Breaking News

इस्रायल इराणवर हल्ल्याची योजना आखत आहे -इस्रायलच्या वर्तमानपत्राची माहिती

जेरूसलेम – अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन इराणबरोबर नव्याने अणुकरार करतील, अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. म्हणूनच इराणचा अणुकार्यक्रम रोखण्यासाठी इस्रायलने लष्करी पर्यायांचा वापर करण्याची तयारी केली आहे. इस्रायलचे लष्कर इराणवरील कारवाईसंदर्भात तीन योजना आखत आहे. लवकरच हे पर्याय पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यासमोर ठेवण्यात येतील, अशी बातमी इस्रायलच्या आघाडीच्या दैनिकाने प्रसिद्ध केली. काही तासांपूर्वी इस्रायलच्या वरिष्ठ मंत्र्यांनी देखील अमेरिकेने इराणशी अणुकरार केलाच तर इस्रायल इराणच्या अणुकार्यक्रमाला लक्ष्य करील, अशी धमकी दिली होती.

गेल्या दहा दिवसांमध्ये इराणने आपल्या अणुकार्यक्रमाशी संबंधित चिथावणीखोर घोषणा केल्या आहेत. २०१५ सालच्या अणुकराराच्या सर्व मर्यादा ओलांडून इराणने युरेनियमचे संवर्धन २० टक्क्यापर्यंत नेण्याचे जाहीर केले. त्याचबरोबर फोर्दो येथील अणुप्रकल्प कार्यान्वित देखील केला आहे. या व्यतिरिक्त एक हजार सेंट्रिफ्यूजेस देखील सक्रीय करीत असल्याचे इराणच्या वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले होते. यावर इस्रायलमधून प्रतिक्रिया उमटली होती.

इस्रायलचे सांस्कृतिकमंत्री झाकी हानेग्बी यांनी अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना उद्देशून इशारा दिला. बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर इराणशी नव्याने अणुकरार केला तर इस्रायल इराणच्या अणुकार्यक्रमावर हल्ले चढविल, असे हानेग्बी यांनी धमकावले होते. ‘काही झाले तरी इस्रायल इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही. याआधी १९८१ साली इराकच्या व २००७ साली सिरियाच्या अणुप्रकल्पावर इस्रायलने हल्ले चढविले होते’, अशा स्पष्ट शब्दात सांस्कृतिकमंत्री हानेग्बी यांनी इराणसह अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षांना बजावले होते.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे जवळचे सहकारी म्हणून हानेग्बी यांचा उल्लेख केला जातो. त्यामुळे त्यांनी दिलेल्या या इशार्‍याला इस्रायली तसेच आखाती माध्यमांनी महत्त्व दिले होते. त्यातच इस्रायलमधील लोकप्रिय वर्तमानपत्राने गुरुवारी इस्रायलचे लष्कर इराणवरील हल्ल्याची योजना आखत असल्याची बातमी प्रसिद्ध केली. इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख अविव कोशावी यांनी आपल्या अधिकार्‍यांना इराणच्या अणुकार्यक्रमावरील हल्ल्याच्या तीन योजना तयार करण्याची सूचना केली आहे. सदर तीन पर्याय पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्यासमोर मांडण्यात येतील, असे या वर्तमानपत्राने म्हटले आहे.

तर काही दिवसांपूर्वी इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी देखील इराणचा अणुकार्यक्रम रोखण्यासाठी इस्रायलकडे वेगवेगळे लष्करी पर्याय उपलब्ध असावे, असे म्हटले होते. त्याचाही उल्लेख याच बातमीत करण्यात आला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षांनी इराणसह अणुकरार केलाच तर इस्रायल काय करू शकेल, याची जाणीव या देशाकडून करून दिली जात आहे.

दोनच दिवसांपूर्वी सिरियाच्या पूर्वेकडील ‘देर अल-झोर’ येथील इराणच्या लष्करी तळावर झालेले हल्ले हा इराणसाठी संदेश होता, असे इस्रायलच्या लष्करी गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख अमोस याद्लिन यांनी म्हटले होते. अमेरिकेत बायडेन यांचे प्रशासन आले तरी इस्रायलचे हल्ले थांबणार नाहीत, हा संदेश इराणला मिळावा, यासाठी ही कारवाई केल्याचे याद्लिन यांनी ठणकावले. सिरियातील या हल्ल्यात इराणसंलग्न गटाचे ५७ दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला जातो.
दरम्यान, २०२१ साली इस्रायल आणि इराण यांच्यात सिरियामध्ये संघर्ष भडकेल. सिरियाच्या दक्षिणेकडे, गोलान सीमेजवळ या संघर्षाची सुरुवात होईल, असा दावा रशियन वर्तमानपत्राने केला आहे. इस्रायलचे माजी लष्करी आणि गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी तसे संकेत देत असल्याचे रशियन वर्तमानपत्राने म्हटले आहे.

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info