अमेरिका कुवैतला १.४ अब्ज डॉलर्सची पॅट्रियॉट क्षेपणास्त्रे देणार

अमेरिका कुवैतला १.४ अब्ज डॉलर्सची पॅट्रियॉट क्षेपणास्त्रे देणार US okays sale of Patriot missiles

वॉशिंग्टन – अमेरिकेने कुवैतला १.४ अब्ज डॉलर्सची पॅट्रियॉट क्षेपणास्त्रे देण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र विभागाकडून ही घोषणा करण्यात आली. अमेरिकेने गेल्याच महिन्यात आखाती देशांमधून चार पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा माघारी घेतल्याची माहिती दिली होती.

इराणबरोबरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची आखातातील संरक्षणसज्जता वाढवली होती. ही सज्जता वाढविताना अमेरिकेच्या मित्रदेशांना मोठ्या प्रमाणात शस्त्रे पुरविण्याचाही निर्णय झाला होता. त्यानुसार सौदी अरेबिया, यूएई, कतार व कुवैतला क्षेपणास्त्रे देण्यात येत असून १.४ अब्ज डॉलर्सच्या पॅट्रियॉट विक्रीला दिलेली मान्यता त्याचाच भाग आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार कुवैतला ८४ ‘पॅट्रियॉट इंटरसेप्टर मिसाईल्स‘ देण्यात येणार आहेत. या क्षेपणास्त्रांची किंमत ८० कोटी डॉलर्सहुन अधिक आहे. त्याव्यतिरिक्त ४२ कोटी डॉलर्सचे तांत्रिक सहाय्य पुरविण्यात येणार आहे. तर १० कोटी डॉलर्स यापूर्वी कुवैतला देण्यात आलेल्या पॅट्रियॉट यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी वापरण्यात येतील, असे परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आखाती देशांचे राजकीय स्थैर्य व सुरक्षा अमेरिकेच्या दृष्टीने महत्त्वाची असून त्यासाठीच कुवैतला पॅट्रियॉट देण्याचा निर्णय घेतल्याचे परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने सिरीयात पॅट्रियॉट यंत्रणा तैनात केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info