अरब लिगचा पॅलेस्टाईनला धक्का

अरब लिगचा पॅलेस्टाईनला धक्का

कैरो – इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य कराराचा अरब लीगने निषेध करावा, अशी मागणी पॅलेस्टाईनच्या सरकारने केली होती. पण सदर सहकार्यावर टीका करण्याचा पॅलेस्टाईनचा हा प्रस्ताव अरब लिगने फेटाळला. या संघटनेतील काही देश पॅलेस्टाईनच्या या भूमिकेच्या विरोधात असल्याचे अरब लिगने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पॅलेस्टिनी सरकारने अरब लिगवर ताशेरे ओढून तुर्की व इराणबरोबरील आपले संबंध अधिकच दृढ केले आहेत. पॅलेस्टिनी सरकारच्या या भूमिकेवर नाराज झालेल्या अरब लिगने सदर प्रस्ताव फेटाळल्याचा दावा केला जातो. यामुळे आखाती देशांमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहे.

अरब लिग

अरब लिगमधील २२ सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची व्हर्च्युअल बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीच्या निमित्ताने वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी प्रशासनाने इस्रायल आणि युएईमधील करारावर टीका केली. अरब लिगने इस्रायल-युएईतील सहकार्याचा जाहीर निषेध करावा, इस्रायल-युएई सहकार्य अजिबात मान्य करु नये, अशी मागणी पॅलेस्टिनी परराष्ट्रमंत्री रियाद मलिकी यांनी केली होती. तसेच या सहकार्याद्वारे अमेरिका आखाती देशांना ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप पॅलेस्टिनी परराष्ट्रमंत्र्यांनी केला. पॅलेस्टिनींनी कुठल्याही देशाला आपला प्रतिनिधी म्हणून घोषित केले नसून अरब देशांनी सदर सहकार्य धुडकावून लावावे, असेही मलिकी यांनी या बैठकीत स्पष्ट केले. पण अरब लिगमधील काही देशांनीच पॅलेस्टिनी सरकारचा हा प्रस्ताव धुडकावला. त्याचबरोबर पॅलेस्टाईनला देण्यात येणारे अर्थसहाय्य रोखण्याचा निर्णय या देशांनी घेतल्याचा दावा केला जातो. पण याला अधिकृत पातळीवर दुजोरा मिळालेला नाही.

अरब लिग

अरब लिगकडून इस्रायल-युएई द्विपक्षीय सहकार्याचा कडक शब्दात निषेध केल्याखेरीज दुसर्‍या कशानेही आपले समाधान होणार नसल्याची टोकाची भूमिका पॅलेस्टाईनच्या नेत्यांनी या बैठकीत घेतली होती. या टोकाच्या भूमिकेमुळेच सदर प्रश्न बारगळला, असे अरब लिगच्या एका अधिकार्‍याने म्हटले आहे. त्याचवेळी इस्रायल-युएई द्विपक्षीय सहकार्याची घोषणा झाल्यानंतर तुर्की व इराणने त्याविरोधात स्वीकारलेल्या जहाल भूमिकेचे पॅलेस्टाईनने स्वागत केले होते. ही बाब देखील अरब लिगच्या सदस्यांना खटकणारी ठरली होती. त्याचाही प्रभाव या बैठकीत पडला होता.

दरम्यान, इस्रायल आणि युएईतील सहकार्याचे इजिप्त, जॉर्डन या अरब देशांनी स्वागत केले. तर बाहरिन, ओमान या देशांनी इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्याचे संकेत दिले आहेत. सौदी अरेबियाने सदर सहकार्याबाबत आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली नाही. तर दुसरीकडे इस्रायल आणि युएईतील सदर सहकार्य बेकायदेशीर असून युएईने पॅलेस्टिनींशी दगा केल्याची टीका इराण, तुर्की तसेच पॅलेस्टाईनमधील हमास व फताह या दोन्ही गटांनी केली होती. तसेच इस्रायलविरोधातील पॅलेस्टिनींच्या लढ्याला आपले समर्थन असल्याचे इराण व तुर्कीने जाहीर केले होते.

English   मराठी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info