‘एजिअन सी’ क्षेत्रात ग्रीसच्या नौदलाने युद्धनौका तैनात केल्याचा तुर्कीचा आरोप

‘एजिअन सी’ क्षेत्रात ग्रीसच्या नौदलाने युद्धनौका तैनात केल्याचा तुर्कीचा आरोप

अंकारा/अथेन्स – तुर्कीच्या सीमेनजिक असलेल्या ‘एजिअन सी’ क्षेत्रात ग्रीसने युद्धनौका तैनात केल्याचा आरोप तुर्कीने केला. तुर्की चर्चा व वाटाघाटीच्या माध्यमातून समस्येवर तोडगा काढण्यासाठी हालचाली करीत असतानाही ग्रीस चिथावणी देणार्‍या हालचाली करीत असल्याचा आरोप तुर्कीकडून करण्यात आला आहे. नाटोच्या मध्यस्थीने ग्रीस व तुर्कीमध्ये भूमध्य सागरी क्षेत्रातील वादासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र ही चर्चा सुरू असतानाही तुर्कीने आपल्या संशोधन मोहिमा चालू ठेवल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ग्रीसनेही आपली संरक्षण तैनाती कायम ठेवली आहे.

‘तुर्कीकडून भूमध्य सागरी क्षेत्रातील वादावर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही ग्रीस बेकायदेशीर व चिथावणी देणार्‍या कारवाया करीत आहे’, असा आरोप तुर्कीच्या संरक्षण विभागाच्या प्रवक्त्या मेजर पिनार कारा यांनी केला. ग्रीसने तुर्कीच्या सीमेनजिक असलेल्या ‘कॅस्टेलोरिझो’ बेटानजिक युद्धनौका पाठविल्याचे तुर्कीने आपल्या आरोपात म्हटले आहे. मात्र त्याविषयी अधिक माहिती देणे टाळले आहे. त्याचवेळी तुर्की यापुढेही आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार शांततेच्या मार्गाने वाटाघाटी सुरू ठेवेल, असा दावाही केला.

भूमध्य सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर इंधनाचे साठे असल्याचे आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण व अहवालांमधून समोर आले आहे. त्यातील अधिकाधिक क्षेत्रावर ताबा मिळवण्यासाठी तुर्कीने कारवाया सुरू केल्या आहेत. भूमध्य सागरात ग्रीस तसेच सायप्रसच्या अधिकाराखाली असणार्‍या क्षेत्रावर आपलाच हक्क असल्याचे दावे तुर्कीकडून करण्यात येत आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात, तुर्कीने ‘नॅव्हटेक्स अलर्ट’ जारी करून आपले ‘ओरुक रेईस’ हे ‘रिसर्च शिप’ दोन जहाजांसह भूमध्य सागरी क्षेत्रात संशोधनासाठी धाडले होते.

त्यावेळी भूमध्य सागरातील शांतता व स्थैर्याला धोका पोहोचवणार्‍या बेकायदेशीर कारवाया तुर्कीने ताबडतोब थांबवाव्यात, असा इशारा ग्रीसने दिला होता. अमेरिकेसह युरोपीय महासंघ व नाटोनेही तुर्कीच्या हालचालींवर नाराजी व्यक्त केली होती. अमेरिका व युरोपने ग्रीसचे समर्थन करीत तुर्कीने दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात तुर्कीने आपले जहाज भूमध्य सागरी क्षेत्रातून माघारी घेऊन ग्रीसबरोबर चर्चेस सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर गेल्या पाच महिन्यात तुर्कीने सातत्याने सागरी मोहिमा राबवून या क्षेत्रात आपले वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

तुर्कीच्या या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी ग्रीसनेही हालचालींना वेग दिला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून ग्रीसने अमेरिका, फ्रान्स तसेच युएईबरोबर स्वतंत्ररित्या संरक्षण सराव केले आहेत. नोव्हेंबर महिन्यात भूमध्य सागरी क्षेत्रात झालेल्या बहुराष्ट्रीय सरावात इजिप्त, सायप्रस, फ्रान्स व संयुक्त अरब अमिरात (युएई) हे देशही सहभागी झाले होते. तुर्कीच्या कारवाया रोखण्यासाठी ग्रीसने आपल्या संरक्षणखर्चात तब्बल ५७ टक्के वाढ करण्याचाही निर्णय घेतला होता.

यापूर्वी ग्रीसने वारंवार दिलेल्या इशार्‍यानंतरही तुर्कीने आपली जहाजे ग्रीक बेटांपासून अवघ्या १४ किलोमीटर्सच्या हद्दीत धाडली होती. तुर्कीच्या तटरक्षक दलाने ग्रीक जहाजांना धमकावल्याचे वृत्तही समोर आले होते. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी ग्रीसला वारंवार इतिहासाची आठवण करून देत धमकावलेही होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर, तुर्कीने ग्रीसवर चिथावणीचे आरोप करणे म्हणजे उलट्या बोंबा मारण्याचा प्रकार असल्याचे मानले जाते.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info