‘नागोर्नो-कॅराबख’वर ताबा मिळविण्यासाठी अझरबैजान कुठल्याही थराला जाईल – राष्ट्राध्यक्ष इलहाम अलीयेव्ह यांचा इशारा

‘नागोर्नो-कॅराबख’वर ताबा मिळविण्यासाठी अझरबैजान कुठल्याही थराला जाईल – राष्ट्राध्यक्ष इलहाम अलीयेव्ह यांचा इशारा

बाकु/येरेवान – ‘सध्या निर्माण झालेली समस्या वाटाघाटींच्याच माध्यमातून सुटावी, अशी आमची इच्छा आहे. आर्मेनियन फौजांनी नागोर्नो-कॅराबखमधून माघार घ्यायला हवी. तसे घडले नाही तर क्षेत्रिय एकात्मता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी अझरबैजान कोणत्याही थराला जाऊ शकतो. यासाठी अखेरपर्यंत आमचा संघर्ष कायम राहिल’, असा इशारा अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इलहाम अलीयेव्ह यांनी दिला. अलीयेव्ह यांच्या इशाऱ्यामुळे गेल्या एक महिन्याहून अधिक काळ सुरू असलेले आर्मेनिया-अझरबैजान युद्ध थांबण्याची शक्यता पूर्णपणे मावळल्याचे दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष अलीयेव्ह यांनी तुर्की मंत्र्यांच्या भेटीत हे वक्तव्य केले असून, त्यामुळे या युद्धातील तुर्कीच्या हस्तक्षेपाला तसेच चिथावणीखोर भूमिकेला दुजोरा मिळत आहे.

इलहाम अलीयेव्ह

सप्टेंबर महिन्याच्या अखेरपासून आर्मेनिया व अझरबैजानमध्ये सुरु असलेले युद्ध आता दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसत आहे. दोन देशांमध्ये संघर्षबंदी व्हावी म्हणून रशिया, अमेरिका व युरोपकडून करण्यात आलेले चार प्रयत्न अपयशी ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय समुदाय शांततेसाठी प्रयत्न करीत असतानाच तुर्कीसारखा देश मात्र युद्ध अधिकच भडकविण्यासाठी कारवाया करीत असल्याचे दिसत आहे. तुर्कीचे मंत्री व लष्करी अधिकारी सातत्याने अझरबैजानला भेट देत असून एकापाठोपाठ एक आक्रमक वक्तव्ये चालू आहेत. तुर्कीकडून मिळणाऱ्या या पाठबळाच्या जोरावरच आता अझरबैजानही आक्रमक व चिथावणीखोर वक्तव्ये करू लागल्याचे राष्ट्राध्यक्ष अलीयेव्ह यांच्या इशाऱ्यावरून दिसत आहे.

इलहाम अलीयेव्ह

अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या इशाऱ्यामागे रशियाने आर्मेनियाला दिलेले सहकार्याचे संकेत हे कारण असल्याचे सांगण्यात येते. गेल्या पाच आठवड्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या संघर्षात अझरबैजानने पूर्वींपेक्षा जास्त भाग ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. तुर्कीच्या बळावर मिळवलेली ही आघाडी पुढे कायम ठेवण्याचे अझरबैजानचे इरादे आहेत. रशियाने आर्मेनियाला सहाय्य चालू केल्यास युद्धाचे पारडे फिरू शकते, याची अझरबैजान व तुर्कीलाही जाणीव आहे. त्यामुळेच वाटाघाटी करण्यापूर्वी दडपण आणण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे.

इलहाम अलीयेव्ह

दरम्यान, नागोर्नो-कॅराबखमध्ये अझरबैजानकडून करण्यात येणाऱ्या हल्ल्यांमध्ये आर्मेनियाच्या १,१६६ जवानांसह १२०० हून अधिक जणांचा बळी गेल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. अझरबैजानच्या फौजा नागोर्नो-कॅराबखमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या शुसीपासून पाच किलोमीटर्सच्या अंतरावर येऊन पोहोचल्याचा दावाही करण्यात आला आहे. शुसीसह चार शहरांवर सातत्याने क्षेपणास्त्र व तोफांचा मारा चालू असल्याचा आरोपही आर्मेनियाने केला आहे. अझरबैजानने हे आरोप फेटाळले असून उलट आर्मेनियन लष्कराकडून आपल्या शहरांवर हल्ले सुरू असल्याचे म्हटले आहे.

सोव्हिएत रशियातून १९९१ साली बाहेर पडल्यापासून अझरबैजान व आर्मेनिया यांच्यातील सीमावाद कायम राहिला आहे. ‘नागोर्नो-कॅराबख’ या स्वायत्त प्रांतावरून हा वाद असून आंतरराष्ट्रीय स्तरावर हा भाग अझरबैजानचा हिस्सा मानला जातो. मात्र या प्रांतात आर्मेनियन वंशाच्या नागरिकांची संख्या मोठी असून प्रांताचा काही भाग आर्मेनियाने ताब्यात घेतला आहे. गेल्या तीन दशकात या दोन्ही मध्य आशियाई देशांच्या सीमेवर संघर्षाच्या अनेक घटना घडल्या होत्या. पण चार वर्षांपासून या दोन्ही शेजारी देशांच्या सीमेवरील तणाव अधिकच वाढत चालला आहे. सध्या सुरू असलेले युद्ध दोन देशांमधील सर्वाधिक तीव्रतेचा संघर्ष म्हणून ओळखला जात असून तुर्कीच्या सहभागामुळे त्याची व्याप्ती व गुंतागुंत अधिकच वाढल्याचे दिसत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info