व्हिएन्ना/पॅरिस/बर्लिन – कट्टरपंथीयांचा दहशतवाद हा आपला समान शत्रू आहे आणि युरोप दहशतवादासमोर कधीच झुकणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही युरोपिय नेतृत्वाने दिली आहे. सोमवारी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर युरोपिय देशांमधून आक्रमक प्रतिक्रिया उमटत असून, युरोप कट्टरपंथीय व दहशतवादाविरोधात एकवटल्याचे चित्र समोर येत आहे. ऑस्ट्रियात झालेला हल्ला युरोपात गेल्या महिन्याभरात झालेला चौथा दहशतवादी हल्ला ठरला आहे. युरोपात होणारे हल्ले, ‘आयएस’ ही दहशतवादी संघटना युरोपात अजूनही सक्रिय व प्रभावी गट असल्याचे दाखवून देते, असा इशारा स्वित्झर्लंडच्या सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे.
सोमवारी रात्री आठच्या सुमारास ‘आयएस’ समर्थक दहशतवाद्यांनी व्हिएन्नातील ज्यूवंशियांच्या प्रार्थनास्थळासह अनेक ठिकाणांवर हल्ले चढविले. या हल्ल्यात एका दहशतवाद्यासह पाचजणांचा बळी गेला असून १७ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी सातजणांची प्रकृती गंभीर असून, बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हल्ला चढविणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव कुज्तिम फेझुलाय असल्याचे उघड झाले आहे. फेझुलाय ‘नॉर्थ मॅसिडॉनियन’ वंशाचा असून त्याच्याकडे ऑस्ट्रियासह ‘नॉर्थ मॅसिडॉनिया’चे दुहेरी नागरिकत्व असल्याचे समोर आले आहे. हल्ला चढविताना फेझुलायकडे ॲसॉल्ट रायफल, हँडगन व सुरा होता, अशी माहिती ऑस्ट्रियन अधिकाऱ्यांनी दिली. त्याच्या अंगावर ‘फेक एक्सप्लोजिव्ह वेस्ट’ आढळल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
फेझुलाय व्यतिरिक्त अनेक दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय आहे. व्हिएन्नातील नागरिकांकडून अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. या व्हिडिओंच्या आधारे इतर हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी शहरात व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली असून अतिरिक्त सुरक्षेसाठी लष्करी तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ऑस्ट्रियाच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने दक्षतेचा इशारा जारी करून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. व्हिएन्नातील १५ जागांवर धाडी टाकण्यात आल्या असून, अनेक संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती ऑस्ट्रियन सुरक्षामंत्री कार्ल नेहॅमर यांनी दिली.
सोमवारच्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑस्ट्रियात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून, जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर सेबॅस्टियन कर्झ यांनी व्हिएन्नातील हल्ला कट्टरपंथीयांनीच घडविल्याचे सांगून, हा संस्कृती व रानटी क्रौर्य यातील संघर्ष असल्याचे बजावले. ‘फ्रान्सनंतर आमचा सहकारी असणाऱ्या देशाला हल्ल्याचे लक्ष्य करण्यात आले. हा आमचा युरोप आहे. युरोपच्या शत्रूंनी ते कोणाविरोधात आहेत, याची नीट जाणीव ठेवावी. आम्ही काहीही खपवून घेणार नाही. युरोप दहशतवादापुढे झुकणार नाही’, असा खरमरीत इशारा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी दिला.
‘कट्टरपंथीयांचा दहशतवाद हा सर्वांचा समान शत्रू आहे. दहशतवादी व त्यांना भडकविणारे यांच्याविरोधातील संघर्ष ही युरोपची एकत्रित लढाई आहे’, या शब्दात जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी युरोपिय देश दहशतवादाविरोधात एकत्रित खडे ठाकतील, असे संकेत दिले. ब्रिटन, इटली, ग्रीस, झेक रिपब्लिक, नेदरलँड यासारख्या प्रमुख युरोपिय देशांनीही ऑस्ट्रियातील हल्ल्याचा निषेध करताना, युरोप दहशतवादाविरोधात एकजूट दाखवेल, अशी ग्वाही दिली. अमेरिका, रशिया, भारत व कॅनडा या आघाडीच्या देशांनीही ऑस्ट्रियातील हल्ल्याची कठोर निंदा केली आहे.
युरोपात गेल्या सहा वर्षात दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून, यामागे आखाती व आफ्रिकी देशांमधून होणारी निर्वासितांची घुसखोरी हे प्रमुख कारण असल्याचे आरोप करण्यात येत होते. सुरुवातीला युरोपिय देशांनी या बाबतीत फारच सौम्य भूमिका घेऊन आपल्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले, असा ठपका पत्रकार व विश्लेषकांनी ठेवला होता. त्याचे परिणाम दहशतवादी हल्ल्यांच्या रुपात समोर आल्यानंतर आता युरोपिय देशांनी आक्रमक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. फ्रान्स व ऑस्ट्रियातील दहशतवादी हल्ल्यांनंतर उमटलेल्या प्रतिक्रिया त्याला दुजोरा देतात. त्यामुळे पुढील काळात युरोपात दहशतवादविरोधी धोरणे व मोहीम अधिक आक्रमकरित्या राबविली जाईल, असे संकेत मिळत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |