‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या कारवायांविरोधात फिलिपाईन्स आक्रमक

मनिला/बीजिंग – चीनकडून साऊथ चायना सीमध्ये सुरू असलेल्या घुसखोरी व दडपशाहीविरोधात फिलिपाईन्सने आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच फिलिपाईन्सने स्प्रॅटले बेटांनजिक ‘फ्लोटिंग मार्कर्स’(बायोज्‌‍) तैनात केले होते. त्यानंतर व्हिएतनामबरोबर झालेल्या बैठकीत ‘साऊथ चायना सी’मधील ‘कोड ऑफ कंडक्ट’साठी हालचालींना वेग देण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्यात टेहळणी ड्रोन्स व इतर तंत्रज्ञान खरेदी करण्याच्या तसेच संयुक्त गस्ती मोहिमेच्या मुद्यावर एकमत झाल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर फिलिपाईन्सच्या लष्करप्रमुखांनी ‘स्प्रॅटले’ बेटांनजिक असलेल्या बालाबाक हवाईतळाला भेट दिली.

‘साऊथ चायना सी’मधील

गेली काही वर्षे चीनकडून साऊथ चायना सीमधील वर्चस्ववादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या क्षेत्रातील बेटसमूहांचे लष्करीकरण करून त्यावर मोठ्या प्रमाणात संरक्षण तैनाती करण्यात आली आहे. त्याचवेळी नौदल, तटरक्षक दल व चीनने विकसित केलेल्या ‘मिलिशिआ’च्या माध्यमातून इतर देशांच्या सागरी हद्दीत सातत्याने घुसखोरी सुरू आहे. चीनची घुसखोरी रोखणाऱ्या देशांना उघडपणे धमकावले जात असून या देशांच्या मागण्या धुडकावण्यात येत आहेत. चीनच्या या अरेरावी व दडपशाहीविरोधात आग्नेय आशियाई देशांनी आक्रमक भूमिका घेतली असून फिलिपाईन्स त्यात आघाडीवर आहे.

‘साऊथ चायना सी’मधील

फेब्रुवारी महिन्यात फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी जपानचा दौरा केला होता. या दौऱ्यात दोन देशांमधील सामरिक सहकार्य वाढविण्यावर एकमत झाले होते. त्याचवेळी तैवानच्या मुद्यावरही चर्चा झाली होती. त्यानंतर फिलिपाईन्स इतर कुठल्याही देशाला आपल्या हद्दीच्या एक इंच भूभागाचाही ताबा घेऊ देणार नाही, असा इशारा फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष मार्कोस ज्युनिअर यांनी दिला होता. मार्च महिन्यात फिलिपाईन्सचे अमेरिकेबरोबर करार करून आपले चार लष्करी तळ अमेरिकेला वापरू देण्याचा निर्णय घेतला होता. एप्रिल महिन्यात चीनच्या तटरक्षकदलाच्या जहाजाच्या घुसखोरीचा प्रयत्न फिलिपाईन्सने हाणून पाडला होता.

त्यानंतर आता चीनकडून दावा होत असलेल्या ‘स्प्रॅटले’ बेटसमूहाच्या मुद्यावर फिलिपाईन्सने वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत. काही दिवसांपूर्वी या क्षेत्रात तैनात केलेले ‘बायोज’ व त्यापाठोपाठ लष्करप्रमुखांनी नजिकच्या बेटांना दिलेली भेट याचाच भाग दिसत आहे. दुसऱ्या बाजूला आग्नेय आशियातील इतर देशांना बरोबर घेऊन चीनला रोखण्यासाठीही फिलिपाईन्स सक्रिय झाला आहे. व्हिएतनामबरोबर झालेली दोन दिवसांची बैठक व त्यात विविध मुद्यांवर झालेले एकमत या गोष्टी त्याला दुजोरा देणाऱ्या ठरतात.

दुसऱ्या बाजूला अमेरिका व जपानसह ऑस्ट्रेलियाबरोबरील सहकार्य वाढवून चीनला प्रत्युत्तर देण्यासाठीही फिलिपाईन्सचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून टेहळणी ड्रोन्स व इतर संरक्षणविषयक तंत्रज्ञान खरेदी करण्याचा निर्णय परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांच्या दौऱ्यात घेण्यात आला. ऑस्ट्रेलियाबरोबर साऊथ चायना सी क्षेत्रात संयुक्त गस्त राबविण्याच्या मुद्यावरही फिलिपाईन्सने सकारात्मक भूमिका घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info