दमास्कस- सिरियाच्या पूर्वेकडील ‘अल बुकमल’ भागात झालेल्या भीषण हवाई हल्ल्यांमध्ये शस्त्रास्त्रांची तीन कोठारे बेचिराख झाली. या हल्ल्यात सिरियातील इराणसंलग्न सशस्त्र गटाचे पाच जवान ठार झाल्याचा दावा केला जातो. पण हल्ल्यांची तीव्रता पाहता, मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते. दरम्यान, आठवड्याभरात सिरियातील इराणसंलग्न शस्त्रास्त्रांच्या कोठारांवर झालेला हा दुसरा हल्ला ठरतो.
स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराकच्या सीमेजवळील ‘अल बुकमल’ भागात शनिवारी रात्री उशिरा मोठे हवाई हल्ले झाले. लढाऊ विमानांनी हे हवाई हल्ले चढविल्याचा दावा स्थानिक वृत्तसंस्थेने केला. पण सदर लढाऊ विमाने कुठल्या देशाची होती, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’नी (आयआरजीसी) उभारलेली व संरक्षित केलेल्या शस्त्रास्त्रांच्या कोठारांना लक्ष्य करून हे हल्ले चढविण्यात आले होते. या कोठारांमध्ये इराणसंलग्न गटांबरोबरच ‘आयआरजीसी’च्या ‘कुद्स फोर्सेस’साठी मोठा शस्त्रसाठा जमा असल्याचेही बोलले जाते.
सदर कोठारे हवाई हल्ल्यात नष्ट झाल्यामुळे इराणला मोठा हादरा बसल्याचा दावा स्थानिक माध्यमे करीत आहेत. याआधी सिरियातील हवाई हल्ल्यांसाठी इस्रायलला जबाबदार धरणार्या सिरियाने या हल्ल्याबाबत माहिती किंवा प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. सात दिवसात सिरिया-इराकच्या सीमेजवळील इराणच्या कोठारावर झालेला हा दुसरा हवाई हल्ला ठरतो. याआधी बुधवारी ‘अल बुकमल’ येथील आणखी एका शस्त्रास्त्रांच्या कोठारावर हवाई हल्ला झाला होता. या हल्ल्याची बातमीदेखील स्थानिक माध्यमांनी दिली होती.
सिरिया-इराकच्या सीमेजवळील ‘अल बुकमल’ भाग हा इराणसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. इराणला इराकमार्गे भूमध्य समुद्राशी जोडणारा महामार्ग ‘अल बुकमल’ या भागातूनच जातो. व्यापारी वाहतुकीबरोबरच आखाती देशांमध्ये आपल्या सशस्त्र बंडखोरांची ने-आण करण्यासाठी इराण हा कॉरिडोर उभारत असल्याची टीका याआधी झाली होती. याच भागात इराणने ‘आयआरजीसी’, ‘अल कुद्स’ तसेच इतर सशस्त्र गटांसाठी शस्त्रास्त्रांची कोठारे उभारली आहेत. तसेच या भागात इराणचे लष्करी तळ असल्याचेही काही आठवड्यांपूर्वी उघड झाले होते.
दरम्यान, इराणनेदेखील आपल्या लष्करी तळ तसेच शस्त्रास्त्रांच्या कोठारावर झालेल्या हल्ल्यांना उत्तर म्हणून इस्रायलच्या गोलान भागात रॉकेट हल्ले चढविले होते. पण या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराने सिरियातील इराणचे लष्कर व इराणसंलग्न गटांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. अशा परिस्थितीत ‘अल बुकमल’ तळावरील शस्त्रास्त्रांच्या कोठारांवर होणारे हवाई हल्ले इराणसाठी नवा इशारा असल्याचा दावा केला जातो.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |