तेहरान – ‘इराण आपल्या सर्वात मोठ्या शत्रूच्या, अमेरिकेच्याविरोधात सर्वात मोठ्या युद्धासाठी तयार आहे. इराणची हजारो क्षेपणास्त्रे आखातातील अमेरिकेच्या २१ लष्करी तळांवर रोखलेली आहेत. इराण दरदिवशी २० हजार क्षेपणास्त्रांचे हल्ले चढवू शकतो’, असा इशारा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे वरिष्ठ कमांडर ‘जनरल अल्लानूर नूरोल्लाही’ यांनी दिला. त्याचबरोबर इस्रायलचे तेल अविव आणि हैफा ही दोन शहरे जमिनदोस्त करण्याची क्षमता इराणकडे असल्याचे जनरल नूरोल्लाही यांनी बजावले आहे.
गेल्या आठवड्यात बुशहर शहरात आयोजित लष्करी कार्यक्रमात बोलताना जनरल नूरोल्लाही यांनी इराणच्या या संरक्षणसिद्धतेचा नाटोलाही वचक असल्याचा दावा केला. इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स’ (आयआरजीसी) या लष्करी पथकाचे सल्लागार असलेल्या जनरल नूरोल्लाही यांनी इराणकडे क्षेपणास्त्रांची मोठी संख्या असल्याचे म्हटले आहे. ‘अमेरिका, रशिया आणि चीन पाठोपाठ इराण हा जगातील चौथ्या क्रमांकाचा क्षेपणास्त्र सामर्थ्य असलेला देश आहे’, अशी माहिती जनरल नूरोल्लाही या लष्करी कार्यक्रमात दिली.
‘दुर्दैवाने आखातातील काही देशांमध्ये इराणच्या शत्रूदेशाने लष्करी तळ ठोकले आहेत. असे असले तरी या शत्रूदेशाच्या आखातातील २१ लष्करी तळांवर इराणची क्षेपणास्त्रे रोखलेली आहेत. इराणमधील तब्बल ११० क्षेपणास्त्रांचे तळ, प्रक्षेपण तळ यातून दरदिवशी २० हजार क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले जाऊ शकतात, असे नाटोने म्हटले आहे. अमेरिकेनेही इराणच्या क्षेपणास्त्रांचे सामर्थ्य मान्य केले आहे. याखेरीज भुयारी क्षेपणास्त्र तळ आणि क्षेपणास्त्रांचे शहरच अमेरिकेवर हल्ल्यांसाठी सज्ज आहेत. यातून इराणची सज्जता आणि सामर्थ्य दिसून येते’, असे जनरल नूरोल्लाही यांनी अभिमानाने म्हटले आहे. इराणच्या वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओचे भाषांतर अमेरिकी कंपनीने केले आहे.
‘याचाच अर्थ इराण सर्वात मोठ्या शत्रूविरोधात सर्वात मोठे युद्ध छेडण्यासाठी सज्ज आहे’, असा दावा जनरल नूरोल्लाही यांनी केला. सौदी अरेबिया इतर आखातातील इतर देश इराणचे शत्रू नसल्याचे नूरोलाही यांनी सांगितले. पण अमेरिकेच्या आखाती मित्रदेशांनीच इराणला उसकविण्यात यश मिळविले तर इराणही माघार घेणार नाही, असे सांगून जनरल नूरोल्लाही यांनी सौदी व मित्रदेशांनाही धमकावले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे वरिष्ठ अधिकारी जनरल हुसेन सलामी यांनीही अमेरिका, इस्रायल आणि सौदीला नष्ट करण्याची क्षमता आपल्याकडे असल्याचा दावा केला होता.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |