कॅराकस/वॉशिंग्टन – व्हेनेझुएलाचे हुकूमशहा निकोलस मदुरो यांच्याविरोधात बंड घडवून त्यांची राजवट उलथवण्याचा कट उधळला गेला आहे. निकोलस मदुरो यांनी सरकारी वृत्तवाहिनीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून दोन अमेरिकी सैनिकांना अटक केल्याचेही जाहीर केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मदुरो यांचा दावा फेटाळला आहे. मात्र अमेरिकेतील एका कंपनीने व्हेनेझुएलाचे नेते जुआन गैदो यांनी आपल्याला मदुरो यांना पकडण्याचे कंत्राट दिले होते, असे सांगून खळबळ उडवली.
सोमवारी व्हेनेझुएलाचे हुकूमशहा मदुरो यांनी त्यांच्याविरोधात अमेरिकेने आखलेला कट फसल्याचा दावा केला. व्हेनेझुएलाच्या यंत्रणांनी आठ दहशतवाद्यांना ठार केल्याचे व १३ जणांना ताब्यात घेतल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मदुरो यांनी दोन अमेरिकी पासपोर्ट दाखवून अमेरिकी सैनिकांना अटक केल्याचीही माहिती दिली. यावेळी अमेरिकी सैनिकांची नावेही जाहीर करण्यात आली असून ती ल्यूक डेन्मान व ऐरन बेरी अशी आहेत.
व्हेनेझुएलाच्या हुकूमशहांनी केलेल्या दाव्यांनुसार, रविवारी पहाटे सुरक्षा यंत्रणांनी ला गुएरा बंदरात धडक कारवाई केली. यावेळी आठ दहशतवाद्यांना ठार करून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान स्पीडबोटस् व शस्त्रसाठा जप्त करण्यात करण्यात आल्याचेही मदुरो यांनी सांगितले. आपल्याविरोधातील या कटात अमेरिकेबरोबरच कोलंबियाचाही हात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मात्र अमेरिकेने मदुरो यांचे सर्व दावे फेटाळले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, व्हेनेझुएलातील घटनांशी अमेरिका सरकारचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने, मदुरो यांची पत्रकार परिषद म्हणजे ‘मेलोड्रामा’ असल्याचे सांगून क्युबन गुप्तचर यंत्रणेच्या सहाय्याने हे सर्व घडविण्यात आल्याचे म्हटले आहे. देशातील समस्यांपासून लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली.
दरम्यान, अमेरिकेतील एक सुरक्षा कंपनी ‘सिल्व्हरकॉर्प यूएसए’ने व्हेनेझुएलात पकडण्यात आलेले सैनिक आपले असल्याचा दावा करून खळबळ उडवली. कंपनीचे प्रमुख जॉर्डन गोद्रेऊ यांनी ही माहिती देतानाच,व्हेनेझुएलातील नेते जुआन गैदो यांनी मदुरो यांना पकडण्याचे कंत्राट दिले होते, असा दावाही केला. गैदो यांच्या कार्यालयाकडून हा दावा नाकारण्यात आला आहे.
व्हेनेझुएलात गेले दोन वर्षे अराजकसदृश स्थिती असून ४० लाखांहून अधिक नागरिकांनी देशा बाहेर स्थलांतर केले आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला आली असून जनतेला मोठ्या प्रमाणावर उपासमारी व रोगराईला तोंड द्यावे लागत आहे. मात्र रशिया, चीन व क्युबा या देशांकडून मिळणाऱ्या समर्थनाच्या जोरावर मदुरो यांनी आपली सत्ता टिकवण्यात यश मिळवले आहे.
मदुरो यांच्या हुकूमशाहीविरोधात विरोधी गटांनी आंदोलन सुरू केले असून त्याचे नेतृत्व जुआन गैदो यांच्याकडे आहे. गैदो यांना अमेरिका व युरोपिय देशांसह जगातील ५०हुन अधिक देशांनी पाठिंबा दिला आहे. पण या देशांकडून सहाय्य मिळत असूनही मदुरो यांची राजवट उलथवण्यात त्यांना अद्याप यश मिळालेले नाही.
अमेरिकेने मदुरो यांच्याविरोधात ‘ब्लॉकेड’ लागू करून त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न केले आहेत. त्याचवेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेसमोर इतर पर्याय उपलब्ध असल्याचेही वारंवार बजावले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |