अझरबैजानचे सात हजारांहून अधिक जवान मारल्याचा आर्मेनियाचा दावा

अझरबैजानचे सात हजारांहून अधिक जवान मारल्याचा आर्मेनियाचा दावा

येरेवान/बाकु – गेल्या ४० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेल्या आर्मेनिया-अझरबैजान युद्धात अझरबैजानचे सात हजारांपेक्षा जास्त जवान मारले गेल्याचा दावा आर्मेनियाने केला आहे. अझरबैजानची २६० हून अधिक ड्रोन्स व २५ विमाने नष्ट केल्याचेही या दाव्यात सांगण्यात आले. नागोर्नो-कॅराबखमधील आर्मेनियाच्या सुमारे १२००हून अधिक जवान व नागरिकांचाही युद्धात बळी गेल्याचे सांगण्यात येते. याच पार्श्वभूमीवर, नजिकच्या काळात आर्मेनिया-अझरबैजान युद्धातील सर्वात रक्तरंजित व निर्णायक लढाई पहायला मिळेल, असा दावा ब्रिटीश पत्रकार व विश्लेषक थॉमस डे वॉल यांनी केला आहे.

सात हजार

आर्मेनिया व अझरबैजानमध्ये सुरू असलेल्या युद्धात गेल्या काही दिवसांपासून अझरबैजानला मोठे यश मिळाल्याचे दावे समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांनी नागोर्नो-कॅराबख क्षेत्रातील सुमारे २०० गावे ताब्यात आल्याचा दावा केला होता. तुर्कीचे सहाय्य मिळालेले अझेरी लष्कर नागोर्नो-कॅराबखमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या शुशाच्या सीमेवर येऊन ठेपल्याचेही सांगण्यात येते. मात्र हे सर्व यश प्रदर्शित करीत असताना अझरबैजानने आपल्या लष्करी हानीची माहिती देण्याचे टाळले होते. नागोर्नो-कॅराबखमधील आर्मेनियन लष्कर आपल्या हानीची माहिती जाहीर करीत असताना अझरबैजानकडून राखण्यात आलेली गुप्तता संशयास्पद ठरली होती. गेल्याच आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आर्मेनिया-अझरबैजान युद्धात दोन्ही बाजूंचे मिळून पाच हजारांहून अधिक बळी गेल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे या युद्धात अझरबैजानचीही मोठी हानी झाल्याच्या दाव्यांना दुजोरा मिळाला होता.

सात हजार

या पार्श्वभूमीवर, आर्मेनियाने अझरबैजानच्या हानीची माहिती जाहीर करणे लक्ष वेधून घेणारे ठरते. आर्मेनियाच्या ‘युनिफाईड इन्फोसेंटर’ने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अझरबैजानचे सुमारे ७,५१० जवान युद्धात मारले गेले आहेत. आर्मेनियाच्या लष्कराने अझरबैजानची ७५०हून अधिक सशस्त्र वाहने व रणगाडे उद्ध्वस्त केले असून, २६२ ड्रोन्स पाडण्यात यश मिळविले आहे. अझरबैजानची २५ विमाने व १६ हेलिकॉप्टर्सही नष्ट केल्याचा दावा आर्मेनियाने केला. आर्मेनिया-अझरबैजान युद्धात अझरबैजानला आर्मेनियापेक्षा जास्त फटका बसल्याचे यावरून दिसून येत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हानी होत असतानाही अझरबैजानने नागोर्नो-कॅराबखसाठी सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

सात हजार

नागोर्नो-कॅराबखवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘शुशा’ या शहरावर ताबा असणे महत्त्वाचे ठरते. अझरबैजानचे लष्कर या शहराच्या सीमेवर येऊन ठेपले असून, येत्या काही दिवसात शुशासाठी निर्णायक संघर्ष होईल, असे दावे करण्यात येत आहेत. ब्रिटीश पत्रकार थॉमस डे वॉल यांनी, पुढील काही दिवसात आर्मेनिया-अझरबैजान युद्धातील सर्वाधिक रक्तरंजित संघर्ष पहायला मिळेल, असा इशारा दिला आहे. कॅनेडियन विश्लेषक नील हाऊर यांनीही, शुशाची लढाई या युद्धातील निर्णायक क्षण ठरेल असा दावा केला. यावेळी त्यांनी अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याकडेही लक्ष वेधले. शुशा स्वतंत्र केल्याशिवाय अझरबैजानचा विजय पूर्ण होणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष इलहाम अलीयेव्ह यांनी म्हटले होते. गेल्या काही दिवसात अझरबैजानकडून शुशा व इतर भागांवर होणाऱ्या हल्ल्यांची तीव्रता व व्याप्ती वाढल्याची माहितीही नागोर्नो-कॅराबखमधील गटांनी दिली आहे.

दरम्यान, रशियाच्या गुप्तचर यंत्रणेने पुन्हा एकदा आर्मेनिया-अझरबैजान युद्धातील दहशतवाद्यांवरून गंभीर इशारा दिला आहे. ‘शेकडो दहशतवादी नागोर्नो-कॅराबख युद्धात सहभागी होण्यासाठी या क्षेत्रात येत आहेत. याआधी युद्धात हजारो दहशतवादी सामील झाल्याचीही माहिती आहे. या दहशतवाद्यांमुळे साऊथ कॉकेशस भाग आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांसाठी नवे तळ ठरू शकतात. त्यातून हे दहशतवादी रशियासह इतर देशांमध्ये प्रवेश करून हल्ले चढवू शकतात’, असे रशियाच्या ‘एसव्हीआर फॉरेन इंटेलिजन्स सर्व्हिस’चे प्रमुख सर्जेई नॅरिश्किन यांनी बजावले. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी काही दिवसांपूर्वीच, आखातातील दोन हजारांहून अधिक दहशतवादी आर्मेनिया-अझरबैजान युद्धात सामील झाल्याचे वक्तव्य करून तुर्कीला लक्ष्य केले होते. रशियाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, इराणने आर्मेनिया व अझरबैजानच्या सीमेवर अतिरिक्त लष्करी तैनातीस सुरुवात केल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थेने दिली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info