मनिला – “‘साउथ चायना सी’ क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, फिलिपाईन्स अमेरिकेबरोबरच्या लष्करी सहकार्यातून माघार घेऊ शकत नाही. फिलिपाईन्सला अमेरिकन सैन्याची आवश्यकता आहे. राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनीच अमेरिकेच्या या सैन्यतैनातीची मागणी केली आहे’, अशी घोषणा फिलिपाईन्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. फिलिपाईन्सच्या भूमिकेतील हा बदल चीनसाठी धक्का ठरतो आहे.
१९८८ साली अमेरिका आणि फिलिपाईन्समध्ये झालेल्या ‘व्हिजिटिंग फॉर्सेस ॲग्रीमेंट’नुसार (व्हीएफए) अमेरिकेची लढाऊ विमाने आणि युद्धनौकांना फिलिपाईन्समध्ये मोकळी वाट देण्यात आली होती. पण या वर्षी फेब्रुवारी महिन्यात फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनी अमेरिकेबरोबरच्या या करारातून माघार घेतली होती. तसेच अमेरिकी लष्कराने पुढील १८० दिवसात फिलीपाईन्स सोडून जावे, अशी सूचनाही फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी केली होती. या निर्णयामुळे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अमेरिकेला या देशातील सैन्य माघारी घ्यावे लागणार होते.
मात्र, राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे, अशी माहिती फिलिपाईन्सचे परराष्ट्रमंत्री थिओडोर लोकोसीन जूनियर यांनी दिली. परराष्ट्रमंत्री लोकोसीन यांनी राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांचा निर्णय फिलिपाईन्समधील अमेरिकेच्या दूतावासाला कळविला आहे. साऊथ चायना क्षेत्रातील राजकीय आणि इतर घडामोडींचा दाखला देऊन अमेरिकन सैन्याची फिलिपाईन्सला आवश्यकता असल्याचे परराष्ट्रमंत्री लोकोसीन म्हणाले. पुढील सहा महिने अमेरिकेने फिलिपाईन्समधून कुठल्याही प्रकारचे माघार घेऊ नये, असे आवाहन परराष्ट्रमंत्री लोकोसीन यांनी अमेरिकेला केले आहे. त्यामुळे फेब्रुवारी २०२१ अर्थात अमेरिकेतील नव्या सरकारच्या शपथविधीपर्यंत फिलिपाईन्समधील अमेरिकेची ही तैनाती कायम असणार आहे.
दरम्यान, ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रातील चीनच्या आक्रमक कारवाया आणि कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर फिलिपाईन्सने अमेरिकेकडे सैन्यतैनाती कायम ठेवण्याचे आवाहन केल्याचा दावा केला जातो. फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीवर चीनने दावा सांगितला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या क्षेत्रातील चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर फिलिपाईन्सच्या भूमिकेत हा बदल झाल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |