लंडन – चीनवर एकाधिकारशाही गाजविणाऱ्या कम्युनिस्ट पार्टीतील आपले सर्वोच्च स्थान कायम राखण्याच्या दबावातून आलेल्या निराशेपोटी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हॉंगकॉंगच्या मुद्द्यावर नव्या शीतयुद्धाची जोखीम पत्करायला तयार होतील, असा इशारा हॉंगकॉंगमधील माजी ब्रिटिश गव्हर्नर क्रिस पॅटन यांनी दिला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानेही राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या इराद्यांबाबत गाफील राहण्याची चूक करू नये, असेही पॅटन यांनी बजावले. हॉंगकॉंग चीनच्या ताब्यात देण्यापूर्वी अखेरचे ब्रिटिश गव्हर्नर म्हणून पॅटन यांनी जबाबदारी सांभाळली होती.
‘चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे हुकूमशहा आहेत. कोरोनाव्हायरस साथ हाताळण्यात आलेले अपयश व त्यावरून होणारी टीका आणि अमेरिकेबरोबर व्यापार युद्धामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला बसलेला फटका, यामुळे कम्युनिस्ट पार्टीतील आपले सर्वोच्च स्थान कायम राहील की नाही याची शाश्वती जिनपिंग यांना राहिलेली नाही. चीनमधील कम्युनिस्ट पार्टीच्या कोणत्याही नेत्याला अथवा सदस्याला वाटणार नाही इतकी प्रचंड निराशा जिनपिंग यांच्या वाट्याला यावेळी आलेली आहे. याच नैराश्याच्या भावनेतून त्यांनी हॉंगकॉंग, तैवान व इतर सर्व मुद्द्यांवर चीनच्या जनतेतील राष्ट्रवाद चेतवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत’, असा दावा पॅटन यांनी केला.
‘ब्रिटनकडून हॉंगकॉंग चीनकडे सोपवताना ‘वन कंट्री टू सिस्टीम्स’ या धोरणाअंतर्गत हॉंगकॉंगला देण्यात आलेले अधिकार व स्वातंत्र्याबाबत जिनपिंग यांना प्रचंड तिटकारा आहे. त्यामुळेच हॉंगकॉंगचा करार संयुक्त राष्ट्रसंघटनेसारख्या आंतरराष्ट्रीय चौकटीचा भाग असतानाही तो तोडण्याचे पाऊल जिनपिंग उचलू शकतात. हा करार तोडून बळाचा वापर करून हॉंगकॉंगला वठणीवर आणण्याची चिनी राष्ट्राध्यक्षांची योजना आहे’, अशा शब्दात माजी ब्रिटिश गव्हर्नर पॅटन यांनी जिनपिंग यांच्या कारवायांची जाणीव करून दिली.
पुन्हा शीतयुद्ध नको ही जागतिक समुदायाची इच्छा असली, तरी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनाच शीतयुद्ध हवे असल्याने त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी आपण सर्वांनी ठेवायला हवी असा इशाराही पॅटन यांनी दिला. ‘चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी हॉंगकॉंगवर कारवाई सुरू केल्यास त्यातील नागरिकांचा परदेशी गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात बाहेर पडेल. याचे परिणाम चीनवर होतील याची कल्पना असतानाही जिनपिंग यांच्याकडून हॉंगकॉंगबाबत घेण्यात येणारे निर्णय अनाकलनीय म्हणावे लागतील’, असे पॅटन म्हणाले.
काही दिवसांपूर्वी चीनचे परराष्ट्रमंत्री वॅग यी यांनी, अमेरिकेवर टीकास्त्र सोडताना या देशातील एक राजकीय वर्ग चीन व अमेरिकेला नव्या शीतयुद्धाकडे ढकलत असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर, ब्रिटनच्या माजी गव्हर्नरनी चीनलाच शीतयुद्ध हवे असल्याचा दावा करणे लक्ष वेधून घेणारे ठरते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |