‘इराण-तुर्की-कतार-हमास’ इस्रायलविरोधात आघाडी उघडू शकतात – हमासच्या नेत्याचा दावा

‘इराण-तुर्की-कतार-हमास’ इस्रायलविरोधात आघाडी उघडू शकतात – हमासच्या नेत्याचा दावा

तेहरान – ‘इस्रायल हा आपल्या सर्वांचा समान शत्रू असून पॅलेस्टाईनसाठी हमास तसेच तुर्की, इराण आणि कतार एकत्र येऊ शकतात. आखातातील परिस्थिती पाहता, इस्रायलच्या विरोधात ही आघाडी उभारणे आवश्यक बनले आहे’, असे आवाहन इराणमधील हमासचा नेता ‘खालेद अल-कदूमी’ याने केले. गेल्याच महिन्यात इस्रायल व संयुक्त अरब अमिरात (युएई) यांच्यात द्विपक्षीय संबंध प्रस्थापित झाले होते. याचा निषेध नोंदविणार्‍या इराण, तुर्की, कतार या देशांची आघाडी या क्षेत्रातील तणाव वाढवू शकते.

इस्रायलच्या शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात युएई’ला दिलेल्या भेटीनंतर हमासह इराण, तुर्की व कतार यांच्यातील बेचैनी कमालीची वाढली आहे. लवकरच आखातातील इतर देशही इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करतील, असा दावा अमेरिका करीत आहे. या पार्श्वभूमीवर, हमासने गेल्या दोन आठवड्यांमध्ये आखातातील इस्रायलविरोधी देश व संघटनांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलविरोधकांची एक मोठी आघाडी उघडण्यासाठी हमासकडून हे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. इराणमधील एका वर्तमानपत्राशी बोलताना हमासचे नेते ‘खालेद अल-कदूमी’ यांनी याविषयीची माहिती दिली.

‘आखातातील कारभारात परदेशी हस्तक्षेप किंवा कुठलाही हल्ला रोखायचा असेल, तर हमाससह इराण, तुर्की आणि कतार यांची आघाडी स्थापन करणे आवश्यक आहे. या तीनही देशांमधील राजकीय आणि आर्थिक सहकार्य या क्षेत्रातील देशांच्या भल्याचे ठरेल’, असा दावा इराणमधील हमासचा नेता ‘खालेद अल-कदूमी’ याने केला. त्याचबरोबर खालेद यांनी इस्रायलवर जोरदार टीका केली. ‘अरब-इस्लामी देशांमध्ये बंड घडवून किंवा आपल्या सॉफ्ट पॉवरचा वापर करुन या क्षेत्रात अस्थैर्य निर्माण करीत आहे. हीच वेळ आहे, जेव्हा पॅलेस्टाईनच्या मुद्यावर एकमत असलेल्या सर्व देशांनी एकत्र येऊन इस्रायलच्या विरोधात आघाडी उघडावी’, असे आवाहन कदूमी यांनी केले.

इस्रायल आणि युएईतील सहकार्यानंतर गेल्याच महिन्यात तुर्कीने हमासच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी इस्रायल व युएईतील सहकार्य बेकायदेशीर असून लवकरच याला प्रत्युत्तर मिळेल, असे म्हटले होते. तर हमासच्या नेत्यांनी गेल्या दोन दिवसात इराणमध्ये रोहानी सरकारच्या मंत्र्यांशी तर लेबेनॉनमधील हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाशी चर्चा केली होती. हमास आणि हिजबुल्लाहच्या बैठकीत इस्रायलच्या विरोधात जगभरातील कट्टर गटांची आघाडी उघडण्याची घोषणा दोन्ही गटांच्या नेत्यांनी केली होती. यामुळे दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून आखातात दोन मोठे गट तयार झाले असून यामध्ये सौदी अरेबिया आणि अरब देशांचा एक गट आहे. तर दुसरीकडे सौदीचे नेतृत्त्व अमान्य असलेला तुर्की, इराण आणि कतार यांचा एक गट आहे.

 

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info