युएईच्या राजधानीतील विमानतळाला लक्ष्य करणार्‍या येमेनमधील हौथी बंडखोरांवर युएईसह अरब मित्रदेशांचे जोरदार हवाई हल्ले

एडन/रियाध – युएईची राजधानी अबू धाबीच्या विमानतळाला ड्रोन्सद्वारे लक्ष्य करणार्‍या येमेनी बंडखोरांवर अरब मित्रदेशांच्या आघाडीने जोरदार हवाई हल्ले चढविले. यात १४ जण ठार झाले आहेत. आपल्यावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार युएईला आहे, असे युएईने बजावले आहे. त्याचवेळी हौथी बंडखोरांना दहशतवाद्यांच्या यादीतून वगळणार्‍या अमेरिकेने पुन्हा ‘टेरर लिस्ट’मध्ये त्यांचा समावेश करावा, अशी मागणी युएईच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली.

विमानतळाला

सोमवारी सकाळी येमेनमधील हौथी बंडखोरांनी युएईची राजधानी अबू धाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इंधन प्रकल्पाजवळ सुमारे ड्रोन्सद्वारे २० हल्ले चढविले. याशिवाय हौथींनी या हल्ल्यासाठी दहा बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचा दावा इराणी माध्यमे करीत आहेत. याला दुजोरा मिळू शकलेला नाही. या हल्ल्यांमध्ये दोन भारतीयांसह तिघांचा बळी गेला आहे.

राजधानी अबू धाबीमध्ये युएईच्या राजघराणे स्थित आहे. तसेच सरकारी आस्थापनांच्या इमारती देखील अबू धाबीतच आहे. त्यामुळे हौथी बंडखोरांनी या हल्ल्याद्वारे युएईला इशारा दिल्याचा दावा केला जात होता. हौथी बंडखोरांच्या राजवटीतील माहिती विभागाचा प्रमुख झैफोल्ला अल-शमी याने इराणच्या वृत्तसंस्थेशी बोलताना युएईला उघडपणे धमकावले.

विमानतळाला

‘हौथीच्या जवानांनी अबू धाबीवर चढविलेले हल्ले पूर्णपणे योग्य आणि कायदेशीर आहेत. येत्या काळात युएईने येमेनला लक्ष्य करणे सुरूच ठेवले तर याहून भीषण हल्ले चढविले जातील, हा इशारा देण्यासाठी हे हल्ले चढविले होते’, अशी धमकी हौथीच्या नेत्याने दिली. यानंतर अवघ्या काही तासातच सौदी अरेबिया, युएई व अरब मित्रदेशांच्या लष्करी आघाडीने येमेनमधील हौथींच्या ठिकाणांवर कारवाई केली.

मंगळवारी पहाटेच सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली अरब देशांच्या लढाऊ विमानांनी येमेनची राजधानी सना येथील हौथींच्या ठिकाणांवर हल्ले चढविले. २०१५ सालापासून येमेनमधील हौथी बंडखोरविरोधी संघर्षात सहभागी झालेल्या सौदीप्रणित लष्करी आघाडीमध्ये युएई, बाहरिन, कुवैत, इजिप्त, जॉर्डन, कतार, सुदान, मोरोक्को, सेनेगल या देशांनी सहभाग घेतला होता. चार वर्षांपूर्वी सौदीबरोबर राजकीय तणाव निर्माण झाल्यानंतर कतार या आघाडीतून बाहेर पडला. तर सुदान, इजिप्त व मोरोक्को लष्करी कारवाईमध्ये सहभागी झाले आहेत. ‘हौथी बंडखोरांचे हे भ्याड हल्ले असून याद्वारे आखाती क्षेत्रात दहशत आणि तणाव वाढविण्याचा हौथींचा कट होता. युएईच्या जनतेची सुरक्षा धोक्यात टाकणार्‍या हौथींवर आंतरराष्ट्रीय समुदायाने कारवाई करावी’, असे आवाहन युएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले. तर आपल्या देशाच्या राजधानीवर हल्ले चढविणार्‍या हौथींवर कारवाई करण्याचा युएईला पूर्ण अधिकार असल्याचे या देशाचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला बिन झाएद अल नह्यान यांनी म्हटले आहे.

विमानतळाला

त्याचबरोबर गेल्या वर्षी अमेरिकेच्या ‘फॉरिन टेररिस्ट ऑर्गनायझेशन’च्या यादीतून हौथींना वगळणार्‍या बायडेन प्रशासनाने या दहशतवादी संघटनेचा पुन्हा या यादीत समावेश करावा, अशी मागणी नह्यान यांनी केली. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत युएईच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ही मागणी केली. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी युएईवरील हल्ल्याचा निषेध नोंदविला आहे.

दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युएईच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली. अशा न खपवून घेता येण्याजोग्या कारवाईच्या विरोधात भारत युएईबरोबर एकजुटीने उभा असल्याची प्रतिक्रिया परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिली. तर इस्रायलने युएईला या हल्ल्याबाबत आवश्यक ती गोपनीय माहिती पुरविण्याचे आश्‍वासन दिले.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info