जेरुसलेम – कोरोनाव्हायरसची साथ सुरू असली तरी इराणच्या आक्रमकतेविरोधात इस्रायलचा निर्धार दृढ असून इराणला कधीही अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला. रविवारी झालेल्या इस्रायली मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी हा इशारा दिल्याचे वृत्त इस्रायली माध्यमांनी दिले आहे. गेल्या आठवड्यात इराणने आंतरराष्ट्रीय अणुउर्जा आयोगाच्या अधिकाऱ्यांना इराणी अणुप्रकल्पांमध्ये प्रवेश नाकारल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर नवा इशारा देऊन इस्रायलने इराणला संदेश दिल्याचे मानले जाते.
‘गेल्या आठवड्यात इराणने आपल्या अणुप्रकल्पामधील काही भागांमध्ये आंतरराष्ट्रीय अणुउर्जा आयोगाच्या निरीक्षकांना प्रवेश नाकारला होता. ही बाब अतिशय गंभीर आहे. सध्या कोरोनाव्हायरसच्या साथीचे संकट असले तरी इराणच्या आक्रमक कारवायांना रोखण्याच्या इराद्यांपासून इस्रायल एक इंचही ढळलेला नाही. इस्रायल इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही’, अशा शब्दात इस्रायली पंतप्रधानांनी इराणला बजावले.
दोन वर्षांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण बरोबरील अणुकरारातून माघार घेतली होती. त्यानंतर अमेरिकेने इराणवर सातत्याने कठोर निर्बंध लादून इराणचा अणुकार्यक्रम खिळखिळा करण्यात यश मिळवले होते. गेल्यावर्षी इराणनेही आपण अणुकरारातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर गेल्या काही महिन्यात इराणने आपल्याकडील किमान तीन अणुप्रकल्प पुन्हा सुरू केले असून त्यातुन युरेनियमची निर्मिती होत असल्याचा संशय व्यक्त केला जातो. यासाठी इराणला रशिया, चीन व युरोपीय देश सहकार्य करीत असल्याचे सांगण्यात येते.
या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय अणुउर्जा आयोगाच्या अधिकाऱ्यांनी नुकताच इराणचा दौरा केला. मात्र या दौऱ्यात इराणने काही अणुप्रकल्पांमधील विशिष्ट क्षेत्रात अणुउर्जा आयोगाच्या निरीक्षकांना परवानगी नाकारली. इराणच्या या नकारामुळे त्याच्या अणुकार्यक्रमावर व्यक्त करण्यात येणारा संशय अधिकच गडद झाला आहे. आयोगाला परवानगी नाकारलेल्या भागात इराण संवर्धित युरेनियमची निर्मिती करत असावा असे मानले जाते. संवर्धित युरेनियमचा वापर अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी करण्यात येत असल्याने इराण पुन्हा एकदा अण्वस्त्रसज्ज होण्यासाठी हालचाली करीत असल्याचे दिसत आहे.
इराणच्या या हालचालींची इस्रायलने गंभीर दखल घेतल्याचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी दिलेल्या इशाऱ्यातुन स्पष्ट होते. इराणला अण्वस्त्रसज्ज होण्यापासून रोखण्याचा निर्धार कायम ठेवतानाच इस्रायलकडून इराणच्या इतर कारवायाही लक्ष्य करण्यात येत आहेत. शनिवारी मध्यरात्रीनंतर इस्रायलच्या ड्रोन्सनी सिरियातील इराणच्या तळांवर जोरदार हल्ले केल्याचे समोर आले आहे. इस्रायलच्या ड्रोन्सनी पूर्व सीरियातील मेझीलेह तळावर हल्ले चढवून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा नष्ट केल्याचे मानले जाते.
या कारवाईत १२ जण ठार झाले असून त्यात इराकी व अफगाणी बंडखोरांचा समावेश आहे. मेझीलेह तळाचा वापर सीरियातील इराण समर्थक दहशतवादी गटांकडून मुख्यालय म्हणून केला जात होता. काही दिवसांपूर्वीच या तळावर सशस्त्र गाड्या तसेच मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा दाखल झाला होता त्यामुळे इस्रायलचा ड्रोन हल्ला इराणसह इराणसमर्थक गटांसाठी मोठा धक्का ठरला आहे.
या महिन्यात इस्रायलने सीरियात केलेला हा दुसरा मोठा हवाई हल्ला ठरला आहे. यापूर्वी गुरुवारी रात्री पश्चिम सीरियात केलेल्या एका हल्ल्यात सीरियन राष्ट्राध्यक्ष बशर अल अस्साद यांचे समर्थक असलेल्या नऊ जणांचा बळी गेला होता. गेल्या महिन्यात इस्रायलने सीरियातील इराणच्या स्थळांवर १० हून अधिक हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली होती. यातील एका हल्ल्यात सीरियात रासायनिक शस्त्रांची निर्मिती करणारे केंद्रही उद्ध्वस्त करण्यात आले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |