इस्तंबूल/दमास्कस – गेल्या दोन दिवसापासून सिरियात घुसून तुर्कीच्या लष्कराने चढविलेल्या हल्ल्यात ३४२ दहशतवादी ठार झाल्याचा दावा तुर्कीने केला आहे. मात्र तुर्कीच्या या हल्ल्यात कुर्द जनता बळी पडत असून याचे विचलित करणारे व्हिडिओज् सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. सर्वसामान्य कुर्द नागरिक, महिला व मुले बळी पडली असून हल्ल्यात भयावहरित्या जखमी झालेल्या महिला व मुलांचा आक्रोश या व्हिडिओमध्ये पहायला मिळतो. तुर्कीने असे व्हिडिओज् व सिरियातील हल्ल्याच्या बातम्यांवर सेन्सॉरशिप लादल्याचे समोर येत आहे. तुर्कीच्या या अमानुष कारवाईनंतर तरी अमेरिका सिरियातील सैन्यमाघारीचा निर्णय मागे घेईल, असे साकडे सिरियन कुर्दांच्या संघटनांनी घातले आहे.
तुर्कीने दहशतवादी घोषित केलेल्या ‘पीकेके’ आणि सिरियातील ‘वायपीजी’ या दोन कुर्द संघटनावर हल्ले चढविल्याचे तुर्कीचे संरक्षणमंत्री ‘हुलूसी अकार’ यांनी म्हटले आहे. पण तुर्की दहशतवाद्यांना नाही तर सामान्य सिरियन जनतेला लक्ष्य करीत असल्याचा आरोप कोबानी शहरातील कुर्द नेते करीत आहेत.
या व्यतिरिक्त गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिका आणि सिरियन बंडखोरांनी अटक केलेल्या ‘आयएस’च्या दहशतवाद्यांना सोडविण्यासाठी तुर्की हल्ले चढवित असल्याचा ठपका ‘बरदान जिया कुर्द’ या नेत्याने ठेवला. तुर्कीच्या हल्ल्यांमुळे ‘आयएस’चे दहशतवादी असलेल्या तुरुंगाबाहेर तैनात असलेली कुर्दांची सुरक्षा ढिली पडली असून याचा फायदा घेऊन ‘आयएस’चे दहशतवादी पसार होऊ शकतात. त्यामुळे तुर्कीचे हे हल्ले सार्या जगासाठी धोकादायक ठरू शकतात, असा इशारा कुर्द यांनी दिला.
तुर्कीच्या भयंकर हल्ल्यानंतर तरी कुर्दांवर सुरू झालेल्या अत्याचारांची अमेरिकेला जाणीव झाली असेल. निदान यानंतर तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरियातून सैन्य माघारी घेण्याच्या निर्णयावर फेरविचार करतील, अशी आशा कुर्द संघटनेच्या कमांडरने व्यक्त केली?आहे.
‘वायपीजी’ आणि ‘पीकेके’ या कुर्दवंशियांच्या सशस्त्र संघटना दहशतवादी असल्याची घोषणा तुर्कीने केली आहे. तर अमेरिका व इतर पाश्चिमात्य देश या संघटनांना दहशतवादी मानत नाही. त्यामुळे तुर्कीच्या सिरियातील कुर्दांच्या विरोधातील लष्करी कारवाईवर तीव्र मतभेद समोर येत आहेत. आपल्या हल्ल्यामध्ये दहशतवादी ठार होत आहेत, असे तुर्कीचे म्हणणे असून या हल्ल्याचे दुष्परिणाम दाखविणार्या बातम्या तुर्कीने कठोरपणे रोखल्या आहेत. तुर्कीने सिरियात सुरू केलेल्या लष्करी कारवाईची बातमी प्रसिद्ध करणार्या आणि एर्दोगन सरकारविरोधात लेख लिहिणार्या दोन पत्रकारांना तुर्कीने अटक केली आहे.
या प्रकरणी आणखी १५ जणांना अटक झाल्याचे सांगितले जाते. तरीही तुर्कीच्या या कारवाईचे आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये पडसाद उमटले असून पुढच्या काळात या बातम्या दडपणे तुर्कीसाठी अधिकच अवघड बनेल.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |