Breaking News

तुर्कीच्या हल्ल्यात ५० हून अधिक सिरियन सैनिक ठार – तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाची माहिती

अंकारा/दमास्कस – इदलिबमध्ये सिरिया आणि तुर्कीच्या लष्करात संघर्ष पेटला आहे. सिरियाच्या हवाई हल्ल्यात आपले दोन सैनिक गमावल्यानंतर खवळलेल्या तुर्कीने दिलेल्या प्रत्युत्तरात ५० हून अधिक सिरियन जवानांना ठार केल्याचा दावा केला. त्याचबरोबर सिरियन राजवटीचे इदलिबमधील हल्ले सुरू असेपर्यंत तुर्कीचे लष्कर माघार घेणार नसल्याचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी म्हटले आहे. दरम्यान, रशियाची लढाऊ विमाने तुर्कीच्या लष्करावर कारवाई करून सिरियन सैनिकांवरील हल्ले उधळून लावत असल्याची माहिती समोर येत आहे.

       

सिरियन लष्कराच्या इदलिबमधील कारवाईला लवकरच प्रत्युत्तर देऊ, अशी धमकी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी काही तासांपूर्वी केली होती. त्यांच्या या धमकीनंतर सिरिया व रशियन लढाऊ विमानांनी तुर्कीसंलग्न गटांच्या ठिकाणांवर हल्ले चढविल्याचा दावा केला. इदलिबवर पूर्ण ताबा मिळविण्यासाठी ही कारवाई केल्याचे सिरियन लष्कराने म्हटले आहे. पण सिरियन लष्कराच्या या कारवाईत आपले दोन सैनिक ठार झाल्याचा दावा तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने केला.

‘आपले सैनिक शांती प्रस्थापित करण्यासाठी आणि मानवतावादी सहाय्य पुरविण्यासाठी इदलिबमध्ये तैनात असताना सिरियन राजवटीने हा हल्ला चढविला’, अशी टीका तुर्कीने केली. यानंतर तुर्कीच्या लष्कराने चढविलेल्या हल्ल्यात सिरियन लष्कराची मोठी हानी झाली. या हल्ल्यात ५० हून अधिक सिरियन सैनिक ठार झाले. तसेच सिरियन लष्कराचे पाच रणगाडे, दोन लष्करी वाहने, दोन लष्करी ट्रक आणि एक हॉवित्झर तोफ उद्ध्वस्त झाल्याचा दावा तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने केला.

तुर्कीच्या या दाव्याबाबत सिरियन लष्कराने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण गेल्या महिन्याभरात तुर्कीने सिरियन लष्करावर चढविलेला हा दुसरा मोठा हल्ला ठरतो. याआधी सिरियन लष्कराच्या इदलिबमधील हल्ल्यात तुर्कीचे १३ सैनिक ठार झाले होते. त्यानंतर तुर्कीने सिरियन लष्कराचे ७० हून अधिक सैनिकांना मारल्याचा दावा केला होता. पुन्हा आपल्या सैनिकांवर हल्ला झालाच तर सिरियात कुठल्याही ठिकाणी हल्ले चढविण्याची धमकी तुर्कीने दिली होती.

दरम्यान, सिरियन लष्कर लक्ष्य करीत असलेल्या दहशतवाद्यांच्या बचावासाठी तुर्की सिरियन सैनिकांवर हल्ले चढवित असल्याचा आरोप रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. यामुळे सिरिया व तुर्कीच्या लष्करात संघर्ष पेटत असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. सिरियन लष्कराच्या बरोबरीने रशियाची ‘सुखोई-२४’ लढाऊ विमाने देखील तुर्कीसंलग्न दहशतवाद्यांना लक्ष्य करीत आहेत.

English    हिंदी    

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info