अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकांचा ‘साऊथ चायना सी’मध्ये युद्धसराव

अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकांचा ‘साऊथ चायना सी’मध्ये युद्धसराव

वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेच्या ‘युएसएस निमित्झ’ व ‘युएसएस थिओडोर रूझवेल्ट’ या दोन विमानवाहू युद्धनौकांनी ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रात युद्धसराव केल्याची माहिती अमेरिकन नौदलाने दिली. या सरावाबरोबरच अमेरिकेच्या विनाशिकेने जपानबरोबर स्वतंत्ररीत्या नौदल सराव केल्याचे वृत्तही समोर आले आहे. चीनकडून पॅसिफिक क्षेत्रातील देशांच्या हद्दीत सातत्याने सुरु असणारी घुसखोरी, हॉंगकॉंग व तैवानसाठी सुरू असणाऱ्या हालचाली आणि अमेरिका व चीनच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नुकतीच झालेली चर्चा, या पार्श्वभूमीवर हे सराव म्हणजे अमेरिकेने चीनला दिलेला इशारा असल्याचे मानले जाते.

अमेरिका, चीन, 'साऊथ चायना सी', युद्धसराव

साऊथ चायना सी चा भाग असलेल्या ‘फिलिपाईन्स सी’मध्ये अमेरिकेच्या दोन विमानवाहू युद्धनौकांनी २१ व २२ जून रोजी युद्धसराव केल्याची माहिती अमेरिकी नौदलाच्या ‘पॅसिफिक फ्लीट’ने दिली. एका सागरी क्षेत्रात अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकांचा समावेश असलेले दोन ‘कॅरिअर स्ट्राइक ग्रुप्स’ जवळून काम करण्यास सक्षम असल्याचे या युद्धसरावाने दाखवून दिले, असे पॅसिफिक फ्लीटच्या निवेदनात सांगण्यात आले. सरावादरम्यान ‘यूएसएस रूझवेल्ट’ व ‘यूएसएस निमित्झ’ या विमानवाहू युद्धनौका व त्यांच्या ‘स्ट्राईक ग्रुप’ मधील इतर युद्धनौकांनी सागरी टेहळणी, सागरी क्षेत्रात झटपट तैनाती, हवाई सुरक्षा, हवाई हल्ले आणि व्यूहरचनात्मक डावपेचांचा सराव केला, असे अमेरिकन नौदलाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेने आपल्या तीन विमानवाहू युद्धनौका एकाच वेळी ‘इंडो-पॅसिफिक‘ क्षेत्रात तैनात केल्या होत्या. तीन विमानवाहू युद्धनौकांसह त्यांच्या ‘कॅरिअर ग्रुप’चा भाग असलेल्या ३० हून अधिक युद्धनौका, १५० पेक्षा जास्त लढाऊ विमाने आणि सुमारे २० हजार जवान ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात दाखल झाले होते. या तीनही विमानवाहू युद्धनौका किती काळासाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात तैनात राहतील याची कोणतीही माहिती अमेरिकी संरक्षण विभागाकडून देण्यात आलेली नव्हती. एकाच वेळी तीन विमानवाहू युद्धनौका ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात तैनात असण्याची गेल्या तीन वर्षातील ही पहिलीच वेळ असल्याची माहिती संरक्षण विभागातील सूत्रांनी दिली होती.

एकीकडे अमेरिकेच्या दोन विमानवाहू युद्धनौका फिलीपाईन्स सी मध्ये सराव करीत असतानाच साऊथ चायना सी मध्येच अमेरिकी विनाशिकेचा जपानबरोबर संयुक्त सराव झाल्याचे समोर आले आहे. ‘युएसएस गॅब्रिएल गिफर्ड्स’ या अमेरिकी विनाशिकेने जपानच्या ‘जेएस काशिमा’ व ‘जेएस शिमायुकी’ या युद्धनौकांबरोबर मंगळवारी २३ जूनला सराव केल्याची माहिती अमेरिकन नौदलाने दिली. ‘युएसएस गॅब्रिएल गिफर्ड्स’ ही अमेरिकेच्या ‘सेवन्थ फ्लीट’चा हिस्सा असणाऱ्या ‘डिस्ट्रॉयर स्क्वाड्रन’चा भाग आहे. अमेरिका व जपानमध्ये गेल्या दोन महिन्यात झालेला हा तिसरा संयुक्त नौदल सराव आहे.

अमेरिका, चीन, 'साऊथ चायना सी', युद्धसराव

दरम्यान, अमेरिकी युद्धनौकांच्या सरावानंतर तैवानने आपले मरिन्सचे पथक साऊथ चायना सी मधील ‘प्रतास आयलंड’वर तैनात करण्याची घोषणा केली आहे. चीनकडून तैवानच्या हद्दीत सातत्याने सुरू असलेली घुसखोरी आणि तैवानवरील संभाव्य हल्ल्याचा समावेश असणाऱ्या ड्रिलबाबत दिलेला इशारा या पार्श्वभूमीवर ही तैनाती करण्यात येत असल्याची माहिती तैवानमधील सूत्रांनी दिली.

तीन विमानवाहू युद्धनौकांपैकी दोन विमानवाहू युद्धनौका अद्याप चीननजिकच्या साऊथ चायना सी क्षेत्रातच असल्याचे नुकत्याच पार पडलेल्या सरावातून स्पष्ट झाले आहे. दोन आठवडयांहून अधिक काळ अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकांचा चीनच्या सागरी हद्दीनजीक असलेला वावर आणि जपान व अमेरिकेचा संयुक्त सराव म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चीनविरोधात सुरू केलेल्या दबावतंत्राचा भाग असल्याचे दिसत आहे.

गेल्या काही महिन्यात चीनकडून साऊथ चायना सी क्षेत्रात जोरदार कारवाया सुरू आहेत. शेजारील देशांच्या नौका बुडविणे, सागरी हद्दीत घुसखोरी करणे व लष्करी सामर्थ्याच्या बळावर धमकावणे यासारखे उद्योग सातत्याने सुरू आहेत. त्यात हॉंगकॉंगवर ताबा मिळवण्यासाठी आणलेला कायदा आणि तैवानवरील आक्रमणाच्या धमक्या यांची भर पडली आहे. साऊथ चायना सी क्षेत्रावरील वर्चस्वासाठी चीन ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’ लागू करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे. चीनकडून सुरू असलेल्या या आक्रमक कारवायांना रोखण्यासाठी अमेरिका सरसावल्याचे गेल्या काही दिवसांतील घटनांवरून दिसून येत आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info