अंतराळातील वर्चस्वासाठी अमेरिकेकडून जोरदार हालचाली – ‘अर्ली वॉर्निंग सिस्टिम’ व ‘सॅटेलाईट नेटवर्क’च्या उभारणीला वेग

अंतराळातील वर्चस्वासाठी अमेरिकेकडून जोरदार हालचाली – ‘अर्ली वॉर्निंग सिस्टिम’ व ‘सॅटेलाईट नेटवर्क’च्या उभारणीला वेग

वॉशिंग्टन – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर चीन व रशियासारख्या देशांनी वरचढ होऊ नये यासाठी अमेरिकेने अंतराळक्षेत्रात वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘स्पेस फोर्स’च्या ध्वजाचे अनावरण केल्यानंतर एकापाठोपाठ घडलेल्या घटना याला पुष्टी देणाऱ्या ठरतात. यात ‘एक्स-३७बी’ या ‘स्पेसप्लेन’चे उड्डाण, ‘अर्ली वॉर्निंग सिस्टिम’साठी दिलेले कंत्राट व १५० उपग्रहांच्या ‘नेटवर्क’चा प्रस्ताव यांचा समावेश आहे.

गेल्या काही वर्षांत चीन व रशिया या दोन्ही देशांनी अंतराळक्षेत्रात वर्चस्व मिळविण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. काही दिवसांपूर्वीच चीनने आपल्या ‘स्पेस स्टेशन’साठी ‘लॉंग मार्च ५बी’ हे रॉकेट अवकाशात सोडले होते. त्यापूर्वी चीनने ‘अँटी सॅटेलाईट मिसाईल्स’ विकसित केल्याची माहितीही समोर आली आहे. चंद्रावर तसेच मंगळावर अंतराळवीर धाडण्याच्या मोहिमांनाही वेग देण्यात आला असून अंतराळात तळ उभारण्यासाठीही चीन हालचाली करीत आहे.

चीनच्या अंतराळातील हालचालींना रशियाची साथ असल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनकडून सुरू असलेल्या अनेक मोहिमांमध्ये रशियन कंपन्या तसेच तज्ज्ञांचा समावेश आहे. दोन्ही देशांमध्ये अंतराळक्षेत्रात झालेले करार याला पुष्टी देणारे आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने सुरू केलेल्या हालचाली महत्त्वाच्या ठरतात.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने सोमवारी ‘नॉथ्रोप ग्रुमन’ कंपनीला दोन ‘बॅलिस्टिक मिसाईल अर्ली वॉर्निंग सॅटेलाईट’ तयार करण्यासाठी २.३७ अब्ज डॉलर्सचे कंत्राट दिल्याचे जाहीर केले. यातील सात कोटी डॉलर्स तातडीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येत्या पाच वर्षात हे सॅटेलाईट ‘स्पेस फोर्स’च्या ताब्यात देण्यात यावेत, असे निर्देशही देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. हे नवे उपग्रह सध्या कार्यरत असलेल्या ‘स्पेस बेस्ड इन्फ्रारेड सिस्टिम’ची जागा घेतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

या यंत्रणेबरोबरच पृथ्वीच्या वातावरणातील ‘हायपरसोनिक वेपन्स’वर लक्ष ठेवण्यासाठी तब्बल १५० उपग्रहांचे ‘नेटवर्क’ उभे करण्याचीही तयारी सुरू झाली आहे. अमेरिकेच्या ‘स्पेस डेव्हलपमेंट एजन्सी’ने यासंदर्भात निविदा प्रसिद्ध केल्याची माहिती एका अमेरिकी वेबसाईटने दिली आहे. हे नेटवर्क २०२४ सालापर्यंत कार्यरत करण्याची योजना आहे. चीन व रशिया वेगाने हायपरसोनिक क्षेपणास्त्रे विकसित करीत असताना अमेरिकेकडून उभारण्यात येणारे हे नेटवर्क लक्ष वेधून घेणारे ठरते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या दोन वर्षात अमेरिकेची अंतराळातील सज्जता वाढविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अमेरिकी संरक्षणदलाची सहावी कमांड म्हणून ‘स्पेस फोर्स’ची स्थापना आणि त्यासाठी केलेली ७० अब्ज डॉलर्सहून अधिक निधीची तरतूद यासारखे निर्णय त्याची साक्ष देतात.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info