अमेरिकेकडून सौदी अरेबियामध्ये लष्कर व क्षेपणास्त्रभेदी यंत्रणांची तैनाती – अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांची घोषणा

अमेरिकेकडून सौदी अरेबियामध्ये लष्कर व क्षेपणास्त्रभेदी यंत्रणांची तैनाती – अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांची घोषणा

वॉशिंग्टन – दोन आठवड्यांपूर्वी सौदी अरेबियाच्या इंधनप्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने सौदीतील आपली तैनाती वाढविली आहे. सौदीच्या नागरी, लष्करी तसेच संवेदनशीलदृष्ट्या अतिमहत्त्वाच्या इंधनप्रकल्पांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने क्षेपणास्त्रभेदी यंत्रणांची तैनाती घोषित केली आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे २०० सैनिक लवकरच सौदीसाठी रवाना होतील, अशी घोषणा अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी केली.

संरक्षणमंत्री एस्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पॅट्रियट मिसाईल बॅटरी’ आणि चार रडार यंत्रणा सौदीसाठी पाठविण्यात येणार आहेत. सौदीतील या तैनातीबाबत गेल्या काही दिवसांपासून अमेरिकी अधिकार्‍यांमध्ये चर्चा सुरू होती. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आदेशानंतर सौदीच्या इंधनप्रकल्पांबरोबर नागरी व लष्करी ठिकाणांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतरही आवश्यकता निर्माण झाल्यास दोन पॅट्रियट यंत्रणा आणि एक थाड क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा देखील सौदीला रवाना करण्याची तयारी असल्याचे एस्पर यांनी सांगितले.

सदर क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेच्या तैनातीबरोबर २०० सैनिकांचे विशेष पथकही सौदीसाठी रवाना होणार आहे. गेल्या दोन महिन्यात अमेरिकेने आखातासाठी घोषित केलेली ही तिसरी सैन्यतैनाती ठरते. गेल्या महिन्यात अमेरिकेने आखातासाठी ५०० तर काही आठवड्यांपूर्वी हजार सैनिकांच्या तैनातीची घोषणा केली होती. तर अमेरिकेने आखातात पॅट्रियट क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेची केलेली ही दुसरी तैनाती आहे. याआधी पर्शियन आखातात सौदी, युएई व इतर मित्रदेशांच्या इंधनवाहू जहाजांवर झालेल्या रॉकेट हल्ल्यानंतर अमेरिकेने सदर क्षेत्रात पॅट्रियट रवाना करण्याचे जाहीर केले होते.

इराणकडून सौदीवर नवे हल्ले चढविले जाऊ शकतात, म्हणूनच सौदीच्या संरक्षणासाठी या तैनातीची आवश्यकता असल्याचे अमेरिकेने याआधीच जाहीर केले होते. तर इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांनी सुरक्षा खरेदी करता येणार नाही, असे संयुक्त राष्ट्रसंघातील आपल्या भाषणात सौदी अरेबियाला बजावले होते. उलट अमेरिकेची शस्त्रास्त्रे आखातात नसतील, तर आखात अधिक सुरक्षित बनेल, असे राष्ट्राध्यक्ष रोहानी म्हणाले होते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info