आर्मेनिया-अझरबैजान युद्धाने रशिया-तुर्की संघर्ष पेटण्याचे संकेत – तीन हजारांहून अधिक जणांचा बळी गेल्याचे दावे

येरेवान/बाकु – आर्मेनिया व अझरबैजानमध्ये भडकलेल्या युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून त्याचे पडसाद इतर देशांमध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे. या युद्धात तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी अझरबैजानला उघडपणे समर्थन दिल्याने रशिया नाराज झाल्याचे मानले जाते. ही नाराजी दोन देशांमधील तणाव अधिक चिघळवणारी ठरेल, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. त्याचवेळी फ्रान्सने आर्मेनियाच्या बाजूने उभे राहण्याचे संकेत दिले असून रशिया व अमेरिकेशी चर्चा करून भूमिका स्पष्ट करू, असे जाहीर केले आहे. दरम्यान, दोन्ही देशांनी परस्परांची मोठी हानी केल्याचे दावे केले असून बळींची संख्या तीन हजारांवर गेल्याचे सांगण्यात येते.

रविवारपासून आर्मेनिया व अझरबैजानमध्ये सुरु झालेले युद्ध सलग चौथ्या दिवशीही चालू असून त्याचा भडका अधिकच तीव्र होत चालला आहे. दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणात लढाऊ विमाने, ड्रोन्स, हेलिकॉप्टर्स व रणगाड्यांचा वापर झाल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. आता आर्मेनियाने रशियाकडून घेतलेली प्रगत ‘इस्कंदर मिसाईल सिस्टिम’ तैनात करण्याचा इशाराही दिला आहे. त्याचवेळी आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनयान यांनी लष्करी संघर्ष सुरू असेपर्यंत अझरबैजानशी चर्चा शक्य नसल्याचे बजावले आहे. अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इलहाम अलीयेव्ह यांनीही माघारीस नकार दिला असून, आर्मेनियन लष्कर ‘नागोर्नो -कॅराबख’मधून बाहेर पडल्याशिवाय बोलणी नाहीत, असा इशारा दिला.

दोन्ही देशांनी परस्परांची मोठी हानी केल्याचे दावेही केले आहेत. गेल्या चार दिवसात अझरबैजानचे ७९० जवान मारले गेले असून १३७ सशस्त्र वाहने व रणगाडे आणि ७२ ड्रोन्स नष्ट केल्याचा दावा आर्मेनियाच्या संरक्षण विभागाने केला आहे. तर आर्मेनियाच्या तब्बल २,३०० जवानांना मारल्याचा दावा अझरबैजानच्या संरक्षण विभागाने केला. त्याचवेळी आर्मेनियाच्या २०० हून अधिक आर्टिलरी व मिसाईल सिस्टीम्स आणि २५ एअर डिफेन्स सिस्टीम्स नष्ट केल्याचेही म्हटले आहे. दोन्ही देशांच्या या दाव्यांना स्वतंत्ररित्या दुजोरा मिळालेला नाही. मात्र या वाढत्या संघर्षाचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटण्यास सुरुवात झाली आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी चार दिवसात दुसऱ्यांदा आर्मेनियाच्या पंतप्रधानांशी बोलणी केल्याची माहिती समोर आली आहे. रशिया व आर्मेनियामध्ये संरक्षण करार असून, त्यानुसार रशिया आर्मेनियाला शस्त्रपुरवठा करू शकतो. आर्मेनियात रशियाचा संरक्षणतळ असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे आर्मेनिया रशियासाठी सामरिकदृष्ट्या महत्वाचा देश ठरतो. दुसऱ्या बाजूला तुर्कीने अझरबैजानबरोबरील आपले लष्करी व इंधन सहकार्य मजबूत केले आहे. अझरबैजान हा युरोपला इंधनपुरवठा करणाऱ्या देशांपैकी एक असून, या देशाबरोबर जवळीक दृढ करून युरोपच्या इंधन व्यापारावर नियंत्रण ठेवण्याचे तुर्कीचे इरादे आहेत. त्याचवेळी इस्लामी देश असणाऱ्या अझरबैजानमध्ये तुर्की वंशीयांची संख्या मोठी असल्याने त्या माध्यमातून इस्लामी जगतातील आपले स्थान बळकट करण्याची तुर्की राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांची महत्त्वाकांक्षा असल्याचेही मानले जाते. मात्र तुर्कीचे हे इरादे रशियन हितसंबंधाना धक्के देणारे असल्याने रशियाकडून त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, फ्रान्सनेही या संघर्षात उडी घेतली असून तुर्कीला लक्ष्य केले आहे. तुर्कीने अझरबैजानला सहाय्य देण्याबाबत केलेली वक्तव्ये त्यांच्या युद्धखोर मानसिकतेची निदर्शक असल्याचा आरोप फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केला. त्याचवेळी फ्रान्स आपली भूमिका योग्य रीतीने पार पाडेल, याची आपण आर्मेनिया व आर्मेनियन जनतेला खात्री देतो, असा संदेशही फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी दिला. आपण रशिया तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी या मुद्यावर चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info