कोरियन क्षेत्रातील तणावाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियात एफ-३५ दाखल होणार

कोरियन क्षेत्रातील तणावाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियात एफ-३५ दाखल होणार

सेऊल/प्योनगॅंग – उत्तर कोरिया कडून देण्यात येणाऱ्या धमक्या व लष्करी तैनातीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियानेही आपली संरक्षणसज्जता वाढविण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत. येत्या काही महिन्यात दक्षिण कोरियात ४० नवीन ‘एफ-३५ स्टेल्थ फायटर’ विमाने दाखल होत आहेत. उत्तर कोरिया आपल्याकडील अण्वस्त्रांचा साठा वाढवत असून काही ‘सिक्रेट सबमरीन बेस’ उभारल्याचे दावेही समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर नवी ‘एफ-३५’ दाखल होणे महत्वाचे ठरते.

दक्षिण कोरिया, एफ-३५, उत्तर कोरिया

गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांची बहीण किम यो जाँगने दक्षिण कोरियाला लष्करी कारवाईची धमकी दिली होती. त्यापूर्वी उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाबरोबरील सर्वच पातळ्यांवरील संपर्क तोडून टाकला होता. दक्षिण कोरियाच्या सीमेवरून उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांची हेटाळणी करणारे बलून्स सोडले जात आहेत व दक्षिण कोरियन सरकार या कारवाया थांबविण्यास अपयशी ठरले आहे, असा ठपका ठेऊन उत्तर कोरियाने हा निर्णय घेतला होता.

त्यानंतर अधिक आक्रमक झालेल्या उत्तर कोरियाने दोन देशांमधील राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी उभारण्यात आलेले कार्यालय बॉम्बस्फोटात उडवून दिले. त्याचवेळी उत्तर कोरियाच्या लष्कराने आपले जवान दक्षिण कोरियाच्या सीमेला जोडून असलेल्या ‘डिमिलिटराईझ्ड झोन’मध्ये घुसण्यासाठी सज्ज असल्याची धमकीही दिली.

एकामागोमाग घडलेल्या या घटनांनी कोरियन क्षेत्रातील तणाव चांगलाच चिघळला आहे. त्यामुळे दक्षिण कोरियाने आता आपली संरक्षणसज्जता वाढविण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. उत्तर कोरियाच्या आक्रमक कारवायांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाने यापूर्वीच अमेरिकेकडून ‘एफ-३५’ ही प्रगत लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात दोन देशांमध्ये करारही झाला असून १३ विमाने दक्षिण कोरियाच्या हवाईदलात दाखल झाली आहेत.

नव्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘एफ-३५’ विमानांची नवी तुकडी लवकर मिळावी यासाठी दक्षिण कोरियाने प्रयत्न सुरू केले होते. त्याला यश आले असून अमेरिकी कंपन्यांनी पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत ४० ‘एफ-३५’ माने दक्षिण कोरियाला मिळतील असे संकेत दिले आहेत. ‘एफ-३५’ ही ‘फिफ्थ जनरेशन’ प्रकारातील स्टेल्थ लढाऊ विमाने असून त्यांच्यात अणुबॉम्ब वाहून नेण्याची तसेच ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’ची क्षमता आहे.

दक्षिण कोरिया, एफ-३५, उत्तर कोरिया

दरम्यान, उत्तर कोरियाने अण्वस्त्रांच्या साठ्यात गुप्तपणे नवी भर टाकल्याची माहिती समोर आली आहे. युरोपातील ‘सिप्री’ या अभ्यासगटाने ही माहिती दिली असून १० नवी अण्वस्त्रे तयार केल्याचे म्हटले आहे. कांगसोनमधील युरेनियमचे संवर्धन करणाऱ्या प्रकल्पावर ही अण्वस्त्रे दडवून ठेवल्याचा दावा ‘सिप्री’ने केला. उत्तर कोरियाकडे सध्या ३० हून अधिक अण्वस्त्रे असल्याचे सांगण्यात येते.

नव्या अण्वस्त्रनिर्मितीबरोबरच उत्तर कोरियाने काही गुप्त नौदल तळ उभारले असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. जेकब बॉगल यांनी उपग्रहांद्वारे मिळालेल्या फोटोग्राफ्सच्या आधारे याबाबत माहिती दिली आहे. उत्तर कोरियाच्या पूर्व किनारपट्टी भागात असणाऱ्या ‘सिंपो’मध्ये हे तळ उभारण्यात आले आहेत. या तळांवर युद्धनौका तसेच पाणबुड्यांच्या तैनातीची व्यवस्था करण्यात आल्याचे बॉगल यांनी आपल्या दाव्यात म्हटले आहे.

दक्षिण कोरियाच्या सीमेनजीक पाठविण्यात आलेल्या लष्करी तुकड्या, नवी अण्वस्त्रे आणि गुप्त नौदल तळाच्या उभारणीतून उत्तर कोरिया नव्या संघर्षाची तयारी करीत असल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिका व दक्षिण कोरियावर दबाव टाकण्यासाठी उत्तर कोरियाकडून ही तयारी सुरू झालेली असू शकते असा दावाही विश्लेषकांकडून करण्यात येत आहे.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info