राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरून अमेरिका चीनच्या मोबाईल कंपन्यांवर बंदी घालण्याच्या तयारीत – ‘फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन’चा इशारा

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरून अमेरिका चीनच्या मोबाईल कंपन्यांवर बंदी घालण्याच्या तयारीत – ‘फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन’चा इशारा

वॉशिंग्टन/बीजिंग, दि. २९ (वृत्तसंस्था) – ‘५जी’ तंत्रज्ञान व अमेरिकेची सुरक्षा हे दोन मुद्दे जेव्हा समोर येतात, तेव्हा आम्ही कोणत्याही प्रकारचा धोका पत्करु शकत नाही, अशा खणखणीत शब्दात अमेरिकेच्या ‘फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन’चे प्रमुख अजित पै यांनी चीनच्या मोबाईल कंपन्यांवर बंदी टाकण्याचा इशारा दिला आहे. पुढील महिन्यात ‘फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन’ची महत्त्वपूर्ण बैठक होत असून त्यात चीनच्या ‘झेडटीई’ तसेच ‘हुवेई’ या दोन्ही कंपन्यांवर बंदी टाकतानाच त्यांची सध्या कार्यरत उत्पादने काढून टाकण्याचाही निर्णय घेण्यात येईल, असे संकेत पै यांनी दिले.

अमेरिका व चीनमध्ये गेल्या वर्षभरापासून जोरदार व्यापारयुद्ध सुरू असून त्यावर प्राथमिक स्वरुपाचा तोडगा काढण्याची तयारी सुरू आहे. दोन्ही देशांनी त्याचे स्पष्ट संकेत दिले असून लवकरच करारावर स्वाक्षरी होईल, असेही सांगण्यात येते. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या ‘फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन’ने दिलेला इशारा व संभाव्य कारवाई लक्ष वेधून घेणारी ठरते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मे महिन्यातच दूरसंचार क्षेत्रातील चिनी कंपन्यांना लक्ष्य करताना ‘नॅशनल इमर्जन्सी’ची घोषणा केली होती. ‘फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन’ची कारवाई त्यालाच अनुसरून असल्याचे दिसत आहे.

काही महिन्यांपूर्वी ‘फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन’ने चीनमधील आघाडीची कंपनी असणार्‍या ‘चायना मोबाईल’च्या अमेरिकेतील व्यवहारांवर बंदी टाकण्याचा निर्णय घेतला होता. चीन सरकारने आपल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी तयार केलेल्या कायद्यात सदर कंपन्यांना देशातील गुप्तचर यंत्रणांशी सहकार्य करावे लागेल, अशी अट घातली आहे. या अटीच्या जोरावर चीनमधील सत्ताधारी राजवट अमेरिकेत कार्यरत सर्व चिनी कंपन्यांकडून हवी ती माहिती मिळवू शकते, असा दावा अमेरिकेकडून सातत्याने करण्यात आला आहे. याचाच आधार घेत ‘चायना मोबाईल’विरोधात कारवाई करण्यात आली होती.

  

‘झेडटीई’ तसेच ‘हुवेई’विरोधातील संभाव्य कारवाई याचाच पुढील टप्पा दिसत आहे. या दोन्ही कंपन्या चीनमधील आघाडीच्या कंपन्या असून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळविण्यात त्यांना यश मिळाले आहे. मात्र अमेरिकेकडून सुरू झालेल्या कारवाईमुळे या चिनी कंपन्यांची घोडदौड रोखली गेली असून चीनच्या सत्ताधारी राजवटीच्या महत्त्वाकांक्षेलाही धक्का बसला आहे. त्यामुळे चिनी कंपन्यांविरोधात होणार्‍या कारवाईविरोधात चीनकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

‘अमेरिकेकडून करण्यात येणारी कारवाई म्हणजे तथ्यहीन आरोपांच्या जोरावर चिनी उद्योगांची गळचेपी करण्याचा प्रकार आहे. अमेरिकेची ही आर्थिक दादागिरी बाजारपेठेच्या तत्त्वांविरोधात आहे’, असे टीकास्त्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सोडले. अमेरिकेच्या या कारवाईमुळे अमेरिकी उद्योगांनाच फटका बसेल, असा दावाही शुआंग यांनी केला. हुवेई कंपनीनेही अमेरिकेच्या कारवाईला विरोध करताना गेल्या तीन दशकात सुरक्षेच्या मुद्यावरून कोणताही गैरप्रकार घडला नसल्याचा खुलासा केला.

English      मराठी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info