्यात आघाडीवर आहे’, अशा शब्दात ‘ऑक्सफर्ड इंटरनेट इन्स्टिट्यूट’चे संचालक प्राध्यापक फिलिप हॉवर्ड यांनी चीनच्या अपप्रचार मोहिमेकडे लक्ष वेधले.

चीनकडे अपप्रचाराची क्षमता आहे याची जाणीव झाल्यानंतर आता यापुढे चीन जगातील विविध लोकशाहीवादी देशांमध्ये होणार्‍या निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी काय करतो, ही यापुढील सर्वात मोठी चिंता आहे असा इशाराही प्राध्यापक हॉवर्ड यांनी दिला. नजिकच्या काळात ब्रिटनमध्ये होणार्‍या निवडणुका, कॅनडातील निवडणूक आणि अमेरिकेत पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकांमध्ये रशियाबरोबरच चीनच्या अपप्रचाराचीही दखल घेणे भाग पडणार आहे, असे ‘ऑक्सफर्ड इंटरनेट इन्स्टिट्यूट’च्या संचालकांनी बजावले.

काही महिन्यांपूर्वी, चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी प्रसारमाध्यमांचा आक्रमक वापर करीत आहे व त्यासाठी अब्जावधी डॉलर्सची तरतूद केल्याची माहिती समोर आली होती. ‘चायनाज् पर्स्युट ऑफ ए न्यू वर्ल्ड मीडिया ऑर्डर’ नावाच्या या अहवालात, जगातील १४० देश व ६५ भाषांमध्ये चीनच्या प्रसारमाध्यमांनी आपले अस्तित्त्व निर्माण केल्याची जाणीव करून देण्यात आली होती.

आंतरराष्ट्रीय महासत्ता बनण्यासाठी चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून विविध डावपेचांचा वापर करण्यात येत असून जागतिक प्रसारमाध्यमांवर वर्चस्व मिळवून माध्यमे नियंत्रित करणे हा त्याचाच एक हिस्सा असल्याचे ‘रिपोटर्स विदाऊट बॉर्डर्स’ या प्रसिद्ध संस्थेने आपल्या अहवालात बजावले होते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info