बीजिंग/तैपेई – ‘साऊथ चायना सी’मध्ये अमेरिकी युद्धनौकांचा वाढता वावर आणि तैवानला अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मिळणारे वाढते समर्थन या पार्श्वभूमीवर, चीनने तैवानवरील आक्रमणाच्या तयारीला अधिकच वेग दिल्याचे समोर आले आहे. तैवानवरील संभाव्य हल्ल्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या तळांवर चीनने लष्करी तैनाती वाढवली असून प्रगत क्षेपणास्त्रे व सुरक्षयंत्रणा तैनात केल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने ‘डीएफ-१७’ ही हायपरसोनिक क्षेपणास्त्रे व ‘एस-४००’ ही प्रगत हवाईसुरक्षा यंत्रणा तैनात केल्याची माहिती उघड झाली आहे. कॅनडातील एका अभ्यासगटाने यासंदर्भातील सॅटेलाईट फोटोग्राफ्सही प्रसिद्ध केले आहेत. त्याचवेळी चीनच्या माजी लष्करी अधिकाऱ्याने, चीनची सध्याची तयारी व सातत्याने सुरु असणारे सराव या गोष्टी, तैवानविरोधातील युद्धापासून चीन फक्त एक पाऊल दूर असल्याचे दाखवितात, असा इशारा दिला आहे.
गेले काही दिवस चीन तैवाननजीकच्या क्षेत्रात आपल्या लष्करी सामर्थ्याचे आक्रमकरित्या प्रदर्शन करीत आहे. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडून सातत्याने युद्धसराव सुरू असून, त्याचे व्हिडिओ व फोटोग्राफ्सही प्रसिद्ध करण्यात येत आहेत. हे सराव तैवानवरील हल्ल्याची रंगीत तालीम असल्याचे दावे सरकारी माध्यमांकडून करण्यात येत आहेत. त्याचवेळी चीनचे माजी अधिकारी, विश्लेषक व प्रसारमाध्यमे सातत्याने तैवानवर हल्ले चढविण्याच्या धमक्याही देत आहेत. गेल्याच आठवड्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, यांनी, चीनच्या लष्करी तळांना भेट देऊन युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेशही दिले होते. या पार्श्वभूमीवर तैवान सीमेपासून जवळ असणाऱ्या संरक्षणतळांवर चीनने युद्धासाठी सज्ज असल्याचे संकेत देणारी प्रगत शस्त्रास्त्रे तैनात करणे लक्ष वेधून घेणारे ठरते.
तैवानच्या सीमेपासून जवळ असणाऱ्या फुजीआन व ग्वांगडोंगमधील तळांवर ‘डीएफ-१७’ ही हायपरसोनिक क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत. ‘डीएफ-१७’ ही मध्यम पल्ल्याची हायपरसोनिक क्षेपणास्त्रे असून त्याचा पल्ला अडीच हजार किलोमीटर्स असल्याचे सांगण्यात येते. तैवानच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या तळांवर ही क्षेपणास्त्रे मारा करू शकतात, असा दावा करण्यात येतो. यापूर्वी चीनने या तळांवर ‘डीएफ-११’ व ‘डीएफ-१५’ ही क्षेपणास्त्रे तैनात केली होती. मात्र तैवानबरोबरील तणाव शिगेला पोहोचला असताना अत्याधुनिक क्षेपणास्त्रे तैनात करून चीन तैवानवरील दडपण वाढवित असल्याचे दिसत आहे. हॉंगकॉंगस्थित ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने हे वृत्त दिले आहे. कॅनडातील एक अभ्यासगट ‘कांवा डिफेन्स रिव्ह्यू’नेही यासंदर्भात माहिती प्रसिद्ध केली असून चीनमधील काही तळांचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध केले आहेत.
‘कांवा डिफेन्स रिव्ह्यू’चे प्रमुख आंद्रेई चँग यांनी, चीनने तैवाननजिकच्या तळांवर रशियन बनावटीची प्रगत हवाईसुरक्षा यंत्रणा ‘एस-४००’ तैनात केल्याचाही दावा केला. तैवानच्या कोणत्याही तळावरून येणारे लढाऊ विमान, क्षेपणास्त्रे व ड्रोन पाडण्याची क्षमता या यंत्रणेत असल्याचे चीनने म्हटले आहे. अमेरिकेने गेल्या दोन वर्षात तैवानला मोठ्या प्रमाणात लढाऊ विमाने व क्षेपणास्त्रे पुरविली आहेत. ‘एस-४००’ तैनात करून अमेरिकेच्या या वाढत्या शस्त्रसहाय्याचा तैवानला फायदा होणार नसल्याचा संदेश चीनने दिल्याचे मानले जाते. ‘डीएफ-१७’ व ‘एस-४००’व्यतिरिक्त ‘जे-२०’ या स्टेल्थ लढाऊ विमानांचा समावेश असलेल्या २० ‘एअरफोर्स ब्रिगेड्स’ तसेच ‘मरिन कॉर्प्स’ची १० तुकड्या तैवाननजिक असणाऱ्या संरक्षणतळांवर तैनात करण्यात आल्या आहेत.
चीनने केलेली ही तैनाती व ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडून सातत्याने सुरू असणारे सराव या गोष्टी ‘अभूतपूर्व’ असल्याचा दावा चीनच्या माजी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे. ‘सध्याच्या हालचाली व वाढती सज्जता तैवानबरोबर शांततेच्या मार्गाने विलीनीकरण होण्याची शक्यता जवळपास संपल्याचे दर्शविणाऱ्या आहेत. चीनच्या संरक्षणदलाकडून सुरू असणारे आक्रमक युद्धसराव, चीन प्रत्यक्ष युद्धापासून फक्त एक पाऊल दूर असल्याचे दाखवितात,’ असा इशारा माजी लष्करी अधिकारी मेजर जनरल वँग झाईशी यांनी दिला. गेल्या १० दिवसात अमेरिकेच्या दोन विनाशिकांनी तैवानच्या सागरी हद्दीतून गस्त घातली होती. त्यापाठोपाठ अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस रोनाल्ड रिगन’ही सध्या ‘साऊथ चायना सी’मध्ये असल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर, चीनच्या वाढत्या हालचाली या क्षेत्रातील तणाव अधिकच चिघळविणाऱ्या ठरतात.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |