अंतराळक्षेत्र भविष्यातील युद्धभूमी असेल – नाटोचे संकेत

अंतराळक्षेत्र भविष्यातील युद्धभूमी असेल – नाटोचे संकेत

ब्रुसेल्स, दि. २१ (वृत्तसंस्था) – अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स यासारखे आघाडीचे देश अंतराळक्षेत्रातील संभाव्य संघर्षाची जोरदार तयारी करीत असल्याचे गेल्या वर्षभरातील विविध घटनांवरून समोर आले आहे. याच पार्श्‍वभूमीवर आता ‘नाटो’नेही अंतराळक्षेत्राला भविष्यातील युद्धभूमी जाहीर करून शस्त्रांचा वापर सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. डिसेंबर महिन्यात होणार्‍या नाटोच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल, असा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे.

जुलै महिन्यात ब्रिटनमधील आघाडीचा अभ्यासगट असणार्‍या ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स’ने(कॅथम हाऊस) नाटोकडून अंतराळक्षेत्राकडे झालेल्या दुर्लक्षावर इशारा देणारा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात नाटोच्या विविध सदस्य देशांनी अवकाशात लष्करी उपग्रह सोडले असून त्यातील एखाद्या देशाच्या उपग्रहावर झालेला सायबरहल्ला नाटोच्या संपूर्ण यंत्रणेला धोक्यात टाकू शकतो, असा दावा करण्यात आला होता. या उपग्रहांवर नाटोचे नियंत्रण नसल्याची महत्त्वपूर्ण बाब अहवालातून समोर आली होती.

या पार्श्‍वभूमीवर नाटोच्या एका बैठकीत, स्वतंत्र ‘स्पेस पॉलिसी’ला मान्यता देण्यात आली होती. त्यात अंतराळातील वाढत्या शस्त्रस्पर्धेचा उल्लेखही होता. सदर बैठकीत ‘अंतराळक्षेत्र’ व त्याची सुरक्षा हा मुद्दादेखील प्राधान्याने चर्चेत आला होता. मात्र बैठकीत तसेच धोरणात्मक मसुद्यात अंतराळक्षेत्राचा ‘युद्धभूमी’ असा थेट उल्लेख करणे नाटोने टाळले होते. मात्र अमेरिका व फ्रान्ससारखे नाटो सदस्य देश या दृष्टिने जोरदार तयारी करत असताना नाटो त्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नसून त्यासाठी आता तयारी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

            अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षभरात ‘स्पेस फोर्स’ व त्यापाठोपाठ ‘स्पेस कमांड’ला मान्यता दिली असून ही कमांड ‘युनिफाईड कॉम्बॅट कमांड’ असल्याचेही जाहीर केले आहे. याचा अर्थ अंतराळातील संघर्षासाठी ही कमांड सज्ज आहे असा होतो, असा दावा तज्ज्ञांनी त्यानंतर केला होता. अमेरिकेपाठोपाठ फ्रान्सनेही अंतराळक्षेत्रातील वाढत्या संघर्षाचा मुद्दा गांभीर्याने घेतल्याचे समोर आले होते.

 

‘फ्रान्सच्या अंतराळातील क्षमता विकसित करण्यासाठी तसेच वाढविण्यासाठी हाय कमांड फॉर स्पेसची स्थापना करण्यात येत आहे. अंतराळक्षेत्राचा लष्करी दृष्टिकोनातून होणारा विचार हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. फ्रान्सच्या संरक्षण विभागाने अंतराळ तसेच लष्करी धोरणातील नव्या बदलांचा मसुदा सादर केला होता. त्याला मान्यता देऊन अंतराळक्षेत्रातील सुरक्षेची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’, अशा शब्दात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी ‘स्पेस फोर्स कमांड’ला मंजुरी दिली होती.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info