वॉशिंग्टन – पाकिस्तानकडून तालिबानला पुरविले जाणारे सहाय्य थांबले तर अफगाणिस्तानातील युद्ध काही आठवड्यात संपेल. म्हणूनच अमेरिकेने तालिबानशी चर्चा करण्यापेक्षा थेट पाकिस्तानशीच चर्चा करावी, अशी मागणी अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी केली आहे. कतारची राजधानी दोहा इथे अमेरिका आणि तालिबानची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सिनेटर ग्राहम यांची ही मागणी लक्ष वेधून घेणारी ठरते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्यासाठी उत्सुक आहेत. यासाठी त्यांनी तालिबानबरोबर चर्चेचा प्रस्ताव दिला होता. ही चर्चा सुरूही झाली होती. मात्र चर्चा सुरू असताना तालिबानने अफगाणिस्तानात भीषण दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरू ठेवले होते. याद्वारे सामर्थ्यप्रदर्शन करून चर्चेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न तालिबानने करून पाहिला. पण यानंतर अमेरिकेने ही चर्चाच रद्द करून टाकली.
याला तीन महिने उलटल्यानंतर, शनिवारपासून दोहा इथे अमेरिका आणि तालिबानमधली चर्चा नव्याने सुरू झाली आहे. पण तालिबानबरोबर चर्चा करण्याचा ट्रम्प प्रशासनानाचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी केला. तालिबानशी चर्चा करण्यापेक्षा अमेरिकेने थेट पाकिस्तानशी चर्चा करायला हवी, ते अधिक श्रेयस्कर ठरेल, असे सिनेटर लिंडसे ग्राहम यांचे म्हणणे आहे.
‘‘पाकिस्तानने आपल्या भूभागात तालिबानला ‘सुरक्षित स्वर्ग’ बहाल केला आहे. पाकिस्तानने हे संरक्षण नाकारले, तर तालिबानचा अवघ्या काही आठवड्यांमध्ये पराभव होऊ शकतो. त्यामुळे मला पाकिस्तानच्या वर्तनात सुधारणा होणे अपेक्षित आहे. अमेरिकेने यासाठी प्रयत्न करायला हवेत’’, असे ग्राहम यांनी सुचविले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |