दीर्घकाळ चाललेल्या युद्धामुळे युक्रेन पाश्चिमात्य देशांचे समर्थन गमावू शकतो

- विश्लेषकांचा दावा

मॉस्को/किव्ह – रशियाबरोबर दीर्घकाळ सुरू असणाऱ्या युद्धामुळे युक्रेनला पाश्चिमात्य देशांकडून मिळणारे समर्थन व सहाय्यात घट होऊ शकते, असा दावा विश्लेषकांनी केला आहे. रशिया-युक्रेन युद्धाची मोठी आर्थिक किंमत मोजणाऱ्या युरोपिय देशांमध्ये समस्या डोके वर काढत असून युरोपियन जनता जास्त काळ युद्धाचे परिणाम सहन करु शकणार नाही, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनीही पाश्चिमात्य समुदाय युद्धाला कंटाळल्याचे संकेत मिळत आहेत, असे वक्तव्य केले होते. दरम्यान, रशियाविरोधातील युद्धात युक्रेनने आतापर्यंत 10 हजार जवान गमावल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रशिया-युक्रेन युद्धाला 100हून अधिक दिवस उलटले आहेत. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रसहाय्य तसेच आर्थिक मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व आर्थिक निधी मिळाल्याचे समोर आले आहे. या सहाय्याच्या बळावर युक्रेनने रशियन सैन्याला अनेक शहरांमधून माघार घेण्यास भागही पाडले होते. रशियाच्या या माघारीनंतर युक्रेन रशियावर विजय मिळवेल, अशा वल्गनाही करण्यात आल्या होत्या. मात्र रशियाने लष्करी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केल्यानंतर हे चित्र मोठ्या प्रमाणात बदलण्यास सुरुवात झाली आहे.

डोन्बास क्षेत्रात रशियाने जबरदस्त आघाडी मिळविली असून येत्या काही आठवड्यांमध्ये हा पूर्ण भाग रशियन नियंत्रणाखाली येण्याचे संकेत मिळत आहेत. त्याचवेळी युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून युद्धात ठार झालेले सैनिक, दररोज होणारी जीवितहानी व शस्त्रांची कमतरता यासंदर्भात वक्तव्ये सुरू झाली आहेत. युरोपिय देशांकडून रशियासंदर्भात करण्यात आलेल्या काही वक्तव्यांवर युक्रेनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. युक्रेनचे नेतृत्त्व व युरोपियन नेतृत्त्वात काही मुद्यांवरून मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. युद्धाचे उद्दिष्ट नेमके काय असावे यावरून युक्रेन व पाश्चिमात्यांमध्ये वाद झाल्याचेही समोर आले आहे.

हा घटनाक्रम पाश्चिमात्य त्यातही विशेष करून युरोपिय देश दीर्घकाळ चालणाऱ्या रशिया-युक्रेन युद्धाला कंटाळल्याचे संकेत देणारा ठरतो, असा दावा विश्लेषक करीत आहेत. युक्रेनच्या मुद्यावर रशियावर टाकण्यात येणारे निर्बंध हादेखील युरोपिय देशांना अस्वस्थ करणारा मुद्दा ठरला आहे. काही देश निर्बंधांना करीत असलेला विरोध त्याचेच निदर्शक असल्याचे इटालियन विश्लेषक मॅटिओ व्हिला यांनी सांगितले.

दरम्यान, रशियाने युक्रेनच्या चॉर्टकिव शहरातील परदेशी शस्त्रसाठा असलेला तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला. या तळावर क्षेपणास्त्रे, तोफा तसेच रॉकेट सिस्टिम्स तैनात होत्या, असे रशियन सूत्रांकडून सांगण्यात आले. युक्रेनी लष्कर शस्त्रसाठ्याची टंचाई भासत असल्याची तक्रार करीत असतानाच रशियाने केलेला हा हल्ला लक्ष वेधून घेणारा ठरतो. या हल्ल्यात 22 जण जखमी झाल्याची माहितीही देण्यात आली आहे. रशियाने गेल्या महिन्याभरात मोठ्या प्रमाणात परदेशी शस्त्रसाठा नष्ट केला असून पाश्चिमात्य देशांमधील भाडोत्री जवान असलेल्या केंद्रांनाही लक्ष्य केले आहे. यासाठी रशियाकडून प्रगत क्रूझ मिसाईल्सचा वापर होत असल्याचे सांगण्यात येते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info