उत्तर कोरियाकडून तीन दिवसात दुसरी क्षेपणास्त्र चाचणी

- कोरियन क्षेत्रातील घडामोडींची तीव्रता वाढली

सेऊल – उत्तर कोरियाने मंगळवारी आणखी एका क्षेपणास्त्रांची चाचणी केली. यावेळी उत्तर कोरियाने जमिनीवरुन पाण्यात बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात युद्धसराव सुरू असताना उत्तर कोरियाने ही चाचणी घेतली, याकडे पाश्चिमात्य माध्यमे लक्ष वेधत आहेत. तर येत्या गुरुवारी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष जपानच्या ऐतिहासिक दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात उत्तर कोरियाविरोधी आघाडीवर जपान व दक्षिण कोरियात चर्चा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने ही चाचणी केल्याचा दावा केला जातो.

चाचणी

दक्षिण कोरियाच्या संरक्षणदलप्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी उत्तर कोरियाने पूर्वेकडील सागरी क्षेत्रात दोन लघू पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली. दहा मिनिटांच्या फरकाने प्रक्षेपित केलेल्या या क्षेपणास्त्रांवर आपले लष्कर नजर ठेवून होते, असे दक्षिण कोरियाच्या संरक्षणदलप्रमुखांनी म्हटले आहे. सोमवारपासून अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्कराचा अकरा दिवसांचा संयुक्त युद्धसराव सुरू झाला आहे. याला आव्हान देण्यासाठी उत्तर कोरियाकडून अशा क्षेपणास्त्र चाचण्यांची शक्यता असल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या संरक्षणदलप्रमुखांनी केला.

अमेरिका व दक्षिण कोरियाच्या लष्करातील ‘फ्रिडम शिल्ड’ हा युद्धसराव म्हणजे आपल्या देशावरील हल्ल्याची पूर्वतयारी असल्याचा आरोप उत्तर कोरिया करीत आहे. पाच वर्षानंतर अमेरिका व दक्षिण कोरियाच्या लष्करात इतक्या मोठ्या पातळीवर युद्धसराव आयोजित केला जात आहे. या युद्धसरावाच्या काही तास आधी, रविवारी उत्तर कोरियाने पाणबुडीतून दोन सामरिक क्रूझ्‌‍ क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. याद्वारे आपल्याकडे पाणबुडीतून हल्ले चढविण्याची तसेच अणुस्फोटके वाहून नेणाऱ्या क्षेपणास्त्रांचा हल्ला चढविण्याची क्षमता असल्याचा संदेश उत्तर कोरियाने दिला, याकडे आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी लक्ष वेधले होते.

उत्तर कोरियाने मंगळवारी केलेल्या या या क्षेपणास्त्र चाचणीची दखल जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी घेतली आहे. येत्या गुरुवारी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक येओल जपानचा दौरा करून पंतप्रधान फुमिओ किशिदा यांची भेट घेणार आहेत. गेल्या शतकातील कोरियन युद्धात जपानने कोरियन जनतेवर केलेले अत्याचार हा दोन्ही देशांच्या संबंधांमधील फार मोठा अडसर मानला जातो. पण सध्याच्या स्थितीत चीन व उत्तर कोरियासारख्या देशांकडून जपान आणि दक्षिण कोरियाला असलेला एकसमान धोका लक्षात घेता, उभय देशांनी हे मतभेद बाजूला सारण्याची गरज असल्याचे सामरिक विश्लेषकांचे म्हणणे आहे.

दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्षांचा जपान दौरा ही त्याचीच तयारी असून हा दौरा ऐतिहासिक असल्याचा दावा केला जातो. यावरही उत्तर कोरियाने आपली तीव्र प्रतिक्रिया नोंदविली होती. हा सारा आपल्या विरोधातील व्यूहरचेनचा भाग असल्याचे सांगून उत्तर कोरिया याला अणुहल्ल्याने उत्तर दिले जाईल, असे धमकावत आहे. लवकरच उत्तर कोरिया नवी अणुचाचणी करून जगाला हादरविणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे दक्षिण कोरिया व जपानमधील सामरिक सहकार्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

हिंदी     English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info