रशिया व चीनचे अंतराळातील आव्हान मोडण्यासाठी अमेरिकन ‘स्पेस फोर्स’ कार्यरत

वॉशिंग्टन – ‘अंतराळक्षेत्र ही जगातील नवी युद्धभूमी आहे. अमेरिकेच्या सुरक्षेला असलेल्या धोक्यांचा विचार करता अंतराळक्षेत्रातील अमेरिकेचे वर्चस्व ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची ठरते. अमेरिका या क्षेत्रात पुढे आहे, मात्र फक्त पुढे असणे पुरेसे नाही. लवकरच अमेरिका या क्षेत्रात अग्रेसर असेल’, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘स्पेस फोर्स’ कार्यरत झाल्याची घोषणा केली. अमेरिकेचा हा ‘स्पेस फोर्स’ अंतराळक्षेत्रात रशिया व चीनने निर्माण केलेले आव्हान मोडण्यासाठी आणि भविष्यात अंतराळात होणार्‍या युद्धांसाठी उभारण्यात आल्याचे संकेतही अमेरिकी नेतृत्त्वाने दिले आहेत.

शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, ‘२०२० नॅशनल डिफेन्स ऑथोरायझेशन अ‍ॅक्ट’वर स्वाक्षरी केली. अमेरिकेच्या संरक्षणखर्चाची तरतूद असणार्‍या या कायद्यात ‘स्पेस फोर्स’च्या उभारणीस मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कायद्यावर स्वाक्षरी झाल्यानंतर एका कार्यक्रमादरम्यान ट्रम्प यांनी ‘स्पेस फोर्स’ स्थापन झाल्याची घोषणा केली. १९४७ नंतर प्रथमच अमेरिकेच्या संरक्षणदलात नव्या ‘फोर्स’ची भर पडत असून ‘स्पेस फोर्स’ संरक्षणदलातील सहावा महत्त्वाचा विभाग ठरला आहे. त्यापूर्वी अमेरिकी संरक्षणदलात लष्कर, नौदल, हवाईदल, ‘मरिन्स’ व तटरक्षकदलाचा समावेश होता.

‘स्पेस फोर्स’च्या स्थापनेची घोषणा करतानाच यापूर्वी स्थापन झालेल्या ‘स्पेस कमांड’चे प्रमुख म्हणून जनरल जे रेमंड यांची नियुक्तीही जाहीर करण्यात आली. ‘युएस स्पेस कमांड’ अंतर्गत अमेरिकेतील सहा हवाईतळांची निवड करण्यात आली असून कोलोरॅडो येथील ‘बक्ली एअर बेस’ हे ‘स्पेस कमांड’चे मुख्यालय राहणार आहे. ‘स्पेस कमांड’ तसेच ‘स्पेस फोर्स’साठी संरक्षणदलांकडून ३९० लष्करी अधिकारी, १८३ विशेष अधिकारी, ८२७ नागरी कर्मचारी आणि ५० कंत्राटदारांची निवड करण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यावेळी अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्परही उपस्थित होते. त्यांनी ‘स्पेस फोर्स’च्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली. ‘अमेरिकी यंत्रणा अंतराळात असलेल्या क्षमतांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. त्याचवेळी सध्या अंतराळक्षेत्र हे नवे रणांगण असेल, असे संकेतही मिळू लागले आहेत. या क्षेत्रात अमेरिकेचे प्रभुत्त्व कायम ठेवण्याची जबाबदारी स्पेस फोर्सवर असेल’, असे संरक्षणमंत्री एस्पर म्हणाले.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गेल्या वर्षीच अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’बाबत घोषणा करून खळबळ उडविली होती. त्यानंतर अत्यंत वेगाने हालचाली करून अमेरिकेने ‘स्पेस कमांड’ व ‘स्पेस फोर्स’ची स्थापना केली आहे. अंतराळातील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी ही ‘युनिफाईड कॉम्बॅट कमांड’ असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले होते.

या उभारणीमागे रशिया व चीनच्या अंतराळातील वाढत्या कारवाया हे प्रमुख कारण असल्याचे ट्रम्प यांनी वारंवार ठासून सांगितले आहे. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला हे दोन्ही देश अमेरिका अंतराळातील शस्त्रस्पर्धा व धोका वाढवित असल्याचा आरोप करीत आहेत. ‘अमेरिकेचे राजकीय व लष्करी नेतृत्त्व उघडपणे अंतराळ ही युद्धभूमी असल्याचे सांगत आहे. लवकरच अंतराळात लष्करी मोहिमा छेडण्याची मागणी अमेरिकी लष्करी व राजकीय नेते करीत आहेत’, असा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी नुकताच केला होता.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info