लिबियातील संघर्षात रशियन सैनिकांना ठार करा – सिरियन बंडखोरांना तुर्कीचे आदेश

लिबियातील संघर्षात रशियन सैनिकांना ठार करा – सिरियन बंडखोरांना तुर्कीचे आदेश

कैरो/दमास्कस – ‘लिबियातील सराज राजवटीच्या समर्थनासाठी संघर्ष करताना समोर रशियन सैनिक दिसतील तिथे त्यांना ठार करा’, असे आदेश तुर्कीने आपल्या हस्तकांना दिले आहेत. सिरियातून लिबियात दाखल झालेले सिरियन बंडखोर तुर्कीसाठी कंत्राटी सैनिकांचे काम करीत असून त्यांनाच तुर्कीने हे आदेश दिल्याची माहिती एका संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सिरियातील संघर्षावरूनही तुर्की आणि रशिया एकमेकांसमोर खडे ठाकल्याचे दिसत आहे.

लिबियामध्ये दाखल झालेल्या सिरियातील तुर्कीसंलग्न बंडखोरांनी एका शोधपत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. सदर बंडखोर सिरियाच्या इदलिब प्रांतातील असल्याचे या मुलाखतीतून समोर आले आहे. ‘अजूनही लिबियामध्ये मोठा संघर्ष भडकलेला नाही. पण लवकरच तुर्कीचे लष्कर आणि त्यांनी पुरविलेल्या शस्त्रास्त्रांच्या सहाय्याने लिबियामध्ये घनघोर संघर्ष सुरू होईल आणि या संघर्षात आम्ही रशियाला पराभूत करू’, असा दावा एका तुर्कीसंलग्न सिरियन बंडखोराने केला.

तर ‘सिरियामध्ये रशियन सैनिकांशी आमचा थेट संघर्ष झाला नाही. मात्र लिबियामध्ये तशी संधी मिळेल, कारण इथे रशियाचे सैनिक तैनात आहेत. म्हणून सिरियातील आपली शहरे नष्ट करणार्‍या या रशियन सैनिकांचा सूड घेण्यासाठी सिरियन बंडखोर लिबियात दाखल होत आहेत. तुर्कीने या रशियन सैनिकांवर हल्ले चढविण्याची परवानगी आम्हाला दिलेली आहे’, अशी माहिती आणखी एका सिरियन बंडखोराने सदर शोध पत्रकाराला दिली. यासाठीच सिरियातील तुर्कीसंलग्न बंडखोर मोठ्या संख्येने लिबियात दाखल होत असल्याचे सदर संकेतस्थळाने म्हटले आहे.

तुर्की या बंडखोरांना ट्युनिशियामार्गे लिबियात दाखल करीत आहे. तसेच या सिरियन बंडखोरांना तुर्की हजारो डॉलर्सचे वेतन देत असल्याची माहिती याआधीच प्रसिद्ध झाली होती. तुर्कीने आपल्यावरील हे आरोप फेटाळले असून आपले लष्करी सल्लागार लिबियात असल्याचे म्हटले होते. लिबियातील सराज राजवटीने देखील तुर्कीसंलग्न सिरियन बंडखोर किंवा तुर्कीचे कंत्राटी सैनिक आपल्या देशात नसल्याचा दावा केला होता. पण सराज यांच्या निवासस्थानाबाहेर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सिरियन बंडखोर तैनात असल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले होते.

तुर्की लिबियात रवाना करीत असलेले हे सिरियन बंडखोर, ‘अल कायदा’ आणि ‘आयएस’ या संघटनांशी संलग्न असल्याचा आरोप लिबियातील हफ्तार बंडखोर व सिरियन मानवाधिकार संघटना करीत आहे. सिरियातील संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर, तुर्कीने आपली सीमारेषा सिरियन निर्वासितांसाठी खुली ठेवली आहे. या निर्वासितांच्या आडून सिरियातील दहशतवादी व कट्टरपंथी तुर्कीत दाखल झाले आहेत. तुर्की याच दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांनी सज्ज करून प्रवासी विमानातून कंत्राटी सैनिक म्हणून लिबियात रवाना करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सिरियातील संघर्षात रशिया आणि तुर्कीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. सिरियन लष्कर आणि रशियाच्या हल्ल्यात आपले पाच सैनिक गमावल्यानंतर तुर्की अधिकच आक्रमक बनला आहे. तुर्कीने लिबियात लढत असलेल्या सिरियन बंडखोरांना दिलेले आदेश या आक्रमकतेची साक्ष देत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info