अम्मान – ‘एक राष्ट्र हाच तोडगा असल्याचा पुरस्कार करणाऱ्या नेत्यांना त्याचा नक्की अर्थ काय, याची जाणीव नाही. जर पॅलेस्टिनी नॅशनल अथॉरिटी कोसळली तर आखातात कट्टरवाद आणि अराजक फोफावेल. इस्रायलने जुलै महिन्यात वेस्ट बँकेचा भूभाग खरोखरच ताब्यात घेतला तर त्यांना जॉर्डनबरोबर प्रचंड मोठा संघर्ष करावा लागेल’, अशा जळजळीत शब्दात जॉर्डनचे राजे अब्दुल्लाह यांनी इस्रायल-जॉर्डन युद्धाचा इशारा दिला.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी गेल्या वर्षी इस्रायलची पूर्वेकडील सीमा म्हणून जॉर्डन व्हॅलीवर अधिकार प्रस्थापित करण्याची घोषणा केली होती. इस्रायलच्या या योजनेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाठिंबा दिला आहे. मात्र आखाती देश आणि युरोपने इस्रायल व अमेरिकेच्या योजनांना तीव्र विरोध केला आहे. युरोपिय महासंघाने नुकताच इस्रायलविरोधात राजनैतिक हालचालींना अधिक वेग देण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर, जॉर्डनचे राजे अब्दुल्लाह यांनी जर्मन साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत, इस्रायलविरोधात युद्ध छेडण्याचा इशारा दिला. ‘मला उगाच धमक्या द्यायच्या नाहीत आणि संघर्षाचे वातावरण तयार करायचे नाही. मात्र जॉर्डन सर्व पर्यायांवर विचार करीत आहे’, अशा शब्दात जॉर्डनचे राजे अब्दुल्लाह यांनी इस्रायलविरोधात युद्धासाठी जॉर्डन तयार असल्याचे संकेत दिले.
आखातातील अनेक देशांनी इस्रायलला अजूनही मान्यता दिलेली नाही. मात्र इजिप्त व जॉर्डन या दोन देशांनी शांतीकरार करून इस्रायलला मान्यता दिली आहे. इजिप्तने १९७९ तर जॉर्डनने १९९४ साली इस्रायलबरोबर शांती करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यामुळे इतर आखाती देशांच्या तुलनेत जॉर्डनची इस्रायलबाबतची भूमिका बऱ्याच अंशी उदार राहिलेली आहे. या पार्श्वभूमीवर जॉर्डनचे राजे अब्दुल्लाह यांनी इस्रायलला दिलेली ही धमकी लक्षवेधी ठरते.
अमेरिकेने जेरुसलेम इस्रायलची राजधानी घोषित करणे, त्यानंतर इस्रायल-पॅलेस्टाइनला दिलेला नवा शांती प्रस्ताव आणि इस्रायली पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्याकडून जॉर्डन व्हॅली व इतर भाग ताब्यात घेण्याची घोषणा यावर जॉर्डनने तीव्र असंतोष व्यक्त केला होता. जॉर्डनचा हा असंतोष आता इस्रायलला युद्धाचे इशारे देण्याच्या पातळीवर पोहोचला असून याचे फार मोठे पडसाद आखाती क्षेत्रात उमटू शकतात. इस्रायलला विरोध करणारे आखातातील देश व संघटना या मुद्यावर जॉर्डनची बाजू उचलून धरू शकतात. त्यामुळे आखातात इस्रायलविरोधातील रोष उफाळून वर येण्याची शक्यता आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |