कॅनबेरा/बीजिंग – ऑस्ट्रेलियाच्या हितसंबंधांना धक्का पोहोचविल अशा कोणत्याही प्रकारच्या कारवाया उधळण्यात येतील, अशा आक्रमक शब्दात पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी ‘हाय लेव्हल इंटेलिजन्स टास्क फोर्स’ स्थापन करण्यात येत असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच शिक्षणक्षेत्रात चीनकडून गुप्त कारवाया सुरू असल्याची माहिती वारंवार समोर आली होती. या पार्श्वभूमीवर नवा ‘टास्क फोर्स’ चीनच्या कारवाया रोखण्यासाठीच असल्याचा दावा ऑस्ट्रेलियन सूत्रांनी केला.
गेल्याच आठवड्यात, ऑस्ट्रेलियाची राजकीय व्यवस्था पूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी चीन सरकार घातकी कारवाया करीत आहे, असा गंभीर आरोप ऑस्ट्रेलियन गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख डंकन लुईस यांनी केला होता. त्यापाठोपाठ एका चिनी गुप्तहेराने, चीन सरकार व गुप्तचर यंत्रणा ऑस्ट्रेलियासह इतर देशांमध्ये कशा रितीने राजकीय तसेच इतर क्षेत्रात हस्तक्षेप करीत आहेत, याचा गौप्यस्फोट केला होता. या घटनांनंतर चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून ऑस्ट्रेलियाच्या राजकीय क्षेत्रात सुरू असलेल्या कारवायांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानंतर चीनविरोधात ठाम भूमिका घेणार्या पंतप्रधान मॉरिसन यांनी ‘टास्क फोर्स’ची घोषणा करून चीनला जबरदस्त धक्का दिला. या ‘टास्क फोर्स’मध्ये ऑस्ट्रेलियातील सर्व गुप्तचर यंत्रणांचा समावेश असून त्यासाठी सहा कोटी डॉलर्सची स्वतंत्र तरतूदही करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संसदेने देशातील विविध क्षेत्रांमध्ये होणार्या वाढत्या परदेशी हस्तक्षेपाचा सामना करण्यासाठी नवा कायदाही मंजूर केला होता. चीनचा उल्लेख असणार्या या कायद्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. चीनचे ऑस्ट्रेलियातील राजदूत तसेच इतर वरिष्ठ अधिकार्यांनी ऑस्ट्रेलिया सरकारला द्विपक्षीय सहकार्य व व्यापारावरून इशारेही दिले होते.
मात्र चीनच्या दडपणापुढे न झुकता ऑस्ट्रेलियन सरकारने आपले आक्रमक धोरण कायम ठेवल्याचे नव्या ‘टास्क फोर्स’च्या स्थापनेवरून दिसून आले आहे. यासंदर्भात माहिती देताना पंतप्रधान मॉरिसन यांनी ऑस्ट्रेलियाला असणारा परदेशी हस्तक्षेपाचा धोका वाढत असल्याचा स्पष्ट उल्लेखही केला.
गेल्या वर्षभरापासून व्यापार, ‘साऊथ चायना सी’ व ‘इंडो-पॅसिफिक क्षेत्र’ यासह विविध मुद्यांवर ऑस्ट्रेलिया आणि चीनमधील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी चीनशी उघड संघर्षाची भूमिका घेतली असून कोणत्याही परिस्थितीत चीनचे दडपण अथवा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसल्याचे बजावले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलियात प्रभाव वाढविण्यासाठी प्रयत्न करणार्या चीनच्या सत्ताधारी राजवटीत चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |