इस्रायल-युएई सोकोट्रा बेटावरुन चीन, इराण व पाकिस्तानवर नजर ठेवणार – तुर्कीच्या वृत्तसंस्थेचा दावा

इस्रायल-युएई सोकोट्रा बेटावरुन चीन, इराण व पाकिस्तानवर नजर ठेवणार – तुर्कीच्या वृत्तसंस्थेचा दावा

अंकारा – इस्रायलबरोबरील ऐतिहासिक सहकार्याचा पहिला टप्पा म्हणून ‘संयुक्त अरब अमिरात’ (युएई) इस्रायलसोबत येमेनच्या ‘सोकोट्रा’ बेटावर गुप्तचर यंत्रणेचा संयुक्त तळ उभारणार असल्याचा दावा अमेरिकी व युरोपिय माध्यमे करू लागली आहेत. इस्रायल किंवा युएई’ने अद्याप या सहकार्याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण इस्रायल व युएई’चा सोकोट्रा बेटावरील हा तळ चीन, इराण आणि पाकिस्तानच्या हालचाली टिपण्यासाठी असेल, असे आपल्या राजकीय व सामरिक विश्लेषकांचे म्हणणे असल्याचे तुर्कीच्या मुखपत्राने म्हटले आहे. इराण व तुर्कीने याआधीच ‘इस्रायल-युएई’तील सहकार्यावर सडकून टीका केली होती.

सोकोट्रा

दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘इस्रायल-युएई’मध्ये ऐतिहासिक सहकार्य प्रस्थापित झाल्याची घोषणा केली. सदर सहकार्य वृद्धींगत करण्यासाठी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे विशेष सल्लागार जॅरेड कश्‍नर यांच्यासह इस्रायलच्या शिष्टमंडळाने नुकतीच युएई’ला भेट दिली. या भेटी दरम्यान, इस्रायल व युएईच्या काही अधिकार्‍यांनी येमेनच्या ‘सोकोट्रा’ बेटाला भेट दिल्याचा आरोप स्थानिक येमेनी टोळीप्रमुख ‘इसा सालेम बिन याकूत’ यांनी केला. सध्या हा तळ युएई’च्या ताब्यात आहे. युएई तसेच सौदी अरेबिया यांनी भयानक आंतरराष्ट्रीय आघाडी उभारुन आणि सोकोट्रा बेटावर इस्रायलला परवानगी देऊन येमेनच्या सार्वभौमत्वाचा अनादर केल्याचा ठपका याकूत यांनी ठेवला. अमेरिका आणि फ्रान्समधील संकेतस्थळांनी देखील इस्रायली व युएईच्या अधिकार्‍यांनी सोकोट्रा बेटाला भेट दिल्याचे म्हटले आहे.

हिंदी महासागरात असलेले ‘सोकोट्रा’ बेट सामरिकदृष्ट्या फार महत्त्वाच्या ठिकाणी आहे. येमेनमधील हौथी बंडखोरांनी या बेटावर हल्ले चढवून येमेनी लष्कराला पिटाळून लावले होते. पण २०१८ साली सौदी व युएईच्या संयुक्त लष्कराने या बेटाचा ताबा मिळविला होत. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या बेटाच्या पश्चिमेला इरिट्रीयाचे जिबौती शहर तसेच एडनचे आखात आणि रेड सी असा महत्वाचा सागरी पट्टा आहे. तर पूर्वेला अरबी समुद्र आहे. पर्शियन तसेच होर्मुझच्या आखातातून बाहेर पडणारी जहाजे आणि पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावरील हालचाली या बेटावरुन टिपता येतात, याकडे तुर्कीच्या मुखपत्राने लक्ष वेधले.

सोकोट्रा

यासाठी तुर्कीच्या मुखपत्राने परदेशी राजकीय व सामरिक विश्लेषकांचा हवाला दिला. कतारमधील ‘दोहा इन्स्टिट्यूट फॉर ग्रॅज्युएट स्टडीज्’ गटाचे विश्लेषक इब्राहिम फ्राइहात यांनी सोकोट्रा बेटावरील इस्रायल-युएईचा गुप्तचर तळ एडनच्या आखातातील इराणच्या हालचाली टिपण्यासाठी सहाय्यक ठरेल, असे म्हटले आहे. यामुळे येमेनमधील हौथी बंडखोरांना इराणकडून मिळणारे सहाय्य बाधित होईल, असा दावा इब्राहिम यांनी केला. फक्त इराणच नाही तर या सागरी क्षेत्रातून युरोपसाठी जाणार्‍या चीनच्या व्यापारी जहाजांवरही सोकोट्रावरील या तळावरुन नरज ठेवता येऊ शकते. चीनबरोबर व्यापर युद्ध छेडणार्‍या अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाला याचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो, असेही इब्राहिम यांनी तुर्कीच्या वृत्तपत्रांशी बोलताना सांगितले. चीनने लष्करी तळ विकसित केलेले जिबौती बंदर भौगोलिकदृष्ट्या सोकोट्रापासून जवळ आहे, याकडेही लक्ष्य वेधले जात आहे.

भारतीय विश्लेषक हैदर अब्बास यांनी इस्रायल-युएईचा हा तळ पाकिस्तानच्या हालचालींवर नरज ठेवण्यासाठी असल्याचा दावा केला. ‘यापुढे सोकोट्रा बेटावर युएई किंवा येमेनचे सरकार किंवा हौथी बंडखोरांचे वर्चस्व नसेल. तर इस्रायल अर्थात अमेरिकेचे या बेटावर नियंत्रण असेल. तर वेगाने बदलत असलेल्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान अर्थात चीनच्या सर्व हालचाली इस्रायली रडारमधून टिपल्या जातील’, असे हैदर यांनी म्हटले आहे. येत्या काळात ग्वादर बंदरात घातपात घडलाच तर पाकिस्तान-चीन त्यासाठी इस्रायल आणि अरब देशांना जबाबदार धरतील. असे झाले तर पाकिस्तान आणि अरब देशांमधील संबंध अधिक तणावपूर्ण बनतील, अशी शक्यता हैदर यांनी व्यक्त केली.

तर पाकिस्तानच्या आझम विद्यापीठाचे प्राध्यापक सईद कंदील अब्बास यांच्या मते, इस्रायल-युएईचा सोकोट्रावरील तळ हा प्रामुख्याने इराणच्या विरोधात आहे. रेड सीच्या क्षेत्रातून प्रवास करणार्‍या इराणच्या सागरी व हवाई वाहतुकीवर यापुढे इस्रायल व युएईची करडी नरज असेल, असा दावा अब्बास यांनी केला. इस्रायल-युएईच्या या लष्करी आघाडीत भारताचा समावेश झाला तर याचा सर्वात मोठा धोका एकमेव अण्वस्त्रसज्ज इस्लामी देश असलेल्या पाकिस्तानला असेल, असे अब्बास यांनी म्हटले आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info