प्योनग्यांग/सेऊल – गेले दोन आठवडे दक्षिण कोरियाला सातत्याने धमकावणाऱ्या उत्तर कोरियाने आता अधिकच आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवारी उत्तर कोरियाने दोन देशांमधील राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी उभारण्यात आलेले कार्यालय बॉम्बस्फोटात उडवून दिले. त्याचवेळी उत्तर कोरियाच्या लष्कराने आपले जवान दक्षिण कोरियाच्या सीमेला जोडून असलेल्या ‘डिमिलिटराईझ्ड झोन’मध्ये घुसण्यासाठी सज्ज असल्याची धमकीही दिली. लष्करी कारवाईची ही धमकी आणि राजनैतिक कार्यालय उडविणे घटनांमुळे उत्तर व दक्षिण कोरियामधील संबंध अधिकच चिघळल्याचे दिसत आहे.
उत्तर व दक्षिण कोरियामधील संबंध सुधारण्यासाठी सप्टेंबर २०१८ मध्ये उत्तर कोरियाच्या ‘काएसोंग’ भागात राजनैतिक कार्यालय उभारण्यात आले होते. गेल्यावर्षी दोन देशांमधील संबंधात तणाव निर्माण झाल्यानंतर उत्तर कोरियाने हे कार्यालय बंद केले होते. मात्र मंगळवारी दुपारी हे कार्यालय बॉम्बस्फोटात उडवून उत्तर कोरियाच्या राजवटीने आपण टोकाचे पाऊल उचलण्यास तयार असल्याचे संकेत दिले. गेल्याच आठवड्यात उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांची बहीण किम यो जाँगने कार्यालय उडविण्याची धमकीही दिली होती.
राजनैतिक कार्यालय उडविण्यापूर्वी उत्तर कोरियाच्या लष्कराने दक्षिण कोरियाला नवी धमकीही दिली. उत्तर कोरियाचे लष्कर दोन देशांच्या सीमेवरील संरक्षित क्षेत्र असलेल्या ‘डिमिलिटराईझ्ड झोन’मध्ये घुसण्यास सज्ज असल्याचे ‘कोरियन पीपल्स आर्मी’च्या प्रमुखांनी बजावले. ‘उत्तर कोरियाचा सरकारने घेतलेले निर्णय आणि आदेशांचे पालन करण्यास आम्ही सज्ज आहोत. डिमिलिटराईझ्ड झोनचे रूपांतर संरक्षित किल्ल्यात करून दक्षिण कोरियाच्या लष्करी हालचालींवर बारीक लक्ष ठेऊ’, अशा शब्दात उत्तर कोरियाच्या लष्कराने धमकावले आहे.
उत्तर कोरियाने कार्यालय उडविणे व त्यानंतर लष्कराने दिलेली धमकी या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियात तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीपूर्वी दक्षिण कोरियाच्या लष्कराने उत्तर कोरियाला चिथावणीखोर कारवाया थांबवाव्यात, असा इशारा दिला आहे. अमेरिकेनेही कोरियन क्षेत्रातील स्थितीवर आपले लक्ष असल्याचे सांगून दक्षिण कोरियाच्या सुरक्षेसाठी पूर्ण सज्ज असल्याचे म्हटले आहे.
उत्तर कोरियाच्या या आक्रमक हालचालींमागे हुकूमशहा किम जाँग उन यांची बहीण किम यो जाँगचा वाढता प्रभाव हे प्रमुख कारण मानले जात आहे. एप्रिल महिन्यात हुकूमशहा किम जाँग उन काही काळासाठी गायब झाले होते. या काळात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा तसेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून समोर आल्या होत्या. हुकूमशहा किम जाँग उन पुन्हा जनतेसमोर आल्यानंतर त्यांची बहीण किम यो जाँग सातत्याने चर्चेत येत आहे. यामागे उत्तर कोरियातील संभाव्य सत्ताबदल हे देखील कारण असू शकते असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येतो.
किम यो जाँग सध्या उत्तर कोरियातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात शक्तिशाली व्यक्ती असल्याचे सांगितले जाते. सत्ताधारी वर्कर्स पार्टीची पहिली उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यावर किम यो जाँग ही हुकूमशहा किम जाँग उन नंतरचा उत्तर कोरियाचा चेहरा बनली आहे. गेल्या महिन्यात किम जाँग उन यांच्या अनुपस्थितीत किम यो जाँगच कारभार सांभाळत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे किम यो जाँगकडून देण्यात आलेल्या लष्करी कारवाईच्या धमकीनंतर काही दिवसातच घडलेल्या घटनांनी साऱ्या जगाचे लक्ष वेधले गेले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |