इराणमधील विमानाच्या दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता – युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे संकेत

इराणमधील विमानाच्या दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता – युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे संकेत

लंडन – इराणची राजधानी तेहरान येथून युक्रेनसाठी उड्डाण करणार्‍या ‘बोईंग ७३७’ प्रवासी विमानाला झालेल्या दुर्घटनेमागे घातपात असण्याची शक्यता आहे. तांत्रिक बिघाडामुळे नाही तर रॉकेट हल्ल्याद्वारे हे विमान पाडले गेले असावे, असा दावा ब्रिटिश वृत्तपत्राने केला. तर युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सचिव ‘ओलेक्सि डॅनीलोव्ह’ यांनीही दुर्घटनेजवळच्या भागात सापडलेल्या रशियन रॉकेट्सच्या तुकड्याची तपासणी करणे आवश्यक असल्याचे लक्षवेधी विधान केले आहे.

मंगळवारी रात्री तेहरानहून १७६ प्रवाशांना घेऊन युक्रेनची राजधानी किव्हसाठी निघालेले विमान ‘इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळा’पासून जवळच असणार्‍या ‘परांद’ येथील एका ओसाड भागात सदर विमान कोसळले. विमानाचे इंजिन बिघडल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती इराणच्या यंत्रणांनी प्रसिद्ध केली होती. वैमानिकाचे नियंत्रण सुटल्यामुळे देखील दुर्घटना घडली असावी, असा दावाही इराणने केला होता. पण विमानाच्या सुट्या भागातून जप्त करण्यात आलेला ‘ब्लॅक बॉक्स रेकॉर्डर’ ‘बोईंग’ कंपनीला व पर्यायाने अमेरिकेला देण्यास इराणने नकार दिला होता.

मात्र इराणच्या सोशल मीडियातून काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्या ठिकाणी विमान कोसळले, तिथपासून जवळच असलेल्या परांदच्या रहिवाशी भागात, एका खड्यात रॉकेटचा सुटा भाग सापडला आहे. तर बरोबर विरुद्ध दिशेला इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचा तळ आहे. ब्रिटनच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने या रॉकेटच्या फोटोग्राफ्ससह बातमी प्रसिद्ध करून सदर दुर्घटनेमागे घातपात असल्याचा दावा केला.

त्यानंतर युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सचिव डॅनीलोव्ह यांनीही आपल्या विमानाच्या दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे. आपल्या तपास पथकाची चौकशी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारची शक्यता धुडकावता येणार नाही, असे डॅनीलोव्ह यांनी सांगितले. त्याचबरोबर रहिवाशी भागात सापडलेल्या रॉकेटचा सुटा भाग ताब्यात घेऊन त्यासंबंधी तपास करणे आवश्यक बनल्याचे डॅनीलोव्ह म्हणाले.

दरम्यान, हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले नसून या विमानावर हल्ला चढवून ते पाडण्यात आले असावे, असा दाट संशय याआधीच जगभरातील विश्‍लेषकांनी व्यक्त केला होता. हे विमान इराणने पडल्याचे उघड झाल्यास, त्याचे भयंकर परिणाम नजिकच्या काळात समोर येऊ शकतात.

 English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info