टोकियो – जगभरात कोरोनाव्हायरसचा फैलाव सुरू असतानाच या साथीच्या आडून चीन ‘साऊथ चायना सी’ तसेच ‘ईस्ट चायना सी’ क्षेत्रावर ताबा मिळवण्याचे मनसुबे रचत आहे, असा इशारा जपानमधील अमेरिकी लष्कराचे प्रमुख लेफ्टनंट जनरल केविन श्नायडर यांनी दिला. काही दिवसांपूर्वीच चीनकडून ‘साऊथ चायना सी’मध्ये ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’ लागू करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त हॉंगकॉंगच्या दैनिकाने दिले होते. त्यापूर्वी चीनने या क्षेत्रातील बेटांना चिनी नावे देण्याचा तसेच मासेमारीवर बंदी घालण्याचा एकतर्फी निर्णय जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर, अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.
‘चीनच्या नौदलाने गेल्या काही महिन्यात ‘साऊथ चायना सी’ मधील आपल्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. चीनच्या युद्धनौकांबरोबरच तटरक्षक दलाची जहाजे आणि चीनच्या सशस्त्र मच्छिमार बोटिंची पथके (नॅव्हल मिलिशिया) यांचा वावर वाढला आहे. चीनच्या युद्धनौका व बोटी या सागरी क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या इतर देशांच्या बोटींना सातत्याने त्रास देत आहेत. कोरोना संकटाच्या काळात या हालचाली प्रचंड प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. ‘साऊथ चायना सी’ क्षेत्राबरोबरच ‘ईस्ट चायना सी’ मध्येही कारवायांची व्याप्ती वाढली आहे’, असा इशारा जपानमधील ‘युएस फॉर्सेस’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल केविन श्नायडर यांनी दिला.
चीनकडून या क्षेत्रातील कारवायांची व्याप्ती आणि वेग वाढतच राहील, असेही अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बजावले. चीनच्या हालचाली छोट्या भागांपुरत्या मर्यादित नसून एखादा मोठा प्रदेश ताब्यात घेण्याची तयारी त्यामागे दिसत आहे, असा दावाही लेफ्टनंट जनरल श्नायडर यांनी केला. चीनकडून गेल्या काही आठवड्यात सुरू असणाऱ्या हालचालींकडे नजर टाकल्यास अमेरिकी अधिकाऱ्यांच्या इशाऱ्याला पुष्टी मिळताना दिसते.
काही दिवसांपूर्वी हॉंगकॉंगस्थित ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकाने, चीनने साऊथ चायना सी सागरी क्षेत्रावर हक्क प्रस्थापित करण्यासाठी ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’ (एडीआयझेड) लागू करण्याची तयारी केली आहे, असे वृत्त दिले होते. त्यात तैवानचे माजी नौदल अधिकारी ‘लु ली-शिह’ यांनी, चीनकडून ‘एडीआयझेड’च्या योजनेवर गेल्या १० वर्षांपासून काम सुरू असून कृत्रिम बेटांचे बांधकाम व त्यावर लष्करी तळांची उभारणी याच योजनेचा भाग आहे, असा दावा केला होता.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला चीनच्या सरकारने ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रातील सुमारे ८० भौगोलिक ठिकाणांना नावे देऊन सदर ठिकाणे चीनच्या मालकीचे असल्याचा आव आणला होता. यामध्ये छोट्यामोठ्या अशा २५ बेटांचा तसेच समूद्राखालील ५५ ठिकाणांचा समावेश होता. त्यानंतर ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात चीनच्या गस्तीनौकांनी व्हिएतनामच्या मच्छिमार जहाजाला धडक दिली होती. चीनच्या या कारवाईवर व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स या शेजारी देशांबरोबर अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांनी संताप व्यक्त केला होता.
जग कोरोनाविरोधात लढत असल्याचा फायदा घेऊन चीनने ‘साऊथ चायना सी’ व इतर सागरी क्षेत्रावर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील देशांच्या सागरी सुरक्षेला असलेला धोका कोरोनाव्हायरस संकटाच्या काळातही कमी झालेला नसून उलट त्यात वाढ झाली असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांच्या वक्तव्यातून दिसून येते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |