चीनच्या वर्चस्ववादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनने जपानबरोबरील संरक्षण सहकार्य वाढविले – ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका जपानला भेट देणार

संरक्षण सहकार्य

लंडन/टोकिओ/बीजिंग – चीनच्या वर्चस्ववादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनने जपानबरोबरील संरक्षण सहकार्य वाढविण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांच्यासह उच्चस्तरीय शिष्टमंडळ जपानच्या भेटीवर असून यावेळी ही माहिती देण्यात आली. यावेळी ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्वीन एलिझाबेथ’ सप्टेंबर महिन्यात जपानला भेट देईल व यावेळी संयुक्त सराव पार पडेल, असे ब्रिटनकडून सांगण्यात आले. त्याचवेळी येत्या वर्षाच्या अखेरपासून ब्रिटन आपल्या दोन युद्धनौका कायमस्वरुपी ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात तैनात करणार असल्याचेही संरक्षणमंत्री वॉलेस यांनी जाहीर केले.

गेल्या काही वर्षात चीनच्या विस्तारवारी हालचाली वाढल्या असून साऊथ चायना सी, ईस्ट चायना सीसह संपूर्ण पॅसिफिक क्षेत्रावरील प्रभाव वाढविण्यासाठी आक्रमक धोरण राबविण्यात येत आहे. चीनच्या या आक्रमकतेला रोखण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला असून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकारी देशांसह युरोपातील मित्रदेशांनाही अधिक सक्रिय होण्यासाठी आवाहन केले आहे. त्यानंतर फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन यासारख्या देशांनी इंडो-पॅसिफिकमधील आपल्या हालचाली वाढविण्याचे संकेत दिले आहेत. या देशांनी त्यासाठी स्वतंत्र धोरणही जाहीर केले असून ‘फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन’चा मुद्दा पुढे करून संरक्षण तैनातीचे संकेत दिले आहेत.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/against-the-backdrop-of-chinas-hegemonic-actions-britain-increased-defense-cooperation-with-japan/