रशियाच्या ‘स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर वॉरगेम्स’च्या पार्श्‍वभूमीवर – नाटोकडूनही जर्मनीत अणुयुद्धाचा सराव

रशियाच्या ‘स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर वॉरगेम्स’च्या पार्श्‍वभूमीवर – नाटोकडूनही जर्मनीत अणुयुद्धाचा सराव

बीजिंग – रशियाने गेल्या आठवड्यात घेतलेल्या ‘स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर वॉरगेम्स’नंतर नाटोनेही अणुयुद्धाचा सराव घेतल्याची माहिती उघड झाली. जर्मन वृत्तसंस्था व प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले असून त्याला नाटो अथवा कोणत्याही युरोपिय देशाकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र जर्मन वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात, जर्मनी व नेदरलॅण्ड या दोन देशांसह अमेरिकेचाही यात सहभाग होता, असे सांगण्यात आले आहे.

‘स्टेडफास्ट नून’ नावाने करण्यात आलेल्या सरावात अमेरिकेसह जर्मनी व नेदरलॅण्डच्या लढाऊ विमानांनी सहभाग घेतला. सदर सरावाआधी काही दिवस अमेरिकेची ‘बी-५२ बॉम्बर्स’ युरोपात दाखल झाली होती. जर्मनीने आपल्या हवाईदलातील ‘टॉर्नेडो’ लढाऊ विमानांचा सरावासाठी वापर केल्याचा दावा जर्मन वृत्तसंस्थेने केला. सरावासाठी जर्मनीतील ‘बुकेल एअरबेस’ व नेदरलॅण्डमधील ‘वोल्केल एअरबेस’चा वापर करण्यात आला.

युरोपातील या दोन्ही हवाईतळांवर अमेरिकेची अण्वस्त्रे तैनात असल्याचे मानले जाते. काही महिन्यांपूर्वी युरोपातील एका दैनिकाकडून अमेरिकेच्या युरोपातील ‘आण्विक तळां’ची माहिती उघड झाली होती. त्यात जर्मनी व नेदरलॅण्डमधील या दोन्ही तळांचा समावेश आहे. सरावादरम्यान अमेरिका तसेच जर्मनीच्या विमानांनी अमेरिकेचे ‘बी-६१’ अणुबॉम्ब तैनात करून संभाव्य कारवाईचा सराव केला, असे जर्मन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

दोन महिन्यांपूर्वी अमेरिका व रशिया हे दोन्ही देश ‘आयएनएफ’ या अण्वस्त्रकरारातून बाहेर पडले होते. त्यानंतर नाटोकडून रशियाला अण्वस्त्रकरारासाठी प्रस्ताव देण्यात आले होते. मात्र नाटोचे प्रस्ताव रशियाने धुडकावले होते. हे प्रस्ताव धुडकावताना रशियाने अमेरिकेची आण्विक सज्जता व युरोपातील अण्वस्त्रांची तैनाती यासारखे मुद्दे उपस्थित केले होते. या पार्श्‍वभूमीवर रशिया व त्यापाठोपाठ नाटोने अमेरिकेच्या सहाय्याने पार पाडलेला आण्विक सराव लक्ष वेधून घेणारा ठरतो.

                            

दरम्यान, रशियाने गेल्या आठवड्यात घेतलेल्या ‘स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर वॉरगेम्स’मध्ये ‘न्यूक्लिअर ट्रायड’ची चाचणी घेतल्याचे समोर आले आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली असून त्यात ‘यार्स’ आंतरखंडीय क्षेपणास्त्रे, प्रगत पाणबुड्या, ‘सिनेवा मिसाईल’ व ‘टीयू९५-एमएस बॉम्बर्स’नी सहभाग घेतला होता.

रशियन सीमेनजिकच्या नाटोच्या तळांना प्रत्युत्तर देणार – शियाच्या पंतप्रधानांचा इशारा  

बेलग्रेड – ‘सुरक्षेच्या मुद्यावर रशियाचे स्वतःचे हितसंबंध असून ते जपण्यासाठी आम्ही पावले उचलू शकतो, हे कोणीही नाकारू शकत नाही. रशिया अण्वस्त्रसज्ज देश आहे आणि आमच्या सीमेनजिक नाटोचे तळ उभे राहिले तर आमची त्यावरील प्रतिक्रिया सकारात्मक नक्कीच असणार नाही. रशियाने यापूर्वीही अशा हालचालींना प्रत्युत्तर दिलेले आहे. यापुढेही आम्ही नाटोच्या तळांविरोधात राजकीय व त्याचबरोबर लष्करी मार्गानेही प्रत्युत्तर देऊ’, असा इशारा रशियाचे पंतप्रधान दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी दिला.

गेल्या काही वर्षात अमेरिकेने युरोपातील संरक्षणसज्जतेसाठी आक्रमक पावले उचलली असून पोलंडसारख्या देशात नव्या संरक्षणतळाच्या उभारणीसाठी तयारी सुरू केली आहे. त्याचवेळी सध्या कार्यरत असलेल्या संरक्षणतळांवर वाढीव लष्करी तैनाती करण्यात येत असून त्यावर रशियाने वारंवार नाराजी व्यक्त केली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info