‘डूम्स डे’ ड्रोन वाहून नेणारी रशियन पाणबुडी तैनातीसाठी सज्ज – रशियन वृत्तसंस्थेची माहिती

‘डूम्स डे’ ड्रोन वाहून नेणारी रशियन पाणबुडी तैनातीसाठी सज्ज – रशियन वृत्तसंस्थेची माहिती

मॉस्को/वॉशिंग्टन – सुमारे तीनशे फूट उंचीची त्सुनामी निर्माण करून अख्खे शहर बुडवण्याची क्षमता असलेले रशियाचे ‘डूम्स डे’ ड्रोन तैनातीसाठी सज्ज झाले आहे. सदर डूम्स डे अर्थात ‘पोसायडन’ ड्रोन वाहून नेणारी रशियाची बेल्गोरॉड ही अजस्त्र पाणबुडी लवकरच पॅसिफिक महासागर क्षेत्रात तैनात होणार असल्याची माहिती रशियन वृत्तसंस्थेने दिली. त्याचबरोबर आर्क्टिक क्षेत्रातही रशियाच्या लष्करी हालचाली वाढल्या असल्याचा दावा नॉर्वेतील लष्करी विश्‍लेषकाने केला आहे. त्यामुळे रशिया आर्क्टिकमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा दावा पाश्‍चिमात्य माध्यमे करू लागली आहेत.

सध्या रशियाच्याच ताफ्यात असलेली टायफून श्रेणीतील पाणबुडी ही जगातील सर्वात मोठ्या आकाराची मानली जाते. पण सुमारे १८४ मीटर लांबीची बोल्गोरोड ही जगातील सुपर-साईज् पाणबुडी ठरली आहे. ३० ते ३२ सागरी मैल वेगाने प्रवास करणारी ही पाणबुडी ५०० मीटर खोल जाऊ शकते. तसेच या पाणबुडीमध्ये १०० खलाशी नेण्याची क्षमता आहे. याशिवाय या पाणबुडीत एकाचवेळी सहा पोसायडन ‘डूम्स डे’ ड्रोन वाहून नेण्याची क्षमता असल्याचे रशियाने याआधी जाहीर केले होते.

साधारण एक हजार किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकणारे डूम्स डे ड्रोन मेगाटन वजनाची आण्विक स्फोटके वाहून नेऊ शकते. त्यामुळे एकाच क्षणात युद्धाचे पारडे फिरविण्याची क्षमता या डूम्स डे ड्रोनमध्ये आहे. स्वयंचलित असणारे हे ड्रोन उत्तर अटलांटिक क्षेत्र सहज पार करू शकेल, असा दावा केला जातो. सर्वात विध्वंसक असणारे हे ड्रोन शत्रूच्या हाती लागू नये किंवा सायबर दहशतवादी याचा गैरवापर करू नये म्हणून हे हॅक-फ्री केल्याचा दावा रशियन यंत्रणांनी याआधी केला होता. गेल्या वर्षी याची चाचणीही घेण्यात आली होती.

असे हे डूम्स डे ड्रोन वाहून नेणारी बोल्गोरोड पाणबुडी पॅसिफिकमधील तैनातीसाठी सज्ज झाल्याची माहिती, रशियन संरक्षण मंत्रालयाशी संबंधित असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने रशियन वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली. मे महिन्यातील चाचणीनंतर ही तैनाती शक्य असल्याचे रशियन वृत्तसंस्थेने म्हटले आहे. रशिया अशा आणखी तीन पाणबुड्यांची निर्मिती करणार आहे. पण या बातमीमुळे पाश्‍चिमात्य माध्यमांमध्य खळबळ उडाली आहे. रशियाची पाणबुडी व हे डूम्स डे ड्रोन आपल्या पूर्व किनारपट्टीच्या विनाशासाठी असल्याचा आरोप अमेरिकेने याआधी केला होता.

रशिया आर्क्टिकच्या हद्दीतून या डूम्स डे ड्रोनचे प्रक्षेपण करून अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर हाहाकार माजवू शकतो, असा ठपका अमेरिकेच्या लष्करी विश्‍लेषकांनी आधी केला होता. त्याचा दाखला देऊन पाश्‍चिमात्य माध्यमे रशियन पाणबुडीच्या या तैनातीवर चिंता व्यक्त करीत आहेत. तर नॉर्वेतील ‘इन्स्टिट्युट फॉर डिफेन्स स्टडिज्’चे विश्‍लेषक कॅटारझिना झिस्क यांनी आर्क्टिक क्षेत्रात रशियाने मोठी लष्करी तैनाती केल्याचे म्हटले आहे.

आर्क्टिकमध्ये रशियाने मोठ्या प्रमाणात आपल्या पाणबुड्यांची तैनाती केली आहे. या पाणबुड्यांच्या सहाय्याने रशिया या क्षेत्राचा ताबा घेऊ शकतो, असे झिस्क यांचे म्हणणे आहे.

English  हिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info