इराणमध्ये आत्मघाती हल्लेखोरांचे रजिस्ट्रेशन सुरू अमेरिका-इस्रायलवरील हल्ल्यासाठी इराणच्या विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेतल्याचा माध्यमांचा दावा

इराणमध्ये आत्मघाती हल्लेखोरांचे रजिस्ट्रेशन सुरू अमेरिका-इस्रायलवरील हल्ल्यासाठी इराणच्या विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेतल्याचा माध्यमांचा दावा

तेहरान/वॉशिंग्टन – कासेम सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेऊन अमेरिका व इस्रायलवर आत्मघाती हल्ले चढविणार्‍या इच्छुकांच्या नावांची नोंदणी इराणच्या विद्यापीठामध्ये केली जात आहे. इराणच्या माध्यमांनीच ही बातमी प्रसिद्ध करून खळबळ माजविली. इतकेच नाही तर यासाठीचा अर्ज देखील इराणच्या माध्यमांनी वेबसाईटवर प्रसिद्ध केला. इराणकडे अमेरिकेइतके लष्करी सामर्थ्य नसेल, पण दहशतवादी हल्ल्यांद्वारे इराण अमेरिका व इस्रायलला जेरीस आणू शकतो, असा संदेश याद्वारे इराणची राजवट देत आहे.

इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांचा संदेश या अर्जामध्ये आहे. ‘कासेम सुलेमानी यांचा खून करणार्‍या गुन्हेगारांचा सूड घ्या. या द्रोह्यांना ठार करा. यासाठी योजना आखली जात असून अमेरिका व इस्रायलवर आत्मघाती हल्ले चढविण्यासाठी आत्मघाती हल्लेखोरांची गरज आहे. त्यासाठी हा नोंदणीअर्ज भरा’, असे या फार्सी भाषेतील अर्जात म्हटले आहे. इराणमधील राजवटीला कंटाळून पळ काढलेल्या ‘आमिर अब्बास फखरावर’ यांनी अमेरिकी वृत्तपत्रासाठी या अर्जाचे भाषांतर केले.

आत्मघाती हल्लेखोर तयार करण्याचे हे नोंदणी अर्जांचे वाटप इराणच्या ‘इस्लामिक आझाद विद्यापीठा’त करण्यात येत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले नाव, जन्मदिनांक, शैक्षणिक पात्रता, व्यवसाय, फोन नंबर तसेच विशेष कौशल्य असल्यास, त्याची नोंद करण्याची सूचना यात केल्याचे अमेरिकी वृत्तपत्राने म्हटले आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सशी संलग्न असलेली विद्यार्थी संघटना ‘बसिज मिलिशिया’कडून या अर्जांचे वाटप केले जात आहे.

एकेकाळी कासेम सुलेमानी यांनी नेतृत्व केलेल्या ‘बसिज मिलिशिया’ या संघटनेकडून आत्मघाती हल्लेखोरांची भरती केली जाते. त्याचबरोबर इराणमधील राजवटीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला चिरण्यासाठी हिंसक कारवाईसाठी देखील या संघटनेचा वापर केला जात असल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, अमेरिका व इस्रायलवर हल्ले चढविण्यासाठी इराणच्या राजवटीकडून विद्यापीठाचा वापर केला जात असताना, इराणमधील राजवटविरोधी आंदोलनात विद्यार्थ्याचा सहभाग वाढत असल्याचे दिसत आहे. या आंदोलनाचे केंद्र देखील इराणमधील विद्यापीठांमध्येच असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. काही ठिकाणी तरुणांनी इराणच्या नेत्यांचे पोस्टर्स फाडल्याचे व्हिडिओज् देखील प्रसिद्ध झाले आहेत.

त्याचबरोबर अमेरिका व इस्रायलचा ध्वज पायाखाली तुडविण्याचे नाकारून तसे करणार्‍यांचा निषेध केल्याच्या घटनाही इराणमध्ये घडल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची दखल घेऊन इराणी निदर्शकांचे कौतुक केले आहे. तसेच या निदर्शकांना ठार करू नका, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणच्या राजवटीला बजावले आहे. अन्यथा याचे गंभीर परिणाम सहन करावे लागतील, अशी धमकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info