रशियाने केलेली युक्रेनची कोंडी फोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय आघाडी उभारण्याचे संकेत

युक्रेनची कोंडी

लंडन – रशियाने ‘ब्लॅक सी’ क्षेत्रात केलेली युक्रेनची कोंडी फोडण्यासाठी पाश्चिमात्य देशांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लिथुआनियाने युक्रेनच्या जहाजांच्या सुरक्षेसाठी मानवतावादी आघाडी उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला ब्रिटनने पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येते. तर डेन्मार्कने युक्रेनला ‘हार्पून अँटी शिप मिसाईल्स’ पुरविण्याचे मान्य केले आहे. काही दिवसांपूर्वीच युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अमेरिकेने रशियाचे ‘ब्लॅक सी फ्लीट’ नष्ट करण्याची योजना आखल्याचे खळबळजनक वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर, युक्रेनची कोंडी फोडण्याचे कारण पुढे करीत होत असलेल्या आघाडीच्या हालचाली लक्ष वेधून घेणाऱ्या ठरतात.

रशिया व युक्रेन हे देश आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ब्रेड बास्केट’ म्हणून ओळखले जातात. युक्रेनमधील कोट्यावधी टन अन्नधान्य व इतर उत्पादने विविध शहरे तसेच बंदरांमध्ये अडकून पडली आहेत. युक्रेनचे ओडेसा बंदर सोडले तर बहुतांश सागरी क्षेत्रावर रशियाने ताबा मिळविला आहे. त्याचवेळी युक्रेनच्या सागरी वाहतुकीचा मुख्य मार्ग असलेल्या ‘ब्लॅक सी’ क्षेत्रात रशियाने आपले प्रबळ आरमार तैनात केले आहे. त्यामुळे युक्रेनमधील अन्नधान्य व इतर उत्पादने सागरी मार्गाने निर्यात होऊ शकत नाहीत.

युक्रेनची कोंडी

युक्रेनमध्ये अडकलेल्या अन्नधान्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये अन्नधान्याची भयावह टंचाई निर्माण झाली असून महागाईचा भडका उडाला आहे. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास जगाला अत्यंत भयानक अशा ‘फूड क्रायसिस’चा फटका बसेल, असे इशारे संयुक्त राष्ट्रसंघासह अनेक आघाडीच्या गटांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, युक्रेनमधील अन्नधान्याचे साठे व इतर उत्पादने बाहेर काढण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी प्रयत्न सुरू केले असून मानवतावादी आघाडीचा प्रस्ताव दिला आहे. लिथुआनियाचे परराष्ट्रमंत्री गॅब्रिलिअस लॅण्डस्‌‍बर्गिस यांनी ब्रिटन दौऱ्यात सदर प्रस्ताव पुढे आणला.

युक्रेनची कोंडी

लॅण्डस्‌‍बर्गिस यांनी, युरोपसह आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘नेव्हल पॉवर’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या देशांनी आघाडी तयार करावी, असे म्हटले आहे. आपल्या प्रस्तावाला ब्रिटनने समर्थन दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ब्रिटन आपल्या युद्धनौका तैनात करु शकतो, असे संकेत ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस यांनी दिल्याचे सांगण्यात येते. एकीकडे ही आघाडी उभारली जात असतानाच अमेरिकेने युरोपिय देशांच्या सहाय्याने युक्रेनला ‘अँटी शिप मिसाईल्स’ पुरविण्याची तयारी सुरू केली आहे.

युक्रेनला संरक्षणसहाय्य पुरविणाऱ्या देशांची सोमवारी व्हर्च्युअल बैठक पार पडली. यात डेन्मार्कने युक्रेनला ‘हार्पून अँटी शिप मिसाईल्स’ पुरविण्याचे मान्य केल्याचे सांगण्यात येते. ‘हार्पून’बरोबरच अमेरिका ‘नेव्हल स्ट्राईक मिसाईल्स’चाही पुरवठा करेल, असा दावा करण्यात आला आहे. ‘हार्पून’चा पल्ला सुमारे 300 किलोमीटर्सचा असून ‘नेव्हल स्ट्राईक मिसाईल्स’चा मारा 250 किलोमीटर्सपर्यंत करता येतो. ‘हार्पून’ क्षेपणास्त्र युद्धनौका, विमान तसेच सागरी किनारपट्टीवरील लाँचर्सच्या सहाय्याने डागता येते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info