अथेन्स/इस्तंबूल – तुर्कीकडून भूमध्य सागरी क्षेत्रातील हक्कांवरून सातत्याने देण्यात येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर ग्रीसने मोठ्या प्रमाणात संरक्षणसिद्धतेची तयारी सुरु केली आहे. संरक्षणदलांना पुन्हा व्यापक प्रमाणात सज्ज करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात ग्रीक पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकीस यांनी संरक्षणदलांची सिद्धता वाढविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निर्णयांची माहिती दिली. त्यानुसार, ग्रीस १८ रफायल लढाऊ विमानांसह चार विनाशिका, नेव्ही हेलिकॉप्टर्स व क्षेपणास्त्रे तातडीने खरेदी करणार आहे. त्याचवेळी ग्रीसच्या संरक्षणदलांमध्ये १५ हजार नव्या जवानांची भरती करण्यात येणार असून देशातील संरक्षण उद्योगाला अतिरिक्त अर्थ सहाय्य पुरविण्यात येणार आहे. गेल्याच आठवड्यात ग्रीसने सात दशके ‘डिमिलिटराईझ्ड झोन’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या तुर्कीनजिकच्या एका बेटावर लष्कर तैनात करून आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले होते.
भूमध्य सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर इंधनाचे साठे असल्याचे आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण व अहवालांमधून समोर आले आहे. इस्रायल, ग्रीस, सायप्रस व तुर्कीच्या सागरी हद्दीत हे साठे असून, त्यातील अधिकाधिक क्षेत्रावर ताबा मिळवण्यासाठी तुर्कीने कारवाया सुरू केल्या आहेत. भूमध्य सागरात ग्रीस तसेच सायप्रसच्या अधिकाराखाली असणाऱ्या क्षेत्रावर आपलाच हक्क असल्याचे दावे तुर्कीकडून करण्यात येत आहेत. आपला दावा भक्कम करण्यासाठी गेल्यावर्षी तुर्कीने लिबियाबरोबर एक करारही केला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात तुर्कीने ‘नॅव्हटेक्स अलर्ट’ जारी करून आपले ‘ओरुक रेईस’ हे ‘रिसर्च शिप’ दोन जहाजांसह भूमध्य सागरी क्षेत्रात संशोधनासाठी तैनात केले होते.
या मुद्यावर ग्रीससह युरोपीय देशांनी केलेले आवाहन धुडकावून तुर्कीने भूमध्य समुद्रात जबरदस्तीने इंधन उत्खनन सुरू केले आहे. आपल्या या मोहिमेचे समर्थन करण्यासाठी तुर्कीने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संरक्षणतैनाती केली असून, एकापाठोपाठ एक युद्धसराव आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी इतिहासाचे दाखले देत युरोपीय देशांना धमकावण्यासही सुरुवात केली आहे. भूमध्य समुद्रात तुर्कीने केलेली विनाशिकांची तैनाती तसेच तुर्कीच्या लढाऊ विमानांच्या घिरट्या, यामुळे सदर सागरी क्षेत्रात कमालीचा तणाव वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रीस व फ्रान्ससह युरोपिय देशही आक्रमक होत असल्याचे ग्रीक पंतप्रधानांच्या नव्या घोषणेवरून दिसून येते. पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकीस यांनी ग्रीसच्या संरक्षणदलांचे सामर्थ्य वाढविण्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. याअंतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून ग्रीसची संरक्षणदले देशाची मजबूत ढाल बनतील, अशी ग्वाही ग्रीक पंतप्रधानांनी दिली. १८ रफायल लढाऊ विमानांसह, चार विनाशिका, नेव्ही हेलिकॉप्टर्स, अँटी टॅंक वेपन्स, नेव्ही टोर्पेडोज व प्रगत हवाई क्षेपणास्त्रे खरेदी करण्यात येणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर ग्रीसकडून संरक्षणसिद्धतेबाबत घोषणा करण्यात आल्याचे सांगण्यात येते. नव्या शस्त्रखरेदीबरोबरच संरक्षणदलांचा विस्तारही करण्यात येणार असून १५ हजार नव्या जवानांचा समावेश करण्यात येणार आहे.
ग्रीस व फ्रान्सकडून तुर्कीला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू असतानाच तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा एकदा या देशांना धमकावण्यास सुरुवात केली आहे. ‘मॅक्रॉन, तुम्हाला माझ्याकडून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. तुम्हाला इतिहासाचे योग्य ज्ञान नाही. तुम्ही तुर्कीला मानवतेचे धडे द्यायला जाऊ नका. तुमच्याकडे फारसा वेळ राहिलेला नाही आणि तुमची कारकीर्द अखेरच्या टप्प्यात आहे. तुर्की अथवा तुर्कीच्या जनतेशी खेळण्याचा प्रयत्न करू नका’, अशा शब्दात तुर्की राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचे नाव घेत उघड धमकी दिली. तुर्की राष्ट्राध्यक्षांच्या या धमकीनंतर अमेरिकेकडून प्रतिक्रिया उमटली आहे.
‘तुर्कीकडून भूमध्य सागरी क्षेत्रात सुरू असणाऱ्या कारवाया तीव्र चिंताजनक आहेत. या भागातील लष्करी तणाव वाढला तर त्याचा फायदा शत्रूंना होऊ शकतो. सुरक्षा तसेच इंधनाशी निगडित वाद राजनैतिक पातळीवरच सोडवायला हवेत’, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी बजावले आहे.
Englishया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |