अमेरिकेप्रमाणे जपानही ‘स्पेस फोर्स’ उभारणार  – जपानचे पंतप्रधान ऍबे शिंजो यांची घोषणा

अमेरिकेप्रमाणे जपानही ‘स्पेस फोर्स’ उभारणार  – जपानचे पंतप्रधान ऍबे शिंजो यांची घोषणा

टोकिओ – ‘‘अंतराळातील जपानचे उपग्रह, रॉकेट्स तसेच इतर हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी जपानदेखील ‘स्पेस फोर्स’ उभारणार आहे’’, अशी घोषणा पंतप्रधान ऍबे शिंजो यांनी केली. जपानची ही स्पेस फोर्स अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’बरोबर समन्वयाने काम करील, असे पंतप्रधान ऍबे यांनी स्पष्ट केले. जपानच्या लष्करी हालचाली आपल्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा आरोप करणार्‍या चीनकडून यावर प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

पंतप्रधान ऍबे यांनी सोमवारी संसदीय सत्र संबोधित करताना ‘स्पेस डोमेन मिशन युनिट’ अर्थात ‘स्पेस फोर्स’ची योजना मांडली. येत्या एप्रिल महिन्यात जपानच्या वायुसेनेच्या नेतृत्वाखाली हा ‘स्पेस फोर्स’ची निर्मिती होईल. यासाठी राजधानी टोकिओजवळ असलेल्या ‘फुचू’ हवाईतळाचा वापर करण्यात येईल. प्राथमिक स्तरावर या ‘स्पेस फोर्स’च्या युनिटमध्ये २० कर्मचारी असतील. पण पुढच्या काळात या कर्मचारी, सैनिक व अधिकार्‍यांची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती ऍबे यांनी दिली. ऍबे सरकारने या ‘स्पेस फोर्स’साठी सुमारे ४६ कोटी डॉलर्सची तरतूद केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच ही तरतूद करण्यात आली होती, असेही पंतप्रधान ऍबे यांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभारलेल्या ‘स्पेस फोर्स’ कमांडबरोबर जपानचे ‘स्पेस फोर्स’ पथक काम करील. पण जपानच्या ‘स्पेस फोर्स’ची भूमिका ही बचावात्मक असेल. या ‘स्पेस फोर्स’च्या माध्यमातून जपान कुठल्याही देशावर हल्ले चढविणार नाही, असे ऍबे यांनी स्पष्ट केले.

मात्र अंतराळात कार्यरत असणारे जपानचे उपग्रह, प्रक्षेपित केले जाणारे रॉकेट्स तसेच संबंधित घटकांच्या सुरक्षेसाठी ही स्पेस फोर्स कार्यरत असेल. यावेळी जपानच्या पंतप्रधानांनी उघडपणे चीन आणि रशियाचा उल्लेख टाळला. पण ‘शत्रू देश वेगाने आपल्या क्षेपणास्त्रांच्या सामर्थ्यात वाढ करीत आहेत. त्याचबरोबर काही देशांनी सायबरस्पेस व इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा वापर करून अंतराळातील महत्त्वाची उपग्रह निकामी करण्यापर्यंतही मजल मारली आहे. अशा देशांनी आपल्या सामर्थ्याचा वापर केला तर जागतिक संपर्कव्यवस्था कोलमडू शकते व त्यानंतर फार मोठ्या उलथापालथी होऊ शकतात. अशा परिस्थितीत, जपानने अंतराळातील आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी अशी कारवाई करणे अत्यंत आवश्यक ठरते’, असे ऍबे म्हणाले.

दरम्यान, दशकभर आधी चीनने उपग्रहभेदी क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती. सायबर युद्धाच्या क्षेत्रातही चीनचे हॅकर्स पुढे असल्याच्या बातम्या याआधी प्रसिद्ध झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर, जपानच्या पंतप्रधानांनी ‘स्पेस फोर्स’ची घोषणा करून चीनला संदेश दिल्याचे दिसत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info