बीजिंग/वुहान – चीनमधील ‘वुहान व्हायरस’ची साथ वेगाने फैलावत चालल्याची माहिती समोर आली आहे. ही साथ रोखण्यासाठी आता चीनने ‘वुहान व्हायरस’चे मूळ असलेल्या ‘वुहान’ शहरासह शेजारी असलेल्या ‘हुआनगँग’ शहरात ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली आहे. गुरुवार सकाळपासून दोन्ही शहरांमध्ये येण्याचे तसेच बाहेर पडण्याचे सर्व मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. त्याचवेळी शहरातील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीमही हाती घेण्यात आली आहे.
गेल्या वर्षाच्या अखेरीस समोर आलेल्या ‘वुहान व्हायरस’ची साथ प्रचंड वेगाने पसरत असून चीन वगळता जगातील सहा देशांमध्ये या साथीचे रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी सकाळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘वुहान व्हायरस’ची लागण झालेल्यांची संख्या जवळपास ६५० इतकी झाली आहे. त्यात एकट्या चीनमधील ६२८ जणांचा समावेश असून साथीत मृत्यू झालेल्यांची संख्या १७ वर गेली आहे.
जगभरातील बहुतांश देशांनी आरोग्य यंत्रणांना पूर्ण सज्जतेचे इशारे दिले असून विमानतळ तसेच बंदर भागात विशेष तपासणी यंत्रणा उभारल्या आहेत. रशियातील सूत्रांनी चीनमधील ‘वुहान व्हायरस’ची साथ देशासाठी ‘बायोलॉजिकल थ्रेट’ ठरु शकते, असा इशारा देऊन खळबळ उडवली आहे. चीनच्या यंत्रणांकडून ‘वुहान व्हायरस’ची लागण झालेल्यांची संख्या ६०० हून अधिक असल्याचे सांगण्यात येत असले तरी आंतरराष्ट्रीय गटांनी ही आकडेवारी चुकीची असल्याचा दावा केला आहे.
फक्त चीनमध्येच या साथीची लागण १० हजारांहून अधिक जणांना झाली असावी, अशी भीती युरोपातील संशोधकांनी व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून ‘वुहान व्हायरस’बाबत विशेष दक्षता घेण्याबाबत निवेदन जारी करण्यात आले असून त्यावर लस विकसित करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचेही सांगण्यात आले आहे.
चीनच्या वुहान शहरातील ‘सीफूड मार्केट’ व सभोवतालच्या परिसरातून साथीचा फैलाव सुरू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याचे मूळ शोधण्यात चीनच्या यंत्रणांना अद्यापही यश मिळालेले नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेसह इतर आंतरराष्ट्रीय गटांनी नाराजी व्यक्त केली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही चीनच्या ‘वुहान व्हायरस’च्या वाढत्या व्याप्तीची दखल घेतली असून चीन योग्य पावले उचलेल, असे आश्वासन दिले आहे.
यापूर्वी २००२ साली चीनमध्ये आलेल्या ‘सार्स’च्या साथीमुळे शेकडो जणांचा बळी गेला होता.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |