इराणचे सर्वोच्च धर्मगुरू खामेनी आणि राष्ट्राध्यक्ष रोहानी यांच्यामधील मतभेद तीव्र – अमेरिकी वृत्तपत्राचा दावा

इराणचे सर्वोच्च धर्मगुरू खामेनी आणि राष्ट्राध्यक्ष रोहानी यांच्यामधील मतभेद तीव्र – अमेरिकी वृत्तपत्राचा दावा

तेहरान – इराणमध्ये सर्वाधिक राजकीय अधिकार हाती असलेले सर्वोच्च धर्मगुरू आयातुल्ला खामेनी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांच्यामधील वाद तीव्र बनला आहे. ८ जानेवारी रोजी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डकडून युक्रेनचे प्रवासी विमान पाडण्यात आले होते. खामेनी यांच्या आदेशावरून हा हल्ला चढविण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध झाली होती. या हल्ल्याबाबत राष्ट्राध्यक्ष रोहानी यांना माहिती नव्हती व म्हणून त्यांनी ही ‘अक्षम्य’ कारवाई असल्याचे जळजळीत प्रतिक्रिया नोंदविली होती. या हल्ल्याबाबतची माहिती दडविण्याचा प्रयत्न झाला, तर आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारीही रोहानी यांनी दाखविल्याचे एका अमेरिकी दैनिकाने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

८ जानेवारी रोजी राजधानी तेहरानवरुन उड्डाण केलेले युक्रेनचे प्रवासी विमान पुढच्या काही सेकंदातच कोसळले होते. यात १७६ प्रवाशांचा बळी गेला होता. इराणचे राष्ट्राध्यक्ष रोहानी तसेच ‘आयआरजीसी’ने हा एक अपघात असल्याचे म्हटले होते. तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याचा दावा ‘आयआरजीसी’ने केला होता. पण हा अपघात नाही तर घातपात असल्याचे पुरावे आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी ‘आयआरजीसी’ला धमकावले होते, असे अमेरिकी वृत्तपत्राने आपल्या बातमीत म्हटले आहे.

‘युक्रेनच्या प्रवासी विमानाबाबत घडलेल्या घटनेचे सत्य उघड करा, अन्यथा राजीनामा देईन’, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी ‘आयआरजीसी’ला दिला होता. राष्ट्राध्यक्ष रोहानी यांचा हा इशारा ‘आयआरजीसी’ नाही तर इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते खामेनी यांच्यासाठी होता, असा दावा अमेरिकी वृत्तपत्राने केला.

‘आयआरजीसी’सह इराणमधील प्रमुख सुरक्षा तसेच न्यायालयीन यंत्रणांची सूत्रे खामेनी यांच्या हाती आहेत. त्यांच्या आदेशाशिवाय इराणच्या सुरक्षा यंत्रणा एक पाऊलही पुढे टाकत नाहीत, असा दावा केला जातो. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी ‘आयआरजीसी’ला धमकावून खामेनी यांनाच इशारा दिल्याचे सदर वृत्तपत्राने म्हटले आहे.

या इशार्‍यानंतर पुढच्या काही तासात ‘आयआरजीसी’चे प्रमुख जनरल आमिर अली हाजीझदेह यांनी युक्रेनच्या विमानावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी देखील प्रवासी विमानावरील सदर हल्ला म्हणजे अक्षम्य चूक असल्याचे सांगून यासाठी जबाबदार असणार्‍या प्रत्येकाला शिक्षा झाली पाहजे, असे रोहानी यांनी म्हटले होते. तर सर्वोच्च नेते खामेनी यांनी ‘आयआरजीसी’च्या हल्ल्याची पाठराखण करून यासाठी अमेरिकेला जबाबदार धरले होते.

या प्रतिक्रियेनंतर इराणमधूनच सर्वोच्च धार्मिक नेते खामेनी यांच्याविरोधात जोरदार निदर्शने भडकली. खामेनी यांची राजवट उलथून टाकण्याची मागणी या निदर्शकांनी केली. पुढे खामेनी यांच्या आदेशानंतर ‘आयआरजीसी’ व बसिज मिलिशिया या गटांनी निदर्शकांवर कारवाई केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे इराणमधील जनमत देखील सर्वोच्च धार्मिक नेते खामेनी व ‘आयआरजीसी’च्या विरोधात गेल्याचे दिसत आहे.

दरम्यान, याआधी इराणमधील निदर्शनांवरुन रोहानी-खामेनी यांच्यातील मतभेद समोर आले होते. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ इराणच्या ५० हून अधिक शहरांमध्ये सुरू असलेल्या निदर्शनात जनतेने खामेनी यांची राजवट उलथण्याची मागणी केली होती. पुढे ‘आयआरजीसी’ व सुरक्षा यंत्रणांनी निदर्शकांवर केलेल्या कारवाईवर राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळे रोहानी आणि खामेनी यांच्यातील तणाव समोर आला होता.

English  हिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info