तुर्कीचे सिरियन लष्करावरील हल्ले रोखण्यासाठी रशियन सैन्याची तैनाती

तुर्कीचे सिरियन लष्करावरील हल्ले रोखण्यासाठी रशियन सैन्याची तैनाती

दमास्कस – उत्तर सिरियातील मनबीज शहरावर सिरियन लष्कराने मिळविलेले नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. मनबीजवर ताबा मिळविण्यासाठी सिरियन लष्करावर हल्ल्याच्या तयारीत असलेल्या तुर्कीला रोखण्यासाठी रशियाने या संघर्षात उडी घेतली. रशियन लष्कर मनबीजच्या सीमेवर तैनात असून तुर्की व सिरियन लष्करात संघर्ष भडकू देणार नसल्याचे रशियाने जाहीर केले आहे. तर सिरियातील आपले उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी पुन्हा एकदा जाहीर केले.

दोन दिवसांपूर्वी सिरियातील अस्साद राजवट आणि सिरियन कुर्दांमध्ये झालेल्या हातमिळवणीनंतर कुर्दांनी मनबीज, कोबानी आणि इतर प्रमुख शहरांचा ताबा सिरियन लष्कराकडे सोपविला. मनबीजवरील ताब्यानंतर सिरियन लष्कराने आसपासच्या भागावर देखील नियंत्रण मिळविल्याचे रशियाने जाहीर केले होते. पण तुर्कीने प्रस्तावित केलेल्या ४४४ किलोमीटरच्या ‘सेफ झोन’च्या पट्ट्यात मनबीजचाही समावेश आहे. मनबीजसह संपूर्ण सेफ झोनला दहशतवाद्यांनी मुक्त केल्याशिवाय तुर्कीची सिरियातील कारवाई थांबणार नसल्याचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी जाहीर केले.

या पार्श्‍वभूमीवर, तुर्कीचे लष्कर मनबीजच्या दिशेने कूच करीत आहेत. मनबीजवर ताबा मिळवून इथून कुर्दांना पिटाळण्यासाठी तुर्कीचे लष्कर हल्ले चढवू शकते. मनबीजमध्ये तैनात असलेले सिरियन लष्कर तुर्कीच्या लष्करावर प्रतिहल्ले चढवू शकेल. यामुळे दोन शेजारी देशांमध्ये संघर्षाची ठिणगी पडेल, अशी भीती व्यक्त केली जाते. म्हणूनच मनबीजवरील ताब्यासाठी तुर्कीने सिरियावर हल्ले चढवू नये म्हणून रशियाने या शहराच्या सीमेवर आपले सैनिक तैनात केले आहेत.
रशियाने मनबीजच्या सीमेवर सैन्य तैनात केले असून त्याबरोबर तार्तुस व इतर लष्करी तळांवरील आपल्या सैन्याला सावध राहण्याची सूचनाही केली आहे. तर सिरियन सरकार आणि कुर्दांमध्ये झालेल्या समेटाप्रमाणेच तुर्की आणि अस्साद राजवटीत चर्चा घडविण्यासाठी रशियाचे प्रयत्न सुरू आहेत. मनबीज व्यतिरिक्त रशियन सैनिक सिरियातील ‘एसडीएफ’ या अमेरिकासमर्थक बंडखोरांसह युफ्रेटस नदीच्या पूर्वेकडील भागाकडेही रवाना झाले आहेत. तर सिरियन लष्कर राक्कामध्ये दाखल झाले आहे. या दोन्ही भागावर तुर्कीने काही दिवसांपूर्वी हल्ले चढविले होते.

दरम्यान, सिरियातील लष्करी कारवाईवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष पेन्स येत्या काही तासात तुर्कीत दाखल होत आहेत. तर पुढच्या दोन दिवसात परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ देखील तुर्कीला भेट देतील. राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याबरोबर चर्चा करून सिरियातील हल्ले थांबविण्याचे आवाहन करणार असल्याचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी म्हटले आहे. तर अमेरिकेच्या निर्बंधांची पर्वा न करता, सिरियातील हल्ले सुरू ठेवणार असल्याचे तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केले.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info